• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २२०

कधी कधी वादग्रस्त भाषणे करावी लागली; पण केवळ निरुपाय होता, म्हणून. एक आठवण पुण्याचीच आहे. मी एक ग्रंथ - प्रकाशनासाठी पुण्यात गेलो होतो. त्या ग्रंथाचे संपादन प्रा. दांडेकर यांनी केले होते. त्यांनी आपल्या भाषणात राज्य-सरकार, काँग्रेस पक्ष व माझीसुद्धा खिल्ली उडविण्याचा मोठ्या कुशलतापूर्वक प्रयत्‍न केला. त्या समारंभात मी गप्प बसून चालण्यासारखे नव्हते, असा निर्णय मनात घेतला व मी त्या सर्व प्रश्नांना माझ्या परीने फटकन उत्तरे दिली. दांडेकरांचा व माझा हा वाद पुष्कळ दिवस वर्तमानपत्रांत चालला. पुढे ते व मी मिळून समझोता केल्यानंतर यावर पडदा पडला. परंतु आजही प्रा. दांडेकर व मी भेटलो, तर एकमेकांना आदराने भेटतो. अर्थात फक्त ही एक आठवण म्हणून मी इथे उल्लेख केला आहे.

मी अनेकांची उत्कृष्ट व्याख्याने ऐकली आहेत. मी असे पाहिले आहे, की कोणाचे अनुकरण करणे मला शक्य नाही व मी ते केलेले नाही. उत्कृष्ट इंग्रजी वक्तृत्व असलेले वक्ते सर्वश्री सर्वपल्ली राधाकृष्णन, श्रीनिवास शास्त्री, भुलाभाई देसाई यांची अतिशय प्रभावी विचारपरिपूर्ण भाषणे मी ऐकली आहेत. त्यांच्यासारखे आपणांस इंग्रजी बोलता यावे, असे वाटले, तरी त्यांचे अनुकरण करणे सुतराम् शक्य नव्हते. मी इंग्रजी वाचन बरेच करीत होतो व त्यातूनच माझी एक देशी शैली निर्माण केली.

पुण्यात वंसत व्याख्यानमालेतील एक गोष्ट आठवते. श्री. भुलाभाई देसाई वसंत व्याख्यानमालेचे उद्‍घाटन करण्यासाठी आले होते आणि विषय होता, 'फंडामेंटल्स ऑफ नॅशनॅलीजम.' १९३५-३६ चा काळ  असावा. मी त्या वेळी पुण्यात होतो, म्हणून हे व्याख्यान ऐकण्यास गेलो. त्यांनी मूलभूत विषयावर अतिशय सुरेख शैलीत चाळीस - पंचेचाळीस मिनिटे भाषण केले. त्यानंतर पुण्याच्या पद्धतीप्रमाणे उपवक्त्यांनी भाषणे सुरू केली. त्यांमध्ये श्री. के. एन. फडके पुण्याचे प्रसिद्ध वकील हेही होते. त्यांनी श्री. भुलाभाई देसाईंच्या इतके लांबलचक भाषण केले. आम्हां ऐकणा-यांना त्याचा मूळ विषयाशी काही संबंध आहे, असे वाटले नाही. उपवक्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी श्री. भुलाभाई देसाई उभे राहिले, तेव्हा त्यांनी श्री. फडके यांच्या भाषणाचा उल्लेख करून सांगितले की, 'प्रोफेशन इन विच आय अ‍ॅम ब्रॉट अप, रेलेव्हन्सी इज ए ग्रेट व्हर्च्यु' या एका वाक्यात श्री. फडके यांची बोळवण करून त्यांनी टाळ्या घेतल्या.

मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. काकासाहेब गाडगीळ, ना. सी. फडके यांची भाषणे मन लावून ऐकली आहेत. श्री. ना. सी. फडके यांच्या मराठी भाषेच्या उच्चाराचा परिणाम आजही माझ्या मनावर आहे. इतके स्वच्छ मराठी बोलणारा माणूस मी क्वचितच पाहिला असेल. श्री. काकासाहेब गाडगीळ यांच्या भाषणात खट्याळपणा, चिमटे-चपाटे असत. परंतु विचाराने परिपूर्ण भाषण ऐकावयाचे असेल, तर ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे. आजही मी जेव्हा त्यांचे भाषण ऐकतो, तेव्हा त्यात नवीन विचार आढळतात. म्हणून नीट मांडणी केलेले विचार ऐकण्यात आनंद येतो.

एकंदरीत प्रत्येक भाषणाची थोडी-फार तयारी, चिंतन करणे आवश्यक असते. अनेक विषयांवरील अनेक व्यक्तींची संभाषणे, विचार यांच्या वाचनाचीही आवश्यकता असते. वक्तृत्वासाठी वक्तृत्व मी कधी केलेले नाही. त्यामुळे कधी माझी भाषणे चांगली होतात, तर कधी सामान्य होतात. पण ती कधी पडत नाहीत. मी मूळचा राजकीय वक्ता आहे व त्याला अनुलक्षून ज्या विषयात रस आहे, त्यासंबंधी मी बोलत असतो. परराष्ट्र - संबंध, आर्थिक व सामाजिक परिवर्तन हे माझे अति आवडीचे विषय आहेत. पण मला खरा आनंद होतो, मी जेव्हा साहित्यविषयक प्रश्नासंबंधी माझे विचार मांडण्याचा प्रयत्‍न करीत असतो, तेव्हा. त्या क्षेत्रातील मी अधिकारी माणूस नाही; परंतु बहुश्रुत आहे, असा माझा दावा आहे. त्यामुळे त्या विषयांवर बोलण्याचा मला नेहमीच आनंद वाटतो. पन्नास वर्षे भाषणे केल्यामुळे आता भाषणे करावयाचा कंटाळा येतो. म्हणून मी भाषणांची फारशी निमंत्रणे स्वीकारीत नाही. परंतु याचा अर्थ भाषणाची हौस संपली, असा मात्र नव्हे.