मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९०-२

याच भेटीत पुढे बोलता बोलता राजकारणातील अस्थिरतेबद्दल बोलणे झाले, त्यात ‘कुणी कधीही साथ सोडली तरी माझी आई व माझी शाळा मात्र मला कधीही अंतर देणार नाहीत’ असे ते म्हणाले. त्या काळात एवढी उद्विग्नता त्यांना का होती ते मात्र मला त्या वेळी समजले नाही. तसेच ज्या शाळेचा ते उल्लेख करीत होते ती कराडची एखादी संस्था असावी असे मला वाटले.

१९६०-६१ साली महाराष्ट्र राज्याची पहिली पंच वार्षिक योजना तयार केली तीत महाराष्ट्रातील मागास विभागाबाबत साहेबांची जी मते होती ती स्पष्ट झाली आहेत. तुलनेने अविकसित अशी विदर्भ व मराठवाडा या विभागासाठी जादा भांडवली तरतुदी करून त्यांच्या विकासातील अनुशेष दूर करण्याचे तत्त्व प्रथमच या पंचवार्षिक योजनेच्या दस्तैवजात मांडले गेले आहे. साहेब दिल्लीस गेल्यावर या धोरणाचा पाठपुरावा नीटसा झाला नाही व उलट त्या धोरणाशी किंवा त्यांच्या मुळाशी असलेल्या नागपूर कराराशी मांधिलकी नसल्यासारखाच कारभार होत राहिला. त्याचा परिणाम म्हणून दांडेकर समिती व पुढे वैधानिक विकासमंडळाच्या मागण्यांना जोर चढला. साहेबांचे मुख्यमंत्रिपद नव्या महाराष्ट्राला १९६२ नंतर आणखी दहा वर्षे लाभले असते तर विकासात असमतोल कधीही आला नसता आणि महाराष्ट्राची एकात्मता आजच्याहून कितीतरी अधिक दृढ झाली असती. ते दिल्लीस गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले हे तर खरेच, पण त्यातही महाराष्ट्रातील मागास विभागांचे व तेथील गरीब जनतेचे फार फार नुकसान झाले व त्यांचे पाऊल विकासाच्या वाटेवर निदान एका पिढीसाठी कायमचे मागे पडले असे मला वाटते.

साहेब दिल्लीस गेल्यावरही ते महाराष्ट्रात व विशेषत: पुण्यास आले तर मी भेटत असे. गंधर्व रंगमंदिर व मंडईच्या नव्या वास्तूंची उद्घाटनेही साहेबांच्याच हाताने झाली होती. साहेबांचा वैयक्तिक जिव्हाळा कायम होता. भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून अमेरिकेत ह्युस्टनला गेले होते तेथे माझा मुलगा त्यांना भेटला तेव्हा सर्वजण अमेरिकेत निघून आलात की भावंडांपैकी कुणीतरी आईवडिलांजवळ आहे म्हणून आमची चौकशी केली. कै.उद्धवराव पाटलांचा सत्कार साहेबांच्या हाती औरंगाबादेस झाला त्या भेटीतही अशीच आस्थापूर्वक चौकशी त्यांनी केली. माझ्या दुर्दैवाने त्यानंतर साहेबांची भेट झाली नाही.

आयुष्यात या महापुरुषाची दर्शने अधूनमधून होत गेली व त्यांच्या मार्गदर्शनात जीवनातील काही वाट चालून झाली त्यामुळे मनाला धन्यता वाटत असते. गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्रात एवढा थोर प्रभावी नेता कुणी झालाच नाही असे मनोमनी वाटते. पुढचे काय सांगावे?