शब्दाचे सामर्थ्य ४२

दहा-बारा वर्षांचा असेन मी. असाच एकदा वाईच्या खो-यात असलेल्या मेणवली गावी गेलो होतो. मेणवलीला नाना फडणविसांचा टोलेजंग वाडा आहे. तो मी पाहिला. पण मेणवलीच्या कृष्णाकाठावर, कृष्णेच्या घाटाचे शिल्प मोठे सुंदर आहे, कलापूर्ण आहे. या घाटावर उभे राहिले की, कृष्णामाईचे लांबच लांब पात्र दिसते आणि महाबळेश्वर सोडून निघाल्यानंतर ज्या डोंगर-द-यांतून कृष्णामाई झेपावत पुढे येते, ते खोरे समोर उभे दिसते. नितांतसुंदर, रम्य असे हे ठिकाण. माझ्या ते चांगलेच लक्षात राहिलेय्.

महाबळेश्वरात एकाच ठिकाणाहून पाच नद्या उगम पावतात आणि डोंगरातून वेगवेगळ्या अंगांनी वाटा काढीत, सपाटीवरून धावताना दिसतात. या पाच भगिनींचे एकमेकींवरचे प्रेम मोठे अमर्याद. जन्माच्या ठिकाणी त्या आपले आगळे अस्तित्व दाखवतात, पण ते क्षणभरच. फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे, असे दिसावे, तोच त्या एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर उडी घेतात. उडी घेताना यांतील कृष्णा कोणती, वेण्णा कोणती, कोयना कोणती किंवा भागीरथी, सरस्वती कोणती, हे ओळखता येत नाही. दिसते, ती एक धार. गोमुखातून ही स्वच्छ धार कुंडात उडी घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटा काढीत पाच बाजूंनी पाच भगिनी निघून जातात. पुढे कुठेतरी मग डोंगरावरून खाली उडी घेताना दिसतात. भागीरथी आणि सरस्वती गुप्त मार्गाने वाहत राहूनच आपल्या मोठ्या बहिणीला रस्त्यात कोठेतरी भेटतात, अशी आख्यायिका आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी, उगमापासून काही मैलांच्या अंतरावरच पाचही भगिनींचा मिलाफ होतो आणि कराडपासून पुढे या सर्वजणी कृष्णामय बनूनच सागराला भेटायला जातात. जरा थोराड अंगाची कोयना कराडला आपल्या भगिनीला, कृष्णामाईला कडकडून भेटते. संगमावर मग आनंदाचा कल्लोळ होतो. या ठिकाणी पोहोचलेल्या या सर्व जणींचे पंचामृत मोठ्या पात्रात साठते आणि चविष्ट, सुंगंधित बनून पांथस्थांची तहान शमविण्यासाठी पुढे आणि पुढेच, महाराष्ट्र ओलांडून आंध्रात पोहोचते. पाचही भगिनींचे सागराशी मग एकाच वेळी मीलन होऊन जाते.

सबंध कृष्णाकाठ हा एक माझ्या प्रेमाचा, आवडीचा विषय आहे. महाबळेश्वरातल्या, उगमापासून निघून कृष्णेच्या काठाकाठाने थेट राजमहेंद्रीपर्यंत, तिच्या मुखापर्यंत जावे, असे माझे फार दिवसांचे स्वप्न आहे. बदलत्या पात्राची भव्यता पाहावी, निसर्गशोभा मनात साठवावी, गावोगावच्या लोकांना भेटावे, त्यांच्या चालीरीती पाहाव्यात, पिके डवरलेली शेती पाहावी, असे सारखे मनात येत असे. अजूनही येत राहते. श्रावणसरी कोसळू लागल्या की, कृष्णामाईची याद मनात हटकून येते.

श्रावण सुरू झाला, की आणखी एक आठवण मनात येते. ही आठवण होते ‘आगाशिव’ डोंगराची. कराडपासून दीड-दोन मैलांवरील हा आगाशिव. डोंगरावर महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे आणि लेणी आहेत. दर श्रावण सोमवारी पुष्कळ शिवभक्त आगाशिव चढून महादेवाच्या दर्शनासाठी जात असतात. मुलांना आनंद असतो, तो लेणी पाहण्याचा आणि दिवसभर डोंगरावर भटकत राहून निसर्गाच्या सोबतीने खेळण्याचा. आम्ही विद्यार्थी शनिवार-रविवार गाठून हमखास जात होतो.

एकदा ज्ञानकोशकार केतकर यांना आगाशिव पाहण्यासाठी नेल्याची एक आठवण माझ्या मनात कायमची राहिली आहे.

कराडच्या हायस्कूलमधील गणेशमंडळाच्या त्या वेळी मी चिटणीस होतो. ज्ञानकोशकार केतकर उत्सवातील व्याख्याते म्हणून त्या वेळी क-हाडला आले होते. बोलता-बोलता ‘आगाशिव’ चा उल्लेख निघाला, तेव्हा तो डोंगर, ते स्थान एकदा पाहावे, असे केतकरांच्या मनाने घेतले. माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला.