मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १०

१०- यशवंतराव-एक जिवलग मित्र – तात्यासाहेब कोरे

माझे आणि यशवंतरावांचे मैत्रीचे संबंध १९३० सालापासूनचे आहेत. स्वातंत्र्य-प्राप्तीच्या चळवळीत भूमिगत असताना ते आमच्या डागमळ्यात अधूनमधून राहात असत. त्यांच्याशी माझे संबंध जिव्हाळ्याचे व कौटुंबिक स्वरूपाचे होते. त्यांच्या आचरणामध्ये देशभक्तीप्रमाणेच सामाजिक कर्तव्याची जाणीव होती. त्यांच्या सान्निध्यात येणा-या कार्यकर्त्याना ते आपलेपणाने व प्रेमाने वागवीत असत. त्यांच्यासमोर कृषी औद्योगिक समाजव्यवस्थेचे भव्यदिव्य स्वप्न होते आणि म्हणून अशा प्रकारे समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी व ग्रामीण भागाचा विकास करण्याचा पाया महाराष्ट्रामध्ये प्रथम यशवंतरावांनी घातला असे जर म्हटले तर वावगे होणार नाही.

वारणा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करताना तो रजिस्टर झाल्यापासून ते कारखाना उभारणीपर्यंत वेळोवेळी ज्या समस्या, अडचणी आमच्यापुढे आल्या त्या सोडविण्यासाठी यशवंतरावांची आम्हास फार मोठी मदत झाली आहे. या ठिकाणी उदाहरणादाखल एका गोष्टीचा उल्लेख करतो.

वारणा सहकारी साखर कारखान्याचे चाचणी हंगामात दि. २ फेब्रुवारी १९६० ला कारखान्याच्या मेन टर्बाइनमध्ये आकस्मिक बिघाड झाल्याने कारखाना बंद ठेवणे भाग पडले. हा बिघाड दूर करण्यासाठी जर्मन तज्ज्ञांना बोलावून टर्बाईनची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती टर्बाईनचा रोटर दुरुस्तीसाठी जर्मनीला पाठवावा लागला. हा भाग दुरुस्त होऊन परत मिळण्यास सुमारे पाच आठवड्यांचा कालावधी लागणार होता. आमच्या दृष्टीने ही परीक्षेची वेळ होती. या वेळी कारखान्यात वीजपुरवठा होणे आवश्यक होते. असा वीजपुरवठा मिळविण्यासाठी आम्ही यशवंतरावांना भेटलो. आमची अडचण व तीव्र तळमळ पाहून यशवंतरावांनी आम्हाला ‘‘भले शाब्बास !’’ म्हटले आणि ज्या वेळी अश्रू ढाळण्याची पाळी आली त्या वेळी ‘‘डरो मत!’’असे म्हणून थोर दिलासा दिला व महाराष्ट्र वीज बोर्डाकडून कारखाना चालू राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा केला. त्यांचे उपकार कारखाना कधीही विसरू शकत नाही.

यशवंतराव म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी कृषी औद्योगिक समाजरचनेचे महत्त्व त्यांनी वेळोवेळी सांगितले. वारणा सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी यशवंतराव व सौ. वेणुताई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी वारणा परिसरात असा कारखाना उभा राहात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या कारखान्याचे या वारणा परिसराचे भविष्य निश्चित उज्ज्वल होईल असा विश्वासही प्रकट केला. या विश्वासाबरोबरच समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी हा कारखाना सहाय्यभूत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

यशवंतरावांच्या सार्थ अपेक्षेनुसार मी व माझे सहकारी सामाजिक कर्तव्याच्या व बांधिलकीच्या जाणिवेने आजवर समाजसेवेचे कार्य करीत राहिलो आहो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रात आज वारणानगरचा व या विभागाचा नावलौकिक सर्व देशभर होऊन राहिला आहे हे नमूद करण्यास मला स्वाभिमानयुक्त आनंद वाटत आहे. तो यापुढेही राहील याबद्दल तिळमात्र शंका नाही. महाराष्ट्रातील सहकार चळवळीला मूर्त स्वरूप देण्यामध्ये यशवंतरावांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात व श्रमजीवी वर्गात जो विकास झाला आहे त्याचे श्रेय यशवंतरावांनाच आहे.

महाराष्ट्र राज्याचा जो विकास आपल्यास आज दिसत आहे तो यशवंतरावांच्या प्रेरणेने झालेला आहे. कृषी, उद्योग, सहकार व ग्रामीण विकास या सूत्रानेच आपल्याला या देशातील दारिद्र्य नाहीसे करता येईल. पण याकरिता आत्मीयतेने, तळमळीने, अभ्यासयुक्त दृष्टीने व ध्येयवेडेपणाने परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्याची नितांत गरज असते. अशा निष्ठेने काम करणा-या सामान्य कार्यकर्त्याचे स्फूर्तिस्थान आमचे यशवंतराव होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा सतत पाठपुरावा करून कार्यरत राहणे हीच खरी आठवण ठरेल असे मी मानतो.