• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २२२

पण केवळ माहिती किंवा लोकशिक्षण एवढ्यापुरते वृत्तपत्रांचे उद्दिष्ट मर्यादित न ठेवता, लोकांना राष्ट्रोत्थानासाठी कार्यप्रवण करणारे पत्र निघाले, ते म्हणजे 'केसरी'. 'केसरी' मागे लोकमान्य टिळक आणि आगरकर ही दोन प्रभावी विचारसरणी असलेली माणसे होती. एका विशिष्ट विचाराने, ध्येयाने भारावून जाऊन त्यांनी हे पत्र काढले. टिळकांची विचारसरणी सर्वज्ञात आहे. इंग्रजी राज्याने आणलेली नोकरशाही जनतेची छळणूक करीत आहे, तेव्हा तिच्याविरुद्ध लोकांनी आपले हक्क मिळविण्यासाठी संघटितरीत्या उभे राहिले पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा प्रारंभ होता. पण हे विचार वृत्तपत्रांतून मांडणे सोपे काम नव्हते. कारण वृत्तपत्रीय स्वातंत्र्य ही त्या वेळी गृहीत धरण्यासारखी गोष्ट नव्हती. म्हणून टिळकांनी ते झगडून मिळविले. वंगभंगाच्या चळवळीच्या वेळी किंवा महाराष्ट्रातील प्लेगच्या वेळी टिळकांनी लिहिलेले लेख हे त्या काळच्या राजसत्तेला दिलेले आव्हान होते. सरकारला तुम्ही का खिजवत आहात? असे त्या वेळी टिळकांना विचारले होते. तेव्हा ते म्हणाले की, 'प्रत्येक राष्ट्रीय पक्षाच्या वृत्तपत्राचे एकामागून एक पाच संपादक तुरुंगात जाईपर्यंत तरी १२४ अ कलमाचा भंग करून हा राजद्रोहाचा कायदा निर्माल्यवत करून टाकण्याची आमची योजना होती. अर्थात मी पुढे होणे भाग होते. पण एक एक संपादक तुरुंगात गेल्यावर इतरांनी हातपाय गाळले.' या टिळकांच्या उद्‍गारांवरून त्यांचा राजद्रोहाचे खटले लढविण्याचा हेतू स्पष्ट होतो. भारताच्या स्वातंत्र्येतिहासात या खटल्यांना म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वृत्तपत्रीय स्वातंत्र्य कष्ट सोसून, सरकारकडून हिसकावून घेण्याचे महान कार्य टिळकांनी केले आहे, हे निःसंशय. त्यांचेच समकालीन असलेले शिवरामपंत परांजपे हेसुद्धा याच हेतूने आपल्या तीक्ष्ण लेखणीने सरकारवर टीका करीत होते. वक्रोक्ती व उपहास ही त्यांची मुख्य शस्त्रे होती. म्हणून मराठी वर्तमानपत्रांत केवळ बातम्या किंवा माहिती यांना प्राधान्य नव्हते. तरी सारी राष्ट्रीय लढ्याची प्रेरणा व त्यातील डावपेच यांची चर्चा वृत्तपत्रांतून होई. टिळकांचे समकालीन गोपाळ गणेश आगरकर यांनी पुढे 'सुधारक' नावाचे वर्तमानपत्र चालविले. त्याच्यातून समाजाच्या सुधारणेसाठी विचार मांडण्यास सुरुवात केली. सारांश, समाजसुधारणा आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य या दोन प्रेरणा त्या काळच्या मराठी पत्रांत होत्या.

या ठिकाणी एक नवी दृष्टी घेऊन कामगारांच्या प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधणा-या 'कामगार' या वर्तमानपत्राचा उल्लेख केला पाहिजे. १८९२ मध्ये हे साप्ताहिक कामगारांच्या तक्रारींस योग्य वळण लावून, त्यांच्यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी काढले होते. अर्थात ते फार दिवस चालले नाही. पण एका विशिष्ट वर्गाच्या हितासाठी काढलेले हे वर्तमानपत्र म्हणून त्याला महत्त्व आहे. तीच गोष्ट काही जिल्हापत्रांची आहे. १८७० च्या सुमारास महाराष्ट्रात नासिकवृत, पुणेवैभव, इत्यादी जिल्हापत्रे सुरू झाली. मराठी वर्तमानपत्रांच्या परंपरेत व त्यांनी केलेल्या जागृतीच्या कार्यात या सर्व प्रकारच्या वर्तमानपत्रांना स्थान आहे.

टिळकांच्या मृत्यूनंतर मराठी वर्तमानपत्रांचा दुसरा कालखंड सुरू झाला. १९२० ते ४० अशा या कालखंडात भारतीय राजकारणातील वैचारिक संघर्ष व आंदोलने सुरू झाली. केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरे पडणार नाही. त्याला आंतरराष्ट्रीय व सामाजिक आशय दिला पाहिजे, समाजाची निश्चित आर्थिक रचना ठरविली पाहिजे, इत्यादी विचारसरणी त्या वेळेला पुढे आल्या. हिंसा-अहिंसा, सत्याग्रह, साधनशुचिता, भारतीय राष्ट्रवादाचे स्वरूप, इत्यादी प्रश्न चर्चिले जाऊ लागले. या सर्व प्रकारच्या विचारसरणींचे मंथन या काळात महाराष्ट्रात झाले. टिळकांच्या काळीच अच्युतराव कोल्हटकर यांनी भारतीय राजकारणावर सडेतोड टीका करण्यास सुरुवात केली होती. अच्युतराव कोल्हटकरांनी आंतरराष्ट्रीय प्रश्न अगदी सुबोध भाषेत मांडण्यास सुरुवात केली. कोल्हटकरांची भाषाशैली, विचार यांमुळे 'संदेश' हे त्यांचे वृत्तपत्र अत्यंत लोकप्रिय झाले. अत्यंत तटस्थ रीतीने वृत्तपत्रांचा संपादक म्हणून राष्ट्रीय आंदोलनावर टीका करणा-या संपादकांत अच्युतराव कोल्हटकर यांची गणना केली पाहिजे. त्याचप्रमाणे न. चिं. केळकर यांनी 'केसरी'तून अनेक विषय हाताळले. समाजाच्या विचारधनात उत्तम रीतीने भर टाकण्याचे कार्य केळकरांनी केले.