११. न मातु: पर दैवतम् – वि. स. पागे
‘‘संस्कारक्षम मन असणे ही देणगी नियतीची’’ असे यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या ‘‘ऋणानुबंध’’ या आत्मचरित्रात एके ठिकाणी म्हटले आहे. परंतु ही देणगी त्यांना मुळातच लाभली होती त्यांच्या आईकडून-विठाईकडून. यशवंतरावांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई बेशुद्ध झाली होती. देवराष्ट्र हे छोटेसे खेडे. औषधपाण्याची सोय नाही. विठाईच्या आईने सागरोबावर हवाला ठेवला आणि त्याला विनविले की, ‘‘अक्काला जगविण्यात मला यश दे. तुझी आठवण म्हणून त्याचे नाव ‘यशवंत’ ठेवीन.’’ सागरोबाने त्यांची हाक ऐकली म्हणून मुलाचे नाव ‘यशवंत’ ठेवले. आपल्या आत्मचरित्रात या प्रसंगाची माहिती देऊन त्यांनी पुढे लिहिले आहे की, ‘‘आईच्या प्राणाची साक्ष म्हणून माझे नाव आहे हे मला कळल्यापासून आई हाच माझा प्राण बनला.’’
विठाई एकदा आजारी पडल्या. इतक्या की दुस-या दिवशीची सकाळ त्या पाहतात की नाही याची खात्री देता येत नव्हती. यशवंतरावांनी मुंबईहून खास डॉक्टर आणले होते. सर्वांचे एकमत झाले की, त्यांना जर अँटीबायोटेक्सची इंजेक्शने दिली तर त्या जगण्याची काहीतरी आशा आहे. परंतु विठाईच्या अस्थिपंजर देहाकडे पाहूनही त्यांना इंजेक्शने देण्याची आवश्यकता यशवंतरावांना पटवून देण्याचे धैर्य कोणालाही होईना. या प्रसंगी मी तेथेच होतो. तेव्हा सर्वांनी ही गोष्ट यशवंतरावांना पटवून देण्याची कामगिरी माझ्यावर सोपविली. मी यशवंतरावांना अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु आपल्या आईच्या दु:खात आणखी इंजेक्शनच्या सुयांची भर घालण्याचे त्यांनी प्रथम नाकारले. परंतु विठाईची तब्येत आणखीच खालावली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर मोठ्या नाईलाजाने पहाटे, एक वाजता, त्यांनी इंजेक्शने देण्याची परवानगी दिली. डॉक्टरांनी भराभर योग्य ती इंजेक्शने दिली व थोड्याच वेळात विठाईने भिवया हलविल्या. डॉक्टरांनी मला सांगितले की, ‘‘औषधांना प्रतिसाद मिळाला.’’ थोड्याच वेळात आई शुद्धीवर आल्या. त्या वेळी यशवंतरावांनी ‘‘आईऽऽ’’ म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांना मिठी मारली. हे दृश्य इतके हृदय हेलावणारे होते की, तिथे जमलेल्या प्रत्येकाने आपापल्या डोळ्यांना रूमाल लावले.
असे हे यशवंतरावांचे मातृप्रेम !