शिवाजी महाराजांसंबंधी रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ओळी घडाघड म्हणून दाखविणारी शेकडो माणसे आज आपणास बंगालमध्ये पाहावयास मिळतात. बुंदलेखंडात, हरियानात, राज्यस्थानात, उत्तर प्रदेशात किंवा बिहारमध्ये तुम्ही गेलात, की तुम्ही शिवाच्या मुलखातले ना, असे म्हणून तेथील खेड्यांतली माणसे शिवासंबंधीच्या ओव्याच्या ओव्या तुम्हांला सहज म्हणून दाखवितील. हे मी माझ्या गेल्या सहा वर्षांच्या प्रवासात अनुभवले आहे. तेथील माणसे महाराजांना महाराज म्हणत नाहीत, तर ते त्यांना शिवा म्हणून संबोधितात. शिवाजीमहाराजांचे नाव हे असे सर्वत्र पोहोचले आहे. महाराष्ट्रात अनेक कवींनी, शाहिरांनी त्यांची गीते गायिली आहेत. परंतु त्यांचे गीत एखाद्या प्रतिभासंपन्न कवीने महाकाव्याच्या रूपाने गाण्याची फार आवश्यकता होती ते काम आज यशवंतांनी घडवून आणले आहे. म्हणून मला आनंद होतो आहे.
राम आणि कृष्ण हे अवतारी पुरुष होते, असे आपण मानतो. पण व्यासांनी आणि वाल्मीकींनी मनात आणले नसते, तर राम आणि कृष्ण हे महापुरुषसुद्धा आज कुठे असते, परमेश्वरालाच माहीत. त्यांचे उत्तुंग जीवन शब्दबद्ध करण्यासाठी व्यासांची आणि वाल्मीकींची प्रतिभा फुलावी लागली. शिवाजीमहाराजांचे जीवन विशाल आहे, रोमहर्षक आहे, पण ते पिढ्यान् पिढ्या गायिले जाण्यासाठी प्रतिभावान कवीच्या स्पर्शाची गरज होती. आम्हांला आनंद हा आहे, अभिमान हा आहे, की आमच्या पिढीतले कवी यशवंत हे आज शिवरायाचे गीत गात आहेत. त्यांचे अभिनंदन करण्याचा माझा अधिकार नाही. त्यांचे कौतुक करण्याचा तर मुळीच नाही. माझा अधिकार फक्त त्यांच्याबद्दल अभिमान बाळगण्याचा आहे. मला आज आठवते की, कवी यशवंत जेव्हा बडोद्याच्या साहित्य संमेलनास गेले होते, तेव्हा त्यांनी तेथे स्वतःची 'दर्याखोर्यांतून आला कवी हा खास दरबारी' ही कविता म्हणून दाखविली होती. या कवितेत त्यांनी जे म्हटले आहे, ते खरे आहे. चाफळच्या मांडवीच्या काठी भटकत असताना 'न्यारीचा वकुत' झाल्याची मनातील गोड ओढ टिपणारा हा कवी आज शिवजीवनाच्या दरबारामध्ये महाकवी म्हणून प्रवेश करतो आहे, याचा आम्हांला खरोखरीच अभिमान आहे. यापेक्षा अधिक काय बोलावे मी या प्रसंगाला?
कवी यशवंतांचे सर्व साथी आज येथे उपस्थित आहेत. गिरीशांचे डोळे पाण्याने भरलेले पाहिले आणि आम्हां सर्वांचे डोळे भरून आले. घाट्यांसारखी, रानड्यांसारखी एका पिढीतील ही कर्तबगार माणसे येथे बसून आपल्या मित्राचे कौतुक पाहत आहेत. यशवंतांनी नव्याने हे जे काम हाती घेतले होते, त्याला आलेली ही सुंदर, सुगंधित फुले पाहून त्यांना आज अतिशय आनंद वाटत असेल. हे काव्य आता महाराष्ट्रातील जनतेच्या हातांत जाईल. सहित्यिक त्याचे समीक्षण करतील, विद्वान त्याचे कदाचित खंडनही करण्याचा प्रयत्न करतील. परंतु आम्ही सामान्य रसिक माणसे ते गात राहू, आवडीने गात राहू, एवढेच मी यशवंतांना सांगतो आणि माझ्या शुभेच्छा मी त्यांना देतो; आणि भाऊसाहेब खांडेकरांनी अतिशय उत्कटतेने म्हटल्याप्रमाणे संध्याकाळची सांजवात वार्याच्या झुळकेने मालवू नये, म्हणून जशी एखादी सौभाग्यवती तिला आपल्या पदराखाली घेऊन जाते, तशीच महाराष्ट्रातील जनता तुमच्या प्रतिभेची ही सांजवात आपल्या पदराखाली धरून राहील, असा विश्वास व्यक्त करून मी माझे भाषण पुरे करतो.