• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३८-२

साहेब एकदम गप्प बसले न् मीही तरातरा निघून परतले ती थेट पुणं गाठलं!... घरी जाऊन त्या दोघींना कोण तोंड देईल तोफ डागल्यावर त्यांनी?

पण साहेबांनी आमचं ऐकलं हं ! कारण ती इंग्लंडची महाराणी भारतात यायच्या आदल्या दिवशी ह्या दोघींचा फोन आला, ‘‘आम्हा दोघींचे साज झक्कासपैकी आलेत !... तुम्हाला काय हवं?’’

‘‘तुमचं डोंबल!’’ मी पण प्रतिसाद घातला खरा पण मग उगाचच जीव हळहळला, ‘‘साहेबांजवळ एवढे पैसे कुठले?’’ आणिक जी मग गप्प गप्प झाले की विचारू नका. साहेब थोडेच श्रीमंत तेव्हा असला हट्ट करावा आपण? माझाच जीव मला खाऊन घेऊ लागला न् नजर डबडबून गेली!.. तर आमची अशी गंमत!.. जीवघेणी!..

पण म्हणून साहेबांनी माझा कधीच रागराग केला नाही. त्यांनी मग मला एकदाच दरडावून सांगितलं; ‘‘तू अंगावर दागिने घालून मिरवायचं नाहीस! आई अण्णांना सांगावं लागेल नाहीतर!’’ त्यासरशी आम्ही एकदम शरणागती पत्करली, ‘‘एकदम कबूल! कध्धी काही मागणार नाही यापुढं! मग तर झालं?’’आणि झालं गेलं आईअण्णांना सांगीत स्वारी बसली की, एक दिवस घरी येऊन चुलीपुढं पाट मांडून आईच्या हातचं गरमागरम चवीनं खात!

‘‘आई’’ म्हणजे साहेबांचा मोठ्ठा वीक पॉर्इंट! मग ती त्यांची आई असो की, त्यांच्या मित्रांची आई असो. साहेब तिथं एकदम नतमस्तक! आईच्या हातचं पोटभर खाऊन, तांब्या तोंडाला लावून पोटभर पाणी पिऊन, ढेकर दिला की, साहेब प्रसन्न न् आई खूश! बास! एवढ्या शिदोरीवर पुढची वाटचाल दणकून होणार न् आईनं मायेनं पाठीवरून फिरवलेल्या हाताच्या उबीला सांभाळीत साहेब दिलखुलास कामाला लागणार.

तर आम्ही पुण्याला घर बांधलं तेव्हाची गोष्ट. आमच्या आई अण्णांनी बोलावलं तशी वसंतदादांना घेऊन साहेब पुण्याला आले. मोठा मुलगा म्हणून जमलेल्या मंडळीचे आगत स्वागत मांडीत सर्वांना घेऊन घरात प्रवेश करते झाले. तशी लोकांनी टाळ्या वाजविल्या न् साहेबांकडून पेढे घेतले हं! तर साहेब कसे म्हणतात. ‘‘आमची ही मंडळी पुण्यात आली खरी पण कशी स्थिरावतात याची मला पार काळजी लागली होती. मराठमोळ्या माणसांनी पुणेकरांशी सर्वार्थानं सामना करीत जगणं म्हणजे भारी अवघड. पण अण्णा आर्इंनी न् अक्कातार्इंनी इथंही आपलं वैशिष्ट्य राखून बाजी मारली. मला समाधान आहे. हे माझं घर आहे. इथल्या विपुल ग्रंथसंपत्तीत मनसोक्त विहार करायला मी इथं वरचेवर विश्रांतीला येईन.’’... त्यासरशी आमच्या अण्णांनी त्यांच्या हातात घराच्या किल्ल्या दिल्या न् म्हटलं, ‘‘तेवढ्यासाठीच तर घर बांधलंय!’’

साहेबांची नजर त्यावेळी कृतज्ञतेतल्या समाधानानं ओली झाली. वातावरण या सुखसोहळ्यात मंत्रमुग्ध होऊन गेलं

आपल्या माणसांत मनमुराद हास्यविनोद करीत घटकाभर स्वत:ला हरवून बसावं हा साहेबांचा आवडता छंद. आम्ही सगळेच एकमेकांच्या सहवासात असा आनंद पोटभर भोगू शकलो हे आमचं परमभाग्य.

भाग्यावरून गोष्ट निघाली म्हणून सांगते. आमच्या बाबासाहेब पुरंदरेंनी एक दिवशी कानगोष्ट केली. ‘‘प्रतापगडच्या देवीची स्थापना होऊन तीनशे वर्षे झालीत. तुम्ही यशवंतराव साहेबांना महापूजा करायला लावा. महाराष्ट्राचं कोटकल्याण होईल.’’...मग काय? आम्ही लगेचच साहेबांना कळवून टाकलं न् हे झालंच पाहिजे अशी वेणूतार्इंकडे कळ लावली.

होता होता महाबळेश्वरला काँग्रेस कार्यकर्त्याचे एक शिबीर भरलं. तिथं या कल्पनेनं आकार घेतला. बासष्टची निवडणूक येऊन ठेपलेली. तर साहेबांनी घेतलं मनावर ‘न् ‘‘ठीक आहे. सर्व व्यवस्था व्हावी.’’ असा संदेश आला. त्या वेळी फलटणच्या राजांनी, मालोजीराव निंबाळकरांनी, हे यजमानपद स्वीकारलं न् कामाची डागडुजी निघाली. राजेसाहेब साहेबांचे सासरे ना? त्यांनी आम्हाला प्रतापगडावर नेलं न् राजा येणार आहे देवदर्शनाला तर कडेकोट बंदोबस्त हवा म्हणून गडावरील सगळे काने कोपरे, पाऊलवाटा, बुरुज अशी इकडे तिकडे भटकंती करायला लावली तर फिरून हैराण व्हायला झालं. तशी मी महाराजांना म्हटलं देखील, ‘‘अहो, आपलेच तर साहेब येणार आहेत मग एवढं कशाला?’’ त्याउपर त्यांनी सांगितलं, ‘‘म्हणून काय झालं? गडावर सगळं ठाकठीक हवं. आपण बरोबर असा. उणंदुणं निघायला नको.’’