मी :- ‘‘हे बघा साहेब, संयुक्त महाराष्ट्राविषयीचा माझा ध्यास तुम्हाला ठाऊक आहेच. ’’
यशवंतराव :- ‘‘तो मला चांगला ज्ञात आहे पण मग ? ’’
मी :- ‘‘ ते स्वप्न साकार होण्याचे दृष्टिपथात नाही. ’’
यशवंतराव :- ‘‘एवढी विफलता, निराशा, कशाकरता ? ’’
मी :- आमची एवढी धडपड, प्रक्षुब्ध जनमत, पण तरीही श्रेष्ठींची शंका
दूर होत नाही !
यशवंतराव :- तरीही पण तिथेच दार ठोठवायला नको का ? तुम्ही व आपल्या लोकांनी काँग्रेस सोडण्याने, हे कसे जमणार ?
मी :- हा कौल काँग्रेस श्रेष्ठींना कसा लागणार ?
यशवंतराव :- संयम राखा, जरूर लागेल; असे भावनाविवश होऊन गोष्टी घडत नसतात. मनातले संशयी विचार जरा झाडले पाहिजेत.
या वेळी, यशवंतरावांचा चेहरा अर्थपूर्ण, बोलका भासला. त्यात दृढ आत्मविश्वासही होता. त्यांच्या या ठाम बोलण्याने, माझ्या मनात संभ्रम निर्माण केला. माझ्या मनाची चलबिचल, न्याहाळीत यशवंतराव म्हणाले,
‘‘काय आबा, विचारभ्रमणात गुरफटलात की काय ?’’
मी :- डोक्यांत काहूर भेडसावीत आहे. भूतभविष्याचे चित्र डोकावत होते. ध्येयवेडे तरुण म्हणून, स्वत:ला काँग्रेसमध्ये आपण झोकून दिले. काँग्रेसची बांधिलकी निष्ठेने पाळली. स्वातंत्र्य संग्रामात उड्या टाकल्या. स्वातंर्तानंतरही काँग्रेस माउलीशी निष्ठावंत, पूर्णपणे सश्रद्ध राहिलो. आपली महाराष्ट्र काँग्रेसही आग्रही आहे. पण, दिल्ली दरबारात काही जमतच नाही.’’
यशवंतराव :- ही समस्या सुटण्याचा पर्यायी मार्ग सांगाल?
मी :- मी त्याबाबत गोंधळात आहे खरा!
यशवंतराव :- कोणतीही समस्या आस्ते कदम सुटते. काळ, काम, वेग निर्णायक होत असतो. योग्य संधीच अशा निरगाठी सोडवू शकतात. विवेक हवा, गुन्ता नको, संयम पाळा, आज-उद्या इष्ट फलप्राप्ती होईलच.’’
यशवंतरावांचे हे मनीचे उत्स्फूर्त बोल, माझ्या अंत:करणात भिडले. सह्याद्रीच्या - या सवाई सर्जाचा ‘‘शब्द’’ जणू इतिहासातील रायबाचाच वाटला. जागृती येऊन म्हणालो, ‘‘साहेब, हे सर्व खरं, काँग्रेसविना पर्याय नाही. तुमची अढळ नेहरूनिष्ठा! पण, महाराष्ट्रातील जनसागर सध्या उफाळला आहे. आपण, मात्र, या झंझावाती वादळासमोर पहाडासारखे खंबीर उभे आहात. आम्ही तुमच्या पाठीशी खडे आहोत. पण, या चक्रव्यूहातून ध्येयसिद्धी कशी होणार?’’
यशवंतराव म्हणाले, ‘‘हताश होऊ नका. माझा विश्वास माझ्या मार्गावर आहे, प्रयत्नावर व विचारावर ठाम आहे. एक दिवस तुम्ही सारेजण, मला धन्यवाद द्याल!’’
माझी निरूत्तरता वाढली. साहेबांची मुत्सद्देगिरी, कुशलता व कर्तृत्व मी जाणत होतो. लोकमत पाठीशी घेऊन, एखादा ऐन मोका गाठून दान पदरी पाडून घेतील अशी खात्री वाटू लागली. मला धीर आला. सर्वांनी सुदाम्याचे पोहे खाल्ले! आनंद प्रकट केला. तेव्हा, प्रसन्न मनाने यशवंतराव म्हणाले,
‘‘काय आबा, आपण उभयता कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावरचे. कोयना रुसून कृष्णेला व समुद्राला मिळणार नाही, असं थोडंच घडतं?’’ सर्वांच्या चेह-यावर आनंद प्रकट झाला.
मी स्वगृही परतलो. ‘‘पुनश्चहरि:ओम्’’ म्हणत काँग्रेसचे कार्य पाहू लागलो.
अखेरची शुभकामना
यशवंतरावांचे व माझे केवळ राजकीय नाते नव्हते. त्यात बंधुभावाचा स्नेहरज्जू होता. प्रत्येक वाढदिनी, दिवाळी पाडव्याला, नूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठवत असे. १२ मार्च १९८४ ला, त्यांच्या वाढदिनी ‘जीवेत शरद: शतम्’ अशा प्रार्थनेचा शुभसंदेश धाडला. त्याला २२ मार्च १९८४ ला नव्या दिल्लीहून प्रतिसाद मिळाला. ‘‘आपले प्रेम व सदिच्छा यांचा ठेवा मी सतत जतन करीन.’’ हाच शेवटचा पत्रव्यवहार! १९८५ चा वाढदिन उगवला. पोटात कालवाकालव झाली. ‘‘दीर्घायुष्य लाभो’’ हा सद्भाव कुठे व कसा पोहोचणार?
विचाराने ‘यशवंतराव चव्हाण अमर रहे’ हीच यापुढे त्यांना भावरूप आदरांजली. त्यांच्या स्मृतीला कोटीकोटी प्रणाम!