शब्दाचे सामर्थ्य २१

वडिलांनी दारिद्रयात आणि अर्धपोटी अवस्थेतच जगाचा निरोप घेतला होता. आम्हां मुलांना जगवण्यासाठी आई हाडाची काडं करीत होती. दिवसभर कष्ट करावे आणि संध्याकाळची चूल पेटवावी, असं तिचं जीवन. कष्ट, कष्ट आणि कष्ट हेच तिच्या जीवनाचं सार. आम्हांला धीर देणं हे तिच्या कष्टाचं आणखी एक अंग होतं. पण मला आईचं मोठेपण दिसत होतं, अनुभव येत होते, ते तिच्या मनाच्या मोठेपणाचे ! मुलं परिस्थितीनं दुबळी आहेत, याची बोच आईच्या मनाला होती.‘नका, बाळांनो, डगमगू,’ही तिची ओवी मी ऐकत होतो. त्यामुळं माझं अवसान दुप्पट होत असे. परिस्थितीनं माणसं स्वार्थी बनतात, एकमेकांचं शत्रुत्व करतात, आपल्यापुरतं पाहतात, हे मी अवतीभोवती पाहत होतो. अनुभवीत होतो. पण घरात एक वेळेला चूल पेटविणारी आई या सा-याच्या पलीकडची होती. जेवणवेळेला कुणी आलं, तर आपल्या घासातला अर्धा घास घालण्यासाठी ती बेचैन असे. कुणी नको म्हटलं, तर रागवायची.

विठाईनं म्हटलं होतं:
‘तुझा माझा भाऊपणा । भाऊपणाला काय देऊ ।
एक लवंग दोघी खाऊ ॥
साधूला मेजवानी घाली मणाचं पुरण ।
खाली साखरेचं आळं, वर तुपाचं दुरण ।’

ही तिच्या मनाची तयारी होती. पण परिस्थितीनं तिला ते सुख तेव्हा मिळू दिलं नाही. हे मी पाहत होतो. जे माझ्या घरात होतं, तेच शेकडो आणि हजारो घरांत होतं. सारेच परिस्थितीनं अवघडलेले. माझ्या मनातल्या यातना माझ्या काही मित्रांच्या मनांतही होत्या, ते मला समजत होतं.

मनात परिस्थितीचं असं द्वंद्व. समोर मॅट्रिकची परीक्षा आणि अवतीभवती वाढत असलेली राजकीय चळवळ. त्रिकोणात उभं राहून माझं मन विचार करीत होतं. लोकमान्य टिळकांचा धगधगता राजकीय काळ संपून महात्मा गांधींकडे काँग्रेसची सूत्रं आली होती. भारताच्या स्वातंत्र्यसंपादनासाठी नव्या नव्या विस्तृत कल्पना महात्माजींनी रुजवण्यास प्रारंभ केला होता. देशाचं स्वातंत्र्य तर सार्‍यांनाच हवं होतं. महात्माजींना त्याबरोबरच आणखी काही घडावं, असं वाटत होतं. सामाजिक आणि आर्थिक न्याय त्यांना हवा होता. देशातल्या दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना भारत स्वतंत्र व्हायला हवा होता.

स्वातंत्र्यप्रयत्‍नांत आणि स्वातंत्र्याच्या इतिहासात ‘स्वातंत्र्य कशासाठी?’ या प्रश्नाला आणि स्वातंत्र्याच्या कल्पनेला निश्चित स्वरूप प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्‍न होता. देशात हे प्रथमच घडत होतं. साध्य आणि साधन याला निश्चित स्वरूप प्राप्त होण्याचा तो काळ ठरला. ब्रिटिशांच्या वसाहतवादाखाली भारतातील सामान्य लोकांचं जीवन चिरडून गेलं होतं.‘फोडा आणि झोडा’ या तंत्राचा आश्रय करून ब्रिटिशांनी इथलं सामाजिक स्वास्थ्य विस्कटून टाकलं होतं. जातीयवाद ठिकठिकाणी डोकं वर काढीत होता. काही ठिकाणी त्यानं मूळ धरलं होतं आणि ब्रिटिश राज्यकर्ते त्याला खतपाणी घालीत राहिले होते. समाजाला या मनोवस्थेतून बाहेर काढून राष्ट्रात ऐक्य आणि एकविचार प्रस्थापित होईल, यासाठी महात्माजी प्रयत्‍न करीत होते आणि त्यासाठी स्वातंत्र्य-चळवळीला एक वेगळं रूप देण्यासाठी ते पराकाष्ठा करीत होते.

देशातल्या तरुण मनांवर त्याचा अपेक्षित परिणाम घडत होता. त्यातून माझं तरुण मन बाजूला राहणं शक्यच नव्हतं. १९२७ पासूनच मी राजकारणातल्या घडामोडी वाचीत होतो आणि समजावून घेत होतो. १९३० सालात सत्याग्रह आणि प्रभातफे-या यांना उधाण आलं आणि मी त्यांत उडी घेतली. सामान्य लोकाचं जीवन माझ्यासमोर घडत होतं. ते जीवन अधिकाधिक गर्तेत जात होतं. त्या लोकांच्यासाठी, त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी काही तरी केलं पाहिजे, या विचाराचा मनावर जबरदस्त पगडा होता आणि त्यातूनच माझी पावलं शाळेत जाण्याऐवजी प्रभातफेरीकडे वळली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ब्रिटिश सरकारनं मला तुरुंगाची शिक्षा ठोठावली आणि शिक्षणाच्या रुळांवरून चाललेल्या गाडीचा सांधा बदलला. राजकारणाच्या रुळांवरून ती धावू लागली.

गांधीजी १९३१ च्या अखेरीस, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत परतले. तेव्हा त्यांच्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या वाढून उभ्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी देशातील अनेक नेते मुंबईस आले होते. पं. जवाहरलालजी यासाठीच मुंबईस निघाले असता त्यांना वाटेतच अटक झाली.