एकदा वेळेअभावी श्रीमती इंदुमती शेवडे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कार्यक्रम साहेबांच्या निवासस्थानी झाला. महाराष्ट्रातील त्या वेळी काही साहित्यिक आले होते. साहेबांना ऑफिसच्या फाईल्स पहावयाच्या असल्यामुळे कार्यक्रम लवकरच आटोपता घेतला. कार्यक्रम संपताच साहेब घरात जाण्यास निघाले आणि निरोप घेण्यासाठी ३-४ साहित्यिक मंडळीत गेले. गप्पा सुरू झाल्या आणि तब्बल ४५ मिनिटे या गप्पा हास्यविनोदात उभ्या उभ्या चालू होत्या! आपण उभे आहोत याचे भानही कुणाला नव्हते.
साहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वापैकी महत्त्वाचे पैलू म्हणजे मित्र भाव, माणुसकी व जिव्हाळा. साहेबांचे सर्व जीवन राजकीय असले तरी त्यांचा इतर क्षेत्रांतील मित्रपरिवार मोठा होता. दिल्लीतील महाराष्ट्रीय मंडळीत असे असंख्य लोक आहेत की ते अधूनमधून साहेबांना भेटत असत. दिल्लीतील बहुतेक मराठी, बिगरमराठी पत्रकार साहेबांचे मित्र होते. ही मंडळी सर्वच पक्षांची होती. पण साहेब त्यांच्याशी ब-याच वेळा मनमोकळे बोलत. दोघांतही एकमेकांबद्दल आत्मविश्वास होता. अंडरस्टँडिंग होते. या मित्रांच्या शब्दाला साहेब काही वेळा दुष्परिणामांची जाणीव असूनही मान द्यायचे. साहेबांची मैत्री अतूट असायची. साहेबांनी आपणहून मैत्री सोडली असं कधीच झालं नाही, दुसरा पक्ष मैत्री तोडण्याचा विचार करीत असेल तर ती तुटू न देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. म्हणून त्यांच्या विरोधात जाणारे बरेच लोक साहेबांना त्याची कल्पना व कारणमीमांसा अगोदर द्यायचे. मित्रांशी सुखदु:खे ते आपली समजायचे. तयांच्या अडी-अडचणीसाठी धावून जायचे. मृत्यूपुर्वी १५-२० दिवस अगोदरच त्यांनी आपल्या सातारा भागातील एका मित्रास त्याच्या घरासाठी रू. १,००० देण्याचे मान्य करणारे पत्र लिहिले होते व सातारच्या भेटीत ही रक्कम ते त्यांना देणारे होते. मित्रवियोगाचे दु:खही ते सहन करू शकत नव्हते. या निवडणुकीच्या धामधुमीत काळाने साहेबांचा घास उचलला तसाच मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे जीवश्च कंठाश्च मित्र श्री. किसन वीर यांना देवाज्ञा झाली. त्यांचा फोटो आजही दिल्लीत साहेबांच्या बंगल्यातील देवघरात आहे.
माणुसकीचे मूर्तिमंत रूप म्हणजेच साहेब. ही माणुसकी त्यांनी कधीच ढळू दिली नाही. कोणाचेही नुकसान व्हावे असे त्यांनी स्वप्नातही चिंतले नाही. कोणाकडूनही होण्याची शक्यता वाटत असेल तर त्याला सावध करत. कोणी जर गैरसमज केला तर त्यांना मनापासून वाईट वाटायचे. त्यांच्या माणुसकीला जिव्हाळ्याची सुंदर झालर होती. या दोन गुणांमुळे त्यांनी आपल्या कर्मचारी वर्गास घरगुती वागणूक दिली. त्यांना ते नेहमी आदराने वागवावयाचे, कोणाचे नुकसान त्यांनी कधी केले नाही किंवा स्वार्थापायी कोणाच्या हिताच्या, प्रगतीच्या आड ते आले नाहीत. यासंबंधी एक गोष्ट आठवते. ते गृहमंत्री असताना त्यांना पोलिस गार्ड मिळाले होते. आवारात मोसंबीने लदबदलेले झाड होते. या गार्डचा सब-इन्स्पेक्टर रोज रात्री या झाडावरील मोसंबी नेत असे. माळ्याच्या हे लक्षात आले व त्यांनी सौ. वेणूतार्इंना सांगितले. त्यांनी या चोरीबद्दल साहेबांना सांगितले. साहेबांनी मला बोलावून हळूच सांगतले की, त्याला एकट्याला बाजूला बोलावून हळूच मोसंबी न नेण्याबद्दल सांगा आणि तशी कुठेही तक्रार करू नका किंवा होणार नाही याची खबरदारी घ्या. मी जेव्हा याचे कारण त्याच्याशी बोलल्यानंतर साहेबांना सांगितले की, त्याचा मुलगा आजारी आहे, तेव्हा त्यांनी सौ. वेणूतार्इंना त्याच्यासाठी बाजारातून एक डझन मोसंबी आणण्यास सांगितले. साहेबांनी माझ्या आईच्या आजारपणातही केवळ त्या वेळी माझा एक वर्षाचाच संबंध असताना मी काही एक न सांगता सर्व व्यवस्था केली होती. आईच्या निधनानंतर मला बोलावून माझे सांत्वन केल्यानंतर घरच्या अडीअडचणीबद्दल विचारले, त्या वेळी त्यांना कळले की, आई गेल्यानंतर नागपूरच्या माझ्या घरात वडिलांना आधार देणारा मोठा भाऊ, भावजय इंदूरला आहेत. तेव्हा मी न सांगताच त्यांनी मुख्य सचिवांना माझ्या मोठ्या भावाची बदली नागपूरला करून घेण्याबाबत आदेश दिले व स्वत: पाठपुरावा केला.