‘‘तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. पण पुण्यावर माझे प्रेम होते, प्रेम आहे म्हणून पुण्यात कारखानदारी वाढली. टाटा, गरवारे, कल्याणी यांना मी अक्षरश: हाताला धरून, ओढून पुण्यात आणले. त्यांच्यासाठी जागा शोधल्या. गरवारेसाठी जागा पहायला तर मी गुडघ्यापर्यंत धोतर धरून चिखल तुडवीत गेलो होतो. पुण्याची कारखानदारी आपोआप वाढली नाही. कारखानदारांना ओढून आणून, आग्रह करून, हट्ट धरून, सवलती देऊन, उत्तेजन देऊन मी पुण्यात कारखाने आणि कारखानदार वाढवले.’’
या चर्चेत साहेब माझ्याशी बोलत होते असे म्हणण्यापेक्षा स्वत:शीच प्रकट चिंतन करीत होते. इतक्यात कुणीतरी येत असल्याची चाहूल लागल्यावर ते सावध झाले आणि म्हणाले, ‘‘मी स्वत:विषयी कधी बोलत नाही, मला तसे बोलायला आवडत नाही, आजच कसा बोललो कोण जाणे? हे बोलणे तुमच्या माझ्यातच ठेवा, कुठे छापू नका.’’
पुढे एकदा साहेब आणि वेणूताई असे दोघेजण रामभाऊ जोशींकडे जेवायला आले होते. जेवणानंतर गप्पा मारताना पुणे हा आमचा आवडीचा विषय निघाला. बोलताना मी म्हणालो, ‘‘पुण्याला स्वत:ची संस्कृती नाही, भाषा नाही, इथे मुलकी-गैरमुलकी असे वाद नाहीत. त्यामुळे येणारी संस्कृती, भाषा पुणे शहर आपलीशी करते. स्वत:चा पीळ नसल्याने पुण्याची संमिश्र भाषा; संमिश्र संस्कृती महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती झाली आहे.’’
‘‘पुण्याला स्वत:ची संस्कृती नाही असे कसे म्हणता येईल?’’ साहेबांनी प्रश्न केला.
‘‘पुण्याला स्वत:चे रूढ अर्थाने ग्रामदैवत नाही, पुण्याची म्हणून जत्रा नाही. पुण्याला पाटील नाही आणि पुण्याला कुलकर्णी नाही. आपल्या समाजरचनेत पुण्याला फक्त देशपांडे आहे, पण देशपांड्याचा गावगड्याशी संबंध नसतो.’’
हे माझे उत्तर साहेबांना आवडलेले दिसले. ते म्हणाले, ‘‘रामभाऊ, मला पुणे आवडते, पुण्याबद्दल बोलायला यांचे विचार वेगळेच दिसतात. यांना घेऊन एकदा घरी या. पुण्याबद्दल मला खूप काही ऐकायचे आहे.’’
पण ‘‘एकदा’’ भेटण्याची ही वेळ कधी आलीच नाही ! गप्पा तशाच राहून गेल्या !...