शब्दाचे सामर्थ्य २२३

गोपाळराव ओगल्यांच्या संपादकत्वाखाली नागपूरलाही 'महाराष्ट्र' या नियतकालिकाने असेच मानाचे स्थान जनतेत मिळविले होते. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'बहिष्कृत भारत', 'समता' ही साप्ताहिके काढली. गांधी आणि टिळक यांच्या विचारांचा संगम घडवून समाजवादाच्या विचारसरणीचा पुरस्कार आचार्य जावडेकर यांनी केला. अनेक तरुणांना या विचारसरणीकडे त्यांनी ओढले, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. साने गुरुजींचाही या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. त्यांनीही वृत्तपत्रीय लेखनातून हीच विचारसरणी आपल्या तळमळीच्या शब्दांनी मांडली. स्वा. सावरकर यांनी हिंदू समाजाच्या रूढींवर वृत्तपत्रांतून सामाजिक लेख लिहून हल्ले चढविले. 'गाय हा उपयुक्त पशू आहे, माता नव्हे' अशांसारखे प्रखर बुद्धिवादी विचार सावरकरांनी मांडले.

सारांश, सुबुद्ध मराठी समाजाच्या वैचारिक घडणीचे कार्य या काळात वृत्तपत्रांनी केले. या काळात अनेक वाद निर्माण झाले. पण त्यामुळे वैचारिक सहिष्णुता वाढली. ही सहिष्णुता व राजकीय जागरूकता लोकशाही रुजविण्यासाठी आवश्यक असते. हे कार्य मराठी पत्रांनी केले.

वृत्तपत्रांना आणखीही एका दृष्टीने महाराष्ट्रात महत्त्व आहे. त्यांनी ज्ञानाच्या खिडक्या उघडल्या. त्यांतून पुरोगामी विचार समाजापुढे आले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक विचारांची मूलभूत चर्चा त्यांनी केली.

याखेरीज विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरि नारायण आपटे, खाडिलकर, न. चिं. केळकर यांसारख्यांनी साहित्याच्याही चळवळींना वृत्तपत्रांतून स्थान दिले. जनतेची रसिकता व जिज्ञासा वाढविली. असा हा सर्वांगीण विकास मराठी वृत्तपत्रांनी घडवून आणला आहे.

स्वातंत्र्याच्या इतिहासात जसे असंतोषाला स्थान आहे, तसे रचनात्मक विचाराला, विधायक वृत्तीला व सर्जनशील प्रतिभेलाही आहे, नव्हे, त्याची अत्यंत गरज आहे. हेच मराठी वर्तमानपत्रांच्या इतिहासावरून स्पष्ट होते. म्हणून स्वातंत्र्याच्या कल्पनेचा सर्वंकष व प्रगल्भ असा आविष्कार मराठी वृत्तपत्रांनी केला, हेच त्यांचे वैशिष्ट्य होय.

जेव्हा स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा केवळ राजकीय आंदोलनाचा विचार करणे एकांगी ठरेल. कारण स्वातंत्र्य ही एक भावना आहे. ती एक प्रवृत्ती आहे, तो एक जीवनाचा मूलमंत्र आहे, आणि समाजाच्या सर्व व्यवहारांतून त्यांचे दर्शन झाले पाहिजे, तरच स्वातंत्र्य ही नकारात्मक कल्पना ठरणार नाही. स्वातंत्र्य - लढ्यातील मराठी वर्तमानपत्रांच्या कामगिरीकडे याच दृष्टीतून पाहिले पाहिजे, तरच तिचे यथार्थ ज्ञान होईल.