मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२८

१२८.  यशवंतराव: उमगलेले न उमगलेले – श्री. रामभाऊ जोशी

यशवंतराव हे तसे घट्ट ओठाचे नेते. त्यांच्या अंतर्मनात डोकावणं कठीण. कमालीचे मुत्सद्दी, अत्यंत सावध. वर्षोनुवर्षे दिल्लीत राहिल्यानंतरही, इथं मित्र कोण किंवा शत्रू कोण हे अजूनही कळत नाही. उमजत नाही. अशीच त्यांची प्रतिक्रिया असायची. यामुळेच सावध असलेला हा नेता अधिक सावध बनला असल्यास नवल नव्हे. या सावधपणातून त्यांना बाहेर काढून त्यांच्याशी गप्पा करणं म्हणजे आव्हान असे. परंतु योगायोगाने म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणानं असेल, गप्पांची त्यांची माझी नाडी नेहमीच जमायची.

यशवंतराव स्वत: थोर बुद्धिमान असूनही विचारांची देवाणघेवाण करण्याला त्यांची तयारी असे. त्यांचे विचार वास्तववादी असले तरी अनुभवाच्या आणि तर्काच्या मुशीत घालून तावून सुलाखून घेण्याचीही त्यांची सिद्धता असे. राजकीय क्षेत्रांत प्रसंगोपात त्यांनी अनन्य साधारण विजय संपादन केलेला असला तरी स्वत:चा मोठेपणा वाढविण्यासाठी नाटकीपणा, दिखाऊपणा यापासून कटाक्षाने ते लांब राहिले, पत्रक-पुढारी किंवा घोषणा-पुढारी बनण्यापासून अलिप्त राहिले. असं असूनही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ज्या पिढीनं त्यांना नेते म्हणून स्वीकारले, मानले, ती पिढी समजूतदार आणि शहाणी समजली पाहिजे. राजकारण, समाजकारण, सहकार, शेती उद्योग, कला, साहित्य अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत माणसं घडविण्याचा, गुणी माणसाला संधी देण्याचा उद्योग त्यांनी संपूर्ण सत्ताकाळात केला. सत्ता नसतानाही केला. यशवंतरावांच्या विचारांची आणि कृतीची महनयिता चिरस्थायी असल्यामुळे आजच्या आणि उद्याच्या पिढीच्या मनातही त्यांचे नेतेपण दीर्घकाळ राहणार आहे.

यशवंतरावांच्या संदर्भात सत्ता कधी उतली नाही, मातली नाही, याचं कारण, ते सत्तेत नसलेल्या काळापासून त्यांच्या समोर प्रथमपासूनच सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट होतं. आर्थिक दुरवस्था त्यांनी स्वत: अनुभवली होती, आणि सभोवतालच्या समाजाची दूरवस्था पाहिली होती. मनापुढे दिशा निश्चित झालेली होती. सत्तेत आल्यानंतर त्याच ध्येयासाठी, त्याच दिशेने जाण्यासाठी सत्ता वापरण्याचा निश्चय होऊ शकला. त्यात वेगळेपणा निर्माण होऊ दिला नाही. सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचा विचार, समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न, त्यामुळेच ते करू शकले. त्यासाठी जेवढी संधी उपलब्ध करून देता येणे शक्य होते तेवढी ते देऊ शकले. महाराष्ट्रात असताना, मुख्यमंत्रिपदावरून त्यांनी यासाठी जे प्रयत्न केले, निर्णय घेतले त्याचा इष्ट परिणाम समाजमनावर निश्चितच झाला आणि टिकला.

यशवंतरावांची महाराष्ट्राला जी प्रमुख देन आहे ती समाजवादाचे विचार रूजविण्याची, आचरणाची. महाराष्ट्रात सर्वप्रथम समाजवाद आणण्याची घोषणा यशवंतरावांनी १९६२ साली केली आणि त्यांना अभिप्रेत असलेला समाजवाद प्रत्यक्षात आणण्याची जिम्मेदारीही त्यांनी स्वीकारली. केवळ जबाबदारी स्वीकारूनच ते थांबले नाहीत तर आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत कृषि-औद्योगिक समाजरचनेची निर्मिती करण्याची आखणी करून त्यांनी ही योजना अंमलात आणली. ग्रामीण समाजाचा आर्थिक चेहरामोहरा बदलण्याच्या ध्येयाची बांधिलकी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून-कार्यकर्ता या नात्याने ग्रामीण क्षेत्रात कार्य करीत असलेल्या काळापासून मनाने स्वीकारली होती. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर आरूढ होताच कृषि-औद्योगिक समाजरचना आणि त्यासाठी सहकारी चळवळीचा पुरस्कार करून महाराष्ट्राचे ग्रामीण कृषिजीवन त्यांनी आमुलाग्र बदलले. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, येथील सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी क्षेत्रातील अन्य प्रक्रियात्मक उद्योग यांनी आज देशात अग्रक्रमाचे, वैभवाचे, समाजपरिवर्तनाचे आदर्श स्थान संपादन केलेले आहे. याचे श्रेय अर्थातच योजनापूर्वक आखणीला, सहकारी चळवळीच्या पाठीशी ध्येयवादाची शक्ती उभी करण्याला आणि तिला सत्तेचा भरभक्कम आधार देण्याला आहे, हे मान्य करावे लागते.

शेतकरी हाच महाराष्ट्राचा प्राण असून शेतकरी हेच महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत असे ठोकपणे, जाहीरपणे सांगणारे यशवंतराव हे पहिले मुख्यमंत्री. शेतीच्या क्षेत्रात पुरोगामी पावलं टाकून प्रत्यक्ष निर्णय करण्याचे कार्य महाराष्ट्राने यशवंतरावांच्या कारकीर्दीतच सर्वप्रथम केले. शेती आणि उद्योगधंदे यांसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तींना शिक्षण देण्यासाठी तांत्रिक व शेती शाळांची मालिका निर्माण व्हावी, महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात वीज उपलब्ध होऊन शेती आणि उद्योग यासाठी विजेचा वापर व्हावा यासाठी नुसत्या घोषणा करून ते थांबले नाहीत. त्यासाठी कोट्यवधी हात कामाला लावण्याचा जिवापाड प्रयत्न त्यांनी केला. शेत-जमिनीच्या कमाल धारणेवर मर्यादा घालण्याचा (सीलिंग) कायदा करून या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र हा ख-या अर्थाने पुरोगामी असल्याचे देशात याच काळात सर्वप्रथम प्रत्ययास आणून दिले. १९६१ च्या जानेवारीमध्ये महाराष्ट्रातल्या शेत-जमिनीबाबतचे (जमीन धारणेवर मर्यादा) विधेयक समोर आले आणि या विधेयकामुळे दूरगामी अशा, जमीन सुधारणेचा पाया घातला गेला. केंद्र सरकारने सीलिंगचा कायदा करण्याचा विचार त्यानंतर दहा-बारा वर्षांनी केला. यातच यशवंतरावांच्या ठिकाणचा; ग्रामीण आणि शेती विकासविषयक द्रष्टेपणाचा प्रत्यय येतो.