शब्दाचे सामर्थ्य २५४

माझ्या व्यक्तिगत, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात संघर्षाचे, श्रद्धा दोलायमान करणारे, जीवननिष्ठा दोलायमान करणारे प्रसंग निर्माण झाले. घटना शिजल्या. त्या प्रत्येक वेळी जीवननिष्ठा आणि श्रद्धा अधिक मजबूत, बळकट करण्याची ती एक संधी मी मानली. लोकांवरील, लोकशाहीवरील श्रद्धेच्या बळावर राष्ट्रनिष्ठा, समूहनिष्ठा, मानवतेवरील निष्ठा जीवननिष्ठेपासून अलग होऊ दिल्या नाहीत. एरवी हे जीवन निर्माल्य बनले असते.

व्यक्तिगत आणि राष्ट्राच्या, पक्षाच्या कठीण प्रसंगातही काँग्रेस पक्षाच्या बाजूला प्रमुख प्रवाहापासून, लोकगंगेपासून मी बाजूला झालो नाही. याचा अर्थ कुणी संधी-साधू असाही केला असेल. करोत बापडे! परंतु एकाकी व्यक्ती कसलाच विकास करू शकत नाही. स्वतःचाही आणि लोकांचा, राष्ट्राचाही नाही. लोकशाहीच्या वर्तुळात एकदा स्वतःला झोकून दिल्यानंतर त्या वर्तुळापासून आपण निराळे होऊ शकत नाही, राहू शकत नाही. तसे झाले, तर स्वत्वच नष्ट पावते.

स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे होमकुंड, यज्ञकुंड देशात धगधगल्यानंतर त्यांतलाच एक निखारा म्हणून मी राहिलो, तो संधी म्हणून नव्हे, यज्ञकुंड धगधगत राहावे, यासाठी राहिलो. 'संधीसाधू' हा शब्दही त्या काळात माझ्या पिढीच्या आसपास वावरत नव्हता. निखारा बनून राहण्याचे आमच्या पिढीने स्वीकारले, ते संधी म्हणून नव्हे, कर्तव्य म्हणून. संधीसाधूपणाने यज्ञकुंडातून बाहेर पडतो, तो एकटा निखारा धगधगता राहू शकत नाही. त्याची राख होते. राख होऊ द्यावयाची, ती संकुचित भावनांची, क्षुद्रतेची. आमच्या पिढीने ती पूर्वीच केली. संघटनेच्या, समूहाच्या महान यज्ञात सातत्याने जळत राहून आपले आणि राष्ट्राचे जीवन तेजस्वी बनविण्याचे, उन्नत करावयाचे, हाच ध्यास राहिला.

जीवन सश्रद्ध बनल्यामुळेच हा निर्णय आणि कृती मी सावधतेने करू शकलो. राजकारणप्रधान राष्ट्रप्रपंच (Politics) करताना 'सावध' असावेच लागते. हे 'सावध' पण सर्वांविषयी ठेवावे लागते. जोडीला साक्षेप, अत्यंत साक्षेपही ठेवावा लागतो. राजकारणी असणे वेगळे आणि साक्षेपी राजकारणी असणे वेगळे, असा माझा अनुभव आहे. राजकारणी जीवनाचा हा एक शोध म्हणावा, हवे तर.

'जीवनाचा अर्थ' शोधण्यात वर्षामागून वर्षे गेली. पण हा शोध 'मी कोण?' या आशयाचा, अध्यात्माचा शोध नव्हता. तो शोध घेणा-यांची मनःस्थितीच वेगळी असते. त्यांचा शोध पूर्ण होतो, तेव्हा ते स्वतःचे असे राहत नाहीत, असा बोध त्यांच्या सिद्धावस्थेच्या वागण्यातून, कृतिशीलतेतून, उपदेशातून आणि एकूण चरित्रातून आपल्याला होतो. अशी काही निवडक चरित्रे मी वाचली आहेत.

'मी कोण?' हा विषय अंतर्मुख बनून विचार आणि निर्णय करण्याचा विषय आहे. व्यवहारी जगाच्या वर्तुळापासून पूर्णतः वेगळा 'मी कोण?' याचा त्या भूमिकेतून, अंतर्मुख बनून मी विचार करू शकलो नाही. त्यासाठी अवसर मिळाला नाही. तरी पण त्या मांडवाखालून मी गेलो आहे.

लहानपणी कराडच्या एका मठात मी कथा, प्रवचन, भजन, कीर्तन, पुराण, सप्ताह ऐकले. आईबरोबर मठात जाणे, ऐकणे घडले. परंतु मी राजकारणप्रधान राष्ट्रप्रपंच करणारा माणूस - तो विषय कवटाळून बसू शकलो नाही.

पण त्याची मनाला खंत नाही. मी जीवनाचा शोध केला, पण तो वेगळा. त्यातून बोध झाला, तो एवढाच की, 'बुद्धिनिष्ठा, नीतिनिष्ठा, ध्येयनिष्ठा, देशनिष्ठा आणि या सर्वांना ओलांडून जाणारी मातृनिष्ठा हे जीवनाचं पंचामृत आहे.'

कसेही चाखावे, एकत्रितपणे किंवा अलग-अलग, अनुभूती एकच – समाधान !