शब्दाचे सामर्थ्य २५५

८१

सातव्या मजल्यावरील चढ

६० ते ६२ ही दोन वर्षं उलटली, तेव्हा महाराष्ट्राच्या भवितव्याची मोठी सफर सुरू झाली होती. ती सफर लांबची होती, कष्टाची होती. जनप्रेमाच्या शक्तीनंच महाराष्ट्र स्थिर करायचा होता. भाग्य घराशी आलं होतं. भाग्यवान बनायचं होतं.

त्याची आखणी करण्यात मन गुंतलं होतं. महाराष्ट्र घडविण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र हे मी साधन मानलं होतं. प्रमुख प्रश्न होता विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा भाग यांची मनं एक होण्याचा! चांगलुपणाची भावना वाढण्यासाठी जातिवादाचा निरास करायचा होता. दलित समाजाविषयीची उपेक्षा सोडण्यासाठी मनं तयार करायची होती. महाराष्ट्रात राजकीय जागृती चांगलीच निर्माण झालेली होती. पण या जागृतीला अखिल भारतीय, राष्ट्रीय दृष्टिकोन प्राप्त होणं महत्त्वाचं होतं. कारखानदारी व शेती वाढवायची, शहरं आणि खेडी यांतील अंतर कमी करायचं, शिक्षणाचा प्रसार आणि पुनर्रचना करायची, असं कितीतरी मनात जमा होत राहिलं होतं. हे व्हायचं, तर कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सर्वांचं सहकार्य हवं होतं. स्थिती होती, ती अशी, की महाराष्ट्रात काँग्रेसविरुद्ध सर्व पक्ष एकत्र आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वादातून हे पर्व सुरू झालं होतं. तरीपण जनतेची भावना मला विकृत किंवा उपेक्षणीय कधीच वाटली नाही. लोकांच्यावर माझा विश्वास होता. मला त्यांचाच आधार वाटत होता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर लोकप्रेमाचं दर्शनही मला तंस घडलं. संयुक्त महाराष्ट्राच्या  चळवळीच्या वेळचा अनुभव माझ्या संग्रही होताच आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनोहारी दर्शन मी नंतर घेत होतो. अगोदर सुख, की अगोदर दुःख, हा वाद निरर्थक आहे, असं मला नेहमीच वाटतं. निसर्गाचे खेळ निसर्गनियमानंच चालणार. वाटचाल करायची, ते सारं गृहीत धरूनच! महाराष्ट्राची ती वाटचाल सुरू झाली होती. घोडदौडीनं या काळात महाराष्ट्र पुढे आणि पुढेच जात राहिला.

त्याच वेळी भारताच्या उत्तर सीमेवर चीनचं आक्रमण झालं आणि एक नवाच पेच उभा राहिला. १९६२ च्या ऑक्टोबर महिन्यात चीनचं सैन्य भारी शक्तीनं चालून आलं होतं आणि भारताच्या स्वातंत्र्यालाच एक प्रकारचं आव्हान दिलं गेल होतं. शत्रू पुढं सरकत होता आणि भारताचं सैन्य मागे रेटत होता. अशा त्या आणीबाणीच्या आणि देशात हाहाकार उडालेल्या काळात पंतप्रधान पं. नेहरू यांनी संरक्षण खातं स्वतःकडे घेतलं होतं. देशात उलटसुलट चर्चा झडत होत्या. संरक्षणमंत्री श्री. कृष्ण मेनन यांच्या संदर्भात काही बोललं जात होतं आणि सारा देश या आक्रमणानं चिंतातुर बनवला होता. महाराष्ट्र विकासाची स्वप्नं आम्ही इकडे पाहत होतो. सुखाचं बोट धरून चालण्याच्या प्रयत्‍नात होतो. पण माझी संकटांची सोबत संपलेली नव्हती आणि एक दिवस भारताच्या संरक्षण खात्याची सूत्रं स्वीकारण्याची - संरक्षणमंत्रिपद स्वीकारण्याची आज्ञा आली. पंतप्रधान पं.नेहरू यांनी आपला मनोदय व्यक्त केला होता. मला ती आकांक्षा होती. त्यानुसार २१ नोव्हेंबर, १९६२ ला मी दिल्लीत दाखल झालो आणि नव्या जबाबदारीचा स्वीकार केला.

चीननं आक्रमण ६२ मधेच आवरलं होतं. पण त्यातून संरक्षणसिद्धतेची फार मोठी समस्या उभी राहिली होती. सेनादलाचे तिन्ही विभाग जय्यत करण्याच्या प्रयत्‍नात असतानाच मनावर फार मोठा आघात करणारी घटना घडली. हा आघात सार्‍या भारतावरच होता, पं. नेहरू निघून गेले. त्यातून सावरलो जातो, न जातो, तोच पाकिस्तानचं ६५ सालचं आक्रमण झालं. एक मोठं संकट पश्चिमेच्या बाजूनं पुढे सरकलं. पण जवान होते जिद्दीचे. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जिद्दीचे. 'कम व्हॉट मे' - त्यांनी पुकारा केला. जवानांपर्यंत हा पुकारा पोचला. मात्र, त्यांनी मारलेल्या मुसंडीनं शत्रूनं पळ काढला. पाकिस्तानच्या भूमीतच आमच्या जवानांनी आपल्या राष्ट्रध्वजाला मग वदंन केलं. या विजयाची चर्चा सुरू होती. उलटसुलट अर्थ लावले जात होते. सरकारला काही सांगितलं जात होतं. त्याच वेळी 'ताश्कंद' घडलं आणि या ताश्कंदनं 'गड आला; पण सिंह गेला' अशी अवस्था निर्माण केली.