या वातावरणात आमच्या तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक १०-१२ जानेवारीच्या सुमारास तांबवे येथे आम्ही भरवली. त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यकर्त्यांमध्ये काशिनाथपंत देशमुख आणि राघूअण्णा लिमये हे प्रमुख होते. या बैठकीत काही महत्त्वाचे कार्यक्रम ठरले. ग्रामीण भागात जंगल सत्याग्रह संघटित करावयाचा आणि जितके जास्तीत जास्त सत्याग्रही कारागृहात पाठविता येतील, तितके पाठवावयाचे, असा निर्णय झाला आणि त्याची जबाबदारी राघूअण्णा लिमये व काशिनाथपंत देशमुख यांनी आपल्यावर घेतली.
खुद्द कराड शहरातील २६ जानेवारीची तयारी करण्याचे काम मी माझ्या मित्रांच्या गटाकडे सोपविले. तालुक्याच्या महत्त्वाच्या चार-दोन गावांमध्ये कार्यक्रम संघटित करण्यासाठी मी दोन दिवसांची सायकल-रपेट केली. १५ जानेवारीला संध्याकाळी कराडला परत आल्यानंतर आखलेल्या कार्यक्रमाची कल्पना माझ्या मित्रांनी मला दिली. ती अशी, की शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी रात्रीचे झेंडे लावावयाचे, त्यांत म्युनिसिपल कचेरीवर तिरंगी झेंडा लावणे ही मुख्य कल्पना होती. आमच्या मित्रमंडळींनी कायदेभंगासंबंधी लिहिलेली पत्रके व गांधींच्या अटकेबद्दल सरकारच्या निषेधाच्या घोषणा रात्री गावातील प्रमुख ठिकाणी चिकटवायच्या व हायस्कूलमधल्या आम्ही मुलांनी हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या झाडावर झेंडा चढवून दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता झेंडावंदन करायचे. त्याचप्रमाणे आम्ही कामाला लागलो.
एका गटाने रात्री ११ च्या पुढे गुप्तपणे जाऊन म्युनिसिपल कचेरीवर झेंडा चढविला. दुसर्या दिवशी सकाळी ८ वाजता ठरवल्याप्रमाणे आम्ही आमच्या हायस्कूलच्या पटांगणातील झाडाभोवती जमलो, आमच्यापैकी एकाने झाडावर चढून झेंडा फडकविला आणि आम्ही सर्वांनी ध्वजवंदन करून झेंड्याला सलामी दिली. ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा दिल्या. नंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम समाप्त केला आणि आपापल्या घरी परतलो. परंतु शाळेच्या तपासणीसाठी आलेले एज्युकेशनल इन्स्पेक्टर समोरच्या बहुलेकरांच्या बंगल्यात मुक्कामास होते. त्यांनी आमचा झेंडावंदनाचा हा कार्यक्रम चालू असतानाच तपशीलवार पाहिला होता. त्यांनी हे सर्व पहिल्यानंतर शाळेच्या प्रमुख अध्यापकांकडे चौकशी सुरू केली.
इकडे पांडूतात्या डोईफोडे यांना पोलिसांनी पकडल्यानंतर आणखी कोण कोण साथीदार आहेत, यांची चौकशी केली. तेव्हा मी समजून चुकलो, की माझे नाव सांगितले जाणार आणि अटक होण्याच्या तयारीनेच शाळेत जायला पाहिजे. त्याप्रमाणे ११ वाजता मी नित्याप्रमाणे शाळेत गेलो. शाळा सुरू झाली आणि माझ्या वर्गात बसलो. शाळेचा तास चालू होता, पण माझे त्यात लक्ष नव्हते. शाळेचा चालू असलेला तास संपण्यापूर्वीच हेडमास्तर एका पोलिस अधिकार्याला घेऊन आमच्या वर्गात आले, मला बाहेर बोलावून घेतले.
आम्ही हेडमास्तरांच्या कचेरीत गेल्यानंतर पोलिस अधिकार्याने सकाळच्या झेंडावंदनाची आणि बुलेटिनची वगैरे माहिती विचारली. तात्या डोईफोडे यांनी माझे नाव सांगितले असल्याची गोष्ट मला सांगितली, त्यांना मी सांगितले, ‘हो, मी हे सर्व केले आहे आणि असे करत राहण्याचा आमचा निर्धार आहे.’
पोलिस अधिकार्याने हेडमास्तरांना सांगितले, ‘मी ह्या विद्यार्थ्याला अटक करतो आहे आणि घेऊन जातो आहे. त्याच्या पालकांना कळवा.’
.... आणि अशा रीतीने माझी पहिली शास्त्रशुध्द अटक झाली. काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी मला आणि तात्या डोईफोडे यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले. आम्हांला आमच्यावरचे आरोप वाचून दाखविण्यास आले. आम्ही गुन्हा कबूल केला.
मॅजिस्ट्रेटचे काम सोपे होते, त्याने तातडीने आम्हांला अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली आणि खटल्याचे काम संपले.