७२
मराठी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य
भारताचा स्वातंत्र्याचा लढा अनेक मार्गांनी व अनेक आघाड्यांवर लढविला गेला. त्यासाठी सशस्त्र युद्ध झाले, परकीय राज्याच्या दडपणापुढे आम्ही नमणार नाही, हे जगाला सांगण्यासाठी क्रांतिकारकांनी अनेक प्रयत्न केले. ब्रिटिश सरकारला युक्तिवादाने आपले म्हणणे पटवून देण्याचेही सनदशीर प्रयत्न झाले. जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देऊन असंतोष सतत धगधगत ठेवणे व त्यातूनच लढाऊ आंदोलन उभारणे हे आवश्यक आहे, म्हणून टिळक व गांधी यांनी प्रयत्न केले. भारताच्या सीमेबाहेर पहिल्या व दुस-या महायुद्धाच्या काळात स्वातंत्र्याचे सशस्त्र युद्ध लढविले गेले. पण या सर्व विविध प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी जनजागृती करणे व स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करणे आवश्यक होते. स्वतःच्या संस्कृतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करावयाचा होता. नवराष्ट्र-निर्मितीची आकांक्षा प्रज्वलित करावयाची होती. हे सर्व कार्य सातत्याने भारतातील वृत्तपत्रांनी केले आहे, म्हणून भारताच्या स्वातंत्र्य-लढ्याच्या इतिहासात वृत्तपत्रांचे कार्य फार महत्त्वाचे आहे. मराठी वृत्तपत्रांची परंपरा अशीच तेजस्वी आहे. त्याचा जन्म बिकट परिस्थितीत झाला. त्या काळात ब्रिटिश राजवट स्थिर करण्याचे राज्यकर्त्यांचे प्रयत्न सर्वत्र सुरू झाले होते. बुद्धिमान वर्गाला वश करून घेण्यासाठी इंग्रजी शिक्षण, सरकारी नोक-या, इत्यादी मार्ग अवलंबण्यात येत होते. त्याला बळी पडलेल्यांचा व पाश्चात्य सुधारणांनी हुरळून गेलेला एक वर्ग निर्माण होत होता, त्याला हाताशी धरून येथे राज्य चालविण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. तो यशस्वीही होत होता.
दुसरा वर्ग ब्रिटिश राज्याविषयी साशंक असलेल्यांचा व स्वतःच्या देशाच्या परंपरेचा विचार करणा-यांचा होता. आपल्या राष्ट्राच्या पराभवाची खंत त्यांच्या मनांत होती. या वर्गानेच या देशाच्या स्वातंत्र्य-चळवळीस प्रारंभ केला, असे म्हटले, तर चुकणार नाही. वृत्तपत्राकडे प्रथम लक्ष गेले, ते याच वर्गाचे. मराठीत पहिले इंग्रजी व मराठी असे 'दर्पण' या नावाने संमिश्र पत्र सुरू केले, ते बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी.
'दर्पण' चा हेतू सांगताना भाऊ महाजन लिहितात, 'स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व्हावी व येथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे,'. यावरून हे स्पष्ट होईल, की देशस्थितीचा सामूहिक विचार व्हावा, ही कल्पनाच पत्रव्यवसायामागे प्रारंभापासून होती. प्रथम जनतेची जागृती करणे आवश्यक आहे व त्यासाठी वृत्तपत्रासारखे नवे साधन वापरले पाहिजे, ही जाणीव यातून स्पष्ट होते.
'ज्ञानप्रकाश' व 'केसरी' या दोन पत्रांचा या दृष्टीने उल्लेख अवश्य हवा. या दोन मराठी पत्रांनी विचारवंतांवर पगडा बसविला, हे निश्चित आहे. 'ज्ञानप्रकाश' १८४९ साली सुरू झाला. त्याचे उद्दिष्ट परदेशांत काय घडते आहे, ते या देशाला कळावे, हा होता. 'छापखाना हे सुधारणांचे द्वार आहे' असे प्रारंभीच्या संपादकीयात 'ज्ञानप्रकाशा' ने म्हटले आहे. यावरून वृत्तपत्रांचे स्वरूप लोकशिक्षण देणारे व जागृती करणारे असेच लोकांच्या डोळ्यांपुढे आहे, हे निश्चित.