मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५४-२

नाट्यप्रेम

गेल्या जानेवारीत श्री. विद्याधर गोखले यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याला अध्यक्ष म्हणून यशवंतराव आले होते. त्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या साहित्यिक रसिकतेचा एक वेगळा पैलू नकळत प्रकाशात आणला. रविवारच्या लोकसत्तेतील गोखल्यांच्या, उर्दू शायरीने व संस्कृत सुभाषितांनी नटलेल्या रसिल्या अग्रलेखांचे आपण अनेक वर्षाचे वाचक आहोत, या अग्रलेखांनी आपल्याला उर्दू व संस्कृतची गोडी लावली, असा गौप्यस्फोट यशवंतरावांनी केला. पंचवीस वर्षापूर्वी गोखल्यांचे ‘पंडितराज जगन्नाथ’ हे नाटक दिल्लीत गेले होते. ते पाहण्यासाठी पंडीत नेहरूंना आणण्यात यशवंतरावांचा मोठा वाटा होता. हेच प्रेम त्यांनी इतर मराठी नाटककारांवर व कलावंतांवर केले. बाळ कोल्हटकर हा त्यातला सर्वात भाग्यवान नाटककार . त्यांच्या ‘वेगळं व्हायचंय मला’ पासून ‘देणा-याचे हात हजार’ पर्यंत जवळजवळ सर्वच नाटके यशवंतरावांनी आवर्जून पाहिली. ‘दुर्वांची जुडी’ हे तर त्यांचे अतिशय आवडते नाटक. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ हे कोल्हटकरांच्या नाट्यलेखनातील सूत्र चव्हाणांना फार मोलाचे वाटे. ‘दुर्वांची जुडी’ मधला ‘सुभाष’ प्रत्येक घरात असतो’, असे ते म्हणत. चिनी आक्रमणानंतर संरक्षणाची जाणीव निर्माण करणारे ‘सीमेवरून परत जा’ हे नाटक कोल्हटकरांनी लिहिले आणि सादर केले. त्याला केंद्र सरकारचे खास अनुदान यशवंतरावांनी मिळवून दिले. यशवंतरावांनी आपल्यावर कसे प्रेम केले हे सांगताना परवा बाळ कोल्हटकरांनी एक आठवण सांगितली. साता-याला ‘दुर्वांची जुडी’ चा प्रयोग होता आणि यशवंतरावांचाही योगायोगाने मुक्काम होता. भेट झाली आणि बैठक जमली. गांधीजींचा अहिंसेचा विचार ज्ञानेश्वरीत कसा सांगितलेला आहे हे बाळ कोल्हटकर यशवंतरावांना ‘समजावून’ सांगत होते आणि यशवंतरावही जणुकाही आपण ज्ञानेश्वरी प्रथमच ऐकत आहोत अशा भोळ्या भावाने ते सर्व ऐकत होत. यशवंतरावांच्या मोठेपणाचे उदाहरण म्हणून कोल्हटकरांनी ही आठवण सांगितली. अशा आठवणी आज अनेक नाटककारांकडे आणि कलावंतांकडे आहेत. यशवंतरावांच्या या सहवासाने त्या सर्वांच्या भेटी सुगंधीत झाल्या.तो सुगंध यशवंतरावांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतील धबडग्यात काळजीपूर्वक जपून ठेवला.साहित्याच्या साहित्यावर पोसलेला पिंड सहवासाच्या बळावर टिकवला.

शब्दबंधुत्व

यशवंतराव राजकारणात गेले नसते तर उकृष्ट साहित्यिक झाले असते असे अनेकजण म्हणत, त्याचे कारण यशवंतरावांच्या साहित्यिक पिंडाची वेळोवेळी आलेली प्रचिती. केवळ वेळ काढून यशवंतरावांनी लेखन केले. ‘ऋणानुबंध’, ‘भूमिका’ आणि ‘कृष्णाकाठ’ हा आत्मचरित्राचा पहिला खंड. या तीन ग्रंथात ते आज समाविष्ट आहे. त्यातले कोणतेही पान काढून वाचावे. विषय कोणताही असला तरी त्यांच्या कथनाला साहित्यिक शैलीचा मोरेपिशी स्पर्श झाला असल्याचे जाणवल्यावाचून राहात नाही. ‘कृष्णाकाठ’ या ग्रंथाला न. चि. केळकर पारितोषिक याच वर्षी मिळाले आणि यशवंतरावांना साहित्यिक म्हणून मान्यताही मिळाली. अर्थात ती औपचारिकच. खरी मान्यता त्यांना यापूर्वीच मिळाली होती. पण स्वत: यशवंतरावांनी मात्र स्वत:कडे साहित्यिक अधिकार कधीच घेतला नाही. विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून चौसष्ट साली त्यांनी केलेले भाषण, किंवा पंचाहत्तर साली कराडच्या साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेले भाषण हे मराठी साहित्य समीक्षेचे उत्तम नमुने मानता येण्यासारखे आहेत. पण तरीही यशवंतरावांची साहित्य क्षेत्रातील भूमिका नेहमीच रसिक वाचकाची राहिली. आणि ‘ही भूमिका ख-या अर्थाने स्पर्धातीत व टिकून राहणारी आहे’ असे आपले मत त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच नोंदवले आहे.

राजकारणी आणि साहित्यिक यांचे नाते या प्रस्तावनेत अतिशय समर्पक शब्दात यशवंतरावांनी विशद केले आहे. ते म्हणतात, नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य जसे शब्द करतात, तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळवण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दात आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकाचे प्रमुख शस्त्र आहे. तर मी ज्या कार्यक्षेत्रात गेली जवळजवळ पन्नास वर्षे क्रियाशील आहे त्या राजकारणाचे प्रमुख माध्यमही शब्दच आहेत, या अर्थाने साहित्यिक व राजकारणी हे शब्दबंधू आहेत. शब्दांचे आणि आमचे साहचर्य आणि सोहार्द पुराणे आहे.’ साहित्याच्या क्षेत्राशी काही नाते सांगावयाचे असले तर एवढेच आहे. राजकारणी व साहित्यिक यांच्यातील हे शब्दबंधुत्व यशवंतरावांच्यामध्येच एकवटलेले होते.

यशवंतरावांच्या या सौजन्यशील साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला की त्यांच्या निधनाने आपली कोणती व केवढी हानी झाली आहे, याची विदारक जाणीव होते. राजकीय हानी एका व्यक्तीच्या जागी दुसरी व्यक्ती आल्याने कदाचित भरून निघणे शक्य असते. पण संस्कृतीची हानी तशी भरून निघत नाही.