मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२६

१२६. राजकीय प्रभावळीतील ‘‘कोहिनूर’’ - राष्ट्रवीर

यशवंतराव चव्हाण यांनी आपले शिक्षण बिकट परिस्थितीत घेतले आणि स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. सातारच्या प्रतिसरकारने अन्यायी लोकांना व ब्रिटिश सरकारला धाब्यावर बसविले आणि ब्रिटिश सरकारचे शासन सातारा सांगली जिल्ह्यात जवळजवळ नामशेष झाले. त्या चळवळीत यशवंतराव चव्हाण यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.

मानवेंद्र राय, महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे धन त्यांनी अंगीकारले होते. म्हणून समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्यास ते कटिबद्ध झाले होते.

उद्योगधंद्यात महाराष्ट्र सहभागी असला पाहिजे. म्हणून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी ते सतत धडपडत होते.

शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राने इतरांना पाठ शिकावेत यासाठी शिक्षणाचा प्रचार करण्यात त्यांनी अनेक संस्थांना प्रवृत्त केले आहे. साहित्य, संस्कृती मंडळातर्फे नाना भाषांतील व स्वभाषेतील पुस्तके प्रकाशित करण्यास त्यांचे मनस्वी प्रोत्साहन होते.

यशवंतराव चव्हाण ही एक व्यक्ती नसून संस्था बनली होती. अगदी अल्पकाळात महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी आपला ठसा उमटविला होता.

लहान-थोर कोणताही समारंभ असो यशवंतरावजी तेथे आपली उपस्थिती लावीत. बहुजन समाजाच्या लोकांना भेटावे व त्यांचे मनोगत जाणून घ्यावे अशी त्यांची विचारधारा होती.

महाराष्ट्रात १०० हून अधिक साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना ‘‘पुढे चला’’ असा हिरवा कंदील ते दाखवून गप्प बसणारे नव्हते, तर त्यांची प्रगती कशी होत आहे याकडेही ते जातीने लक्ष देत.

‘‘आधुनिक किल्ले’’ असे ते साखर कारखान्यांना संबोधीत.’’

यशवंतराव चव्हाण संमजस, उदार मतवादी व सर्वसमावेशक आणि समन्वयवादी नेते होते. आपल्या शत्रूबद्दल देखील तिळमात्र अभद्र भाषा ते बोलत नव्हते.