मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२२-१

पुढे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश नेहरूंनी यशवंतरावांच्या हातात दिला. एवढेच नव्हे तर नेहरूंच्या हस्तेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर ‘मुंबई’ राज्याऐवजी ‘महाराष्ट्र’ राज्य हेही नाव राज्याला मिळाले. त्याचा पुढचा कळस म्हणून चीनने भारतावर अतिक्रमण केले. त्या वेळी जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना सन्मानाने ‘संरक्षणमंत्री’ म्हणून दिल्लीला बोलाविले. यशवंतरावांच्या नेहरूनिष्ठेमुळेच त्यांनी राज्यातील नेतृत्वाची पातळी ओलांडली व अखिल भारतीय नेतृत्वाची पातळी गाठली. पंडित नेहरू हे त्यांचे ख-या अर्थाने ‘गॉड फादर’ होते. दिल्लीला यशवंतरावांचे स्थान मजबूत झाल्यावर स्वत: यशवंतराव महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्याचे ‘गॉड फादर’ झाले. ‘यशवंतराव बोले आणि महाराष्ट्र डोले’ अशी स्थिती अनेक वर्षे महाराष्ट्रात होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ यशवंतरावांच्या मुठीत होते!

आपल्या सार्वजनिक भाषणात यशवंतरावांनी ‘शिवराळपणा’ कधी येऊ दिला नाही. विरोधकांनी भले त्यांच्यावर गलिच्छ प्रहार केले तरी त्यांनी कधी तोंडसुख घेतले नाही. विरोधकांबद्दल कधी शिवीगाळ, निर्भत्सना, निंदा, अनुदारवृत्ती त्यांनी दाखविली नाही. त्यांचे विचार नव्या समाजधारणेला आवश्यक व उत्साहवर्धक असत. बोलण्यात काव्यात्मक खुमारी असे. त्यामुळे यशंवतरावांचे भाषण म्हणजे एक ‘मेजवानी’ असे.

राजकारणात चातुर्य, लोकसंपर्क, दूरदृष्टी, जीवनविषयक तत्त्वज्ञान, समकालीन विचारसरणी, समकालीन राजकीय वारे, हे सगळे माहीत असावे लागते. यशवंतराव यात उजवे ठरले. त्या त्या वेळी त्यांनी समकालीनांवर जखम होऊ न देता प्यादेमात केली. राजकारणात टिकण्यासाठी एक स्वत:चा असा सामथ्र्यशाली गट तयार केला. जिल्ह्याजिल्ह्यात स्वत:ची माणसे निर्माण केली. त्यामुळे यशवंतराव भराभर वरच्या पाय-या चढत गेले. यशवंतरावांच्या अगोदरच्या पिढीत व समकालीनांत त्यांच्यापेक्षाही अधिक बुद्धिवान, अधिक सेवाभावी, त्यांच्या इतकेच स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असलेले कार्यकर्ते होते, पण त्यांच्यापेक्षा यशवंतराव काळाची चाहूल घेऊन त्याप्रमाणे धोरण ठरविणारे मुत्सद्दी नेते ठरल्याने ते इतरांना मागे टाकून वरचढ झाले.

काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, देवगिरीकर, भाऊसाहेब हिरे, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव, रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब भारदे, अण्णासाहेब वर्तक, वसंतरावदादा, राजारामबापू पाटील, वि.स.पागे, भाई माधवराव बागल, बाळासाहेब देसाई, देवकीनंदन नारायण, ब्रिजलाल बियाणी, आबासाहेब-गोपाळराव खेडकर, बॅ.रामराव देशमुख, डॉ.पंजाबराव देशमुख लोकनायक अणे, स.का.पाटील अशी तोलामोलाची माणसे महाराष्ट्रात यशवंतरावांच्या अगोदरच्या पिढीत व समकालिनांत होती. पण या सर्व नेत्यांशी कधी चुचकारून तर कधी सख्य करून कधी मौन धारण करून, तर कधी हळूच बगल देऊन यशवंतरावांनी वाट काढली व राजकारणातील अत्युच्च स्थान मिळविले.

महाराष्ट्र दुभंगू द्यायचा नाही- तो अभंग रहावा हा विचार मनाशी पक्का करून यशवंतरावांच्या राजकीय रथाचा प्रवास सुरू झाला.

महाराष्ट्राच्या विकासाचा जगन्नाथाचा रथ, केवळ मुख्यमंत्र्यांनी, इतर मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी, ओढावयाचा नसून या सा-यांसह सर्व जनतेने ओढावा अशी भावना यशवंतरावांनी महाराष्ट्रभर निर्माण केली. हे महाराष्ट्रात आजवर झाले नव्हते. मुख्यमंर्त्यात व जनतेत पूर्वी एक प्रकारची दरी होती. ती दरी यशवंतरावांनी प्रयत्नपूर्वक बुजविली. प्रत्येकाला हे राज्य माझे वाटावे या दृष्टीने त्यांनी कारभार पाहिला. संयुक्त महाराष्ट्र हे राज्य मराठ्यांचे न होता मराठी समाजाचे होईल असे समंजस उत्तर ग.त्र्यं.माडखोलकर यांना देऊन यशवंतरावांनी जाणत्यांची मने जिंकली व त्याप्रमाणे वागून दाखवले.