शब्दाचे सामर्थ्य १४३

५२

सोन्याचा सोहळा कवी यशवंत

कवी यशवंत यांच्या 'छत्रपती शिवराय' या महाकाव्याच्या प्रकाशन-समारंभाचे जेव्हा मला निमंत्रण आले, तेव्हा माझे मन काहीसे संकोचले. कारण साहित्यिकांच्या या व्यासपीठार आपण बसल्याने त्याची शोभा तर कमी होणार नाही ना, अशी शंका माझ्या मनात आली. पण यशवंतांबद्दल माझ्या मनात जो जिव्हाळा आहे आणि त्यांनी व प्रकाशकांनी ज्या प्रेमाने मला या प्रकाशन - समारंभासाठी निमंत्रण दिले, त्या जिव्हाळ्यामुळे आणि प्रेमामुळे त्यांना नाही म्हणणेही माझ्या जिवावर आले, आणि म्हणून मी आज येथे आलो आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहिला.

यशवंतांच्या पिढीतली बहुतेक सर्व माणसे आता सत्तरीच्या घरात आहेत. आम्ही शाळकरी मुले होतो, तेव्हा रविकिरण मंडळाची पुस्तके आम्ही पाहत होतो, आणि त्यांची नावे ओळीने वाचीत होतो. त्या रविकिरण मंडळाचे अनेक प्रकाशमान तारे आज येथे उपस्थित आहेत. कवी यशवंत आहेत, कवी गिरीश आहेत, घाटे आहेत, रानडे आहेत, त्याचप्रमाणे खांडेकरही आहेत. ज्यांच्या हातांखाली आम्ही शिकलो आणि जे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख आधारस्तंभ होते, ते माधव ज्यूलियन आज हयात असावयास पाहिजे होते. त्यांच्या आठवणीने माझे हृदय भरून येत आहे. त्यांच्याच थोडेसे आधीचे प्रा. फडके हेही येथे आहेत. नव्या पिढीतले शिरवाडकर आहेत, पु. ल. देशपांडे आहेत, रणजित देसाई आहेत. अशी ही सगळी प्रथितयश मंडळी साहित्यिकांच्या दरबारात आज येथे बसली आहेत, आणि या सगळ्यांच्या साक्षीने या ग्रंथाचे प्रकाशन करून मराठी भाषेच्या संसारातला एक सोन्याचा सोहळा आज आपण साजरा करीत आहोत.

काव्यसंबंधाने बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण मघाशी खांडेकरांनी सांगितल्याप्रमाणे सगळीच तरुण माणसे आपापल्यापरी छोटे छोटे कवी असतात. कोणी कविता लिहितात, कोणी लिहीत नाहीत, एवढाच फरक असतो. मला आठवते की, आम्ही कॉलेजमध्ये होतो, तेव्हा म्युझिक सर्कल्स असत, साहित्य मंडळे असत, तसेच कवींचे हुरहुर क्लबही असत. मनामध्ये कविता यावयाची, पण पुष्कळदा ती कागदावर उतरत नसे. पण ज्याच्या मनांमध्ये कविता डोकावून जात असे, असे पुष्कळच विद्यार्थी त्या वेळी असावयाचे. ज्या तरुणांच्या मनांमध्ये काव्य येत नसेल, तो तरुण, तरुण नसला पाहिजे, असे म्हटले, तरी चालेल. हे सगळे आता महाकवीच्या पदाला पोहोचलेले कवी, त्या वेळच्या आमच्या हुरहुर क्लबचे आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यांपुढेच एक मोठे स्वप्न होते.

कवी यशवंत आणि मी एका जिल्ह्यातले आहोत. हे तर त्यांचे माझे नाते आहेच. पण त्यांचे माझे दुसरे नाते म्हणजे, त्यांचे व माझे नाव एक आहे. त्यांच्या व माझ्या नावांतले हे साम्य, त्या काळी माझ्या अभिमानाचा एक विषय होता. मला आठवते, त्यांच्या कवितांमध्ये मनाला नित्य ओढ लावणा-या अशा कितीतरी कविता होत्या. मला चांगला आवाज असता, तर त्यांतल्या काही मी आज म्हणूनही दाखविल्या असत्या. आईवर प्रेम न करणारा माणूस दुनियेमध्ये कुठे सापडेल? पण कवी यशवंतांना आईची आठवण झाली. आणि घराघरांतली आई जागी झाली. देशभक्तीवरही त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्या वेळच्या संसारातल्या बारीकसारीक दुःखांची त्यांनी आपल्या कवितेतून इतक्या नाजूकपणे मांडणी केली आहे की, जणू काही या माणसाला आपले मन कळले होते, की काय, तो आपलेच दुखणे रस्त्यावर मांडतो आहे, की काय, आपली कहाणी त्याला कोणी जाऊन सांगितली, की काय, असे घराघरांतल्या स्त्री-पुरुषांना वाटावे. जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली अनेक अति सुरेख चित्रे त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहावयास सापडतात. ही सगळी गीते वाचीत असताना मनाला एक आगळा आनंद होत असे. काव्याची आवड असणार्‍या त्या पिढीतल्या माणसांना आजही त्या आनंदाची आठवण येईल. पण आताच्या पिढीवर या गीतांचा किती संस्कार झाला आहे, याची मला कल्पना नाही.