• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३८-३

आता आली का पंचाईत? आम्हाला टेहळणी बुरुजांची भटकंती निभणार नाही म्हणून सांगायचं कसं? त्यातून मालोजी राजे म्हणजे वेणूतार्इंचं माहेर. मुकाट्यानं सारा फेरफटका केला तर वेणूतार्इंचा निरोप आला, ‘‘देवीला महावस्त्रालंकार लागतील!’’ हाय रे भगवान! आता? पण राजेसाहेबांनी हे साहेबांच्या कानावर घातलं. तशी व्यवस्था केली. सातारच्या राणीसाहेब आल्या. बाळासाहेब देसार्इंनी सर्वांना गडावर यायचं निमंत्रण केलं. माणसं आली न् झोकात या महापूजेचा सोहळा पार पडला. साहेबांनी देवीच्या साक्षीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला न् त्यांनी इतिहासकालीन प्रसंग साक्षात नजरेत भरतील अशा झोकनोकाचं भाषणं केलं. जमलेल्या मित्रमंडळींबरोबर जेवणखाण करतेवेळी पोटभर गप्पागोष्टी झाल्या. बाळासाहेब देसाई न् ते बराच वेळ बोलत राहिले...मालोजी राजांशी कानगोष्टी झाल्या...आम्ही सगळे गड उतरून आलो... जिवाला एकदम शांती आली. मित्रमंडळात राहिलं की, आयुष्यातलं सर्वोत्तम सुख भोगणा-या साहेबांचीही कळी खुलली... ग. दि. माडगूळकर अण्णा आलेवते तर काव्यविषयक चर्चेला ऊत आला... साहेबांच्या मधल्या कवीनं मान वर केली आणिक जो आनंद सोहळा महाबळेश्वरी साजरा झाला त्याला तोड नसावी!

साहेब मुळातच भारी रसिक माणूस. संगीत, नाटक, नृत्य, लोकनाट्य यातला कलाविलास त्यांची ब्रह्मानंदी टाळी लावू देणारा प्रांत!... तास न् तास अशा मैफलीत त्यांचा जीव रमायचा!..

मला आठवतं. १९६८ सालच्या १मे ची गोष्ट. मी नुकतीच राज्यसभेत गेलेली. तर त्या दिवशी महाराष्ट्रदिनाची धूमधाम चाललेली. सायंकाळी रसिकांसमोर महाराष्ट्राचं लोकनाट्य रंगमंचावर आलेलं. तिथं मी न् साहेब पुढल्या रांकेत!... होता होता एक कलावंतीण पदराचा मोरपिसारा उडवीत नाचत नातच पुढं आली तशी कुणीतरी खेड्यातल्यागत शिट्टी मारली म्हणताना शेजारी बसलेल्या पु. लं. ना साहेबांनी हळूच सांगितलं., ‘‘आक्काताई आलीय. त्या माणसाला जरा बेतानं घे म्हणावं!’’... त्यासरशी पुन्हा ती शिट्टी वाजली न्
मी बोलून गेले, ‘‘काय हे?... इथं कशाला ही असली दाद?’’ म्हणताना कोणतरी कुजबुजलं, ‘‘इथं कशाला आलीय आक्काताई? तिला घरी पाठवा.’’

हे ऐकलं मात्र न् मी चटदिशी उठून तिथून काढता पाय घेतला!... साहेब पाठोपाठ आले न् त्यांनी डोंगरेंना सांगितलं, ‘‘हिला घरी पोचवून द्या’’ आणि स्वत: पुन्हा त्या संगीत सभेत जाऊन बसले...आहे की नाही म्हणजे? ... अस्सा राग आला पण करणार काय? जाम बोलले नाही दोन दिवस त्यांचेशी तर!...

पण आमच सातारी घराणं ना? तमाशाला बायकांनी गेल्यावर राहिलं काय? ...साहेब पुढारलेले खरे पण डोक्यात हीच संस्कृती ना? ...आम्ही पण मग म्हटलं, ‘‘जाऊ देत! देखा जायेगा!’’ ...तर काय? ....उगीच हे नको ते नको म्हणजे?

आता आणखीन एक सांगू? आमच्या पुण्याच्या शाहूमंदिर महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभाला पं. जवाहरलाल नेहरूंना बोलावलेलं. तर त्या वेळी बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे आणखी कोण कोण चिक्कार आलेले. त्या वेळी स्वागत गीतासाठी व्यासपीठाच्या एका कोप-यात तंबोरा घेऊन मी बसलेली बघून साहेब आश्चर्याने थक्क झाले! त्यांना मी गायला बसावं हे आवडलं नाही असं त्यांचा चेहरा बोलला पण मी तोवर तंबोरा छेडायला सुरुवात केली! पेटीवादकासह इतरांना खुणावीत स्वर लावला पण!...

चढले उंच निशाण

करूनी नव भारत निर्माण

या मीच लिहिलेल्या गीताची आळवणी एवढी सुरेख झाली की, पंडितजींनी ‘बहोत अच्छा’ म्हटल्यासरशी साहेबांनी त्यांना सांगून टाकलं, ‘‘ही माझी धाकटी बहीण हिला आमच्या सांस्कृतिक जीवनाची सगळी माहिती विचारा. सांगेल ती!’’ ...आणि एरव्ही माझ्या लोकगीत गायनाची सर्वांकडून वाहवा ऐकताना खूश होणारे साहेब मला एका बाजूला बोलावीत म्हणाले कसे, ‘‘हे साहित्य संमेलन नव्हे! ...पुन्हा असं नकोय!’’ ...

तेव्हापासून साहेबांसमोर मी कधी साहित्य संमेलनाखेरीज लोकगीत म्हटलं नाही की, तंबोराही हाती धरला नाही!... एरव्ही आमच्या लेखनाची तारीफ करणा-या साहेबांना आमचं हे असलं वागणं खपत नव्हतं ना?