• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १७२

अर्थात भाषिकता व प्रादेशिकता यांच्यासंबंधीचे हे विवेचन सर्वमान्य होणारे असले, तरी त्याचा आचार हीच कठीण गोष्ट आहे. मला वाटते, राजकारणी पुढा-यांना याबाबंत आचारसंहिता ठरवावी लागते. जातिनिष्ठ राजकारण हे जसे आपण त्याज्य मानले, त्याला राजकीय प्रतिष्ठा आपण मिळू दिली नाही, तसेच, आता प्रदेशनिष्ठ राजकारणाबाबत करावे लागेल. राजकीय पक्षांना प्रादेशिक भावना चेतवून आपले सामर्थ्य वाढविण्याच्या, लोकमत प्रक्षुब्ध करण्याचा तात्कालिक यश देणारा व भारताला घातक ठरणारा मार्ग सोडावा लागेल. राजकारणाचे स्वरूप प्रदेशनिष्ठ झाले, तर भारतीय राजकारणात भयानक परिस्थिती निर्माण होईल. प्रदेशांच्या हितासाठी राष्ट्रहिताचा बळी देणारी, त्याला धोका निर्माण करणारी पक्षबाजी शेवटी या राष्ट्राचे तुकडे करील. आपणांला एक प्रचंड राष्ट्र समर्थ व समृद्ध करावयाचे आहे आणि त्यासाठी आपले विविध राजकीय पक्ष आहेत, ही राजकारणाची अखिल भारतीय निष्ठा नाहीशी होऊन, तेथे प्रदेशनिष्ठ पक्षांची सरकारे येतील.

म्हणून राजकीय पक्षांनी आपले लक्ष अखिल भारतीय प्रश्नांवर केंद्रित केले पाहिजे. त्यांत घडलेल्या चुका व दोष यांवर अवश्य टीका करावी. पण संकुचित भावना चेतविणारे, सत्तास्पर्धेत कदाचित तात्कालिक यश देणारे राजकारण करू नये. राष्ट्रीय ऐक्याची जोपासना करण्यासाठी काय करावे, याचाही विचार व्हावयास हवा आहे. राष्ट्रीय ऐक्याला पोषक अशा शक्ती भारतात कोणत्या आहेत, याचा शोध घ्यावयास हवा. त्या ऐक्याची प्रचीती प्रत्येकाला येईल; या ऐक्याचा अनुभव सर्वांना येईल, असे राष्ट्रव्यापी कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. आधुनिक स्वरूपातील एकराष्ट्रीयत्वाचा हा आविष्कार ब्रिटिश राजवटीत झाला, हे निर्विवाद आहे. याच राजवटीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य-संग्रामातील नेतृत्वाने आधुनिक भारतातील तीन पिढ्यांना राष्ट्रवादाची शिकवण दिली. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व पं. जवाहरलाल नेहरू अशी ही नेत्यांची परंपरा या काळात मार्गदर्शन करीत होती. आपल्या राष्ट्रीय जीवनात निर्माण झालेल्या ऐक्यभावनेला, या राष्ट्रीय नेतृत्वाला फार महत्त्वाचे स्थान आहे.

याच काळात भारतीय समाजाला अखिल भारतीय दृष्टी आली. आपण एका प्रचंड देशाचे नागरिक आहोत, हे त्याच्या प्रत्ययाला आले. हे विशाल नागरिकत्व हा आपल्या अभिमानाचा विषय झाला. केशवसुतांनी वर्णिलेला 'नवहिंदचा शिपाई' या नव्या युगाची 'तुतारी' फुंकत आला. राष्ट्रीय भावनेचा हा उन्मेष त्या काळातला आहे. या राष्ट्राला एकच बांधणारा तो भावनेचा सेतू आहे. त्याचे मोठेपण आपण समजावून दिले पाहिजे.

या नागरिकत्वाचा कळस म्हणजे आमची सार्वभौम संसद आहे. स्वातंत्र्यलढ्यात आम्ही ज्यासाठी लढलो, त्या उदात्त तत्त्वांची ती प्रतिनिधिक संस्था आहे. नागरिकत्वाच्या हक्कांची, स्वराज्याच्या शासनाची, ती संसद ही निशाणी आहे. एकदेशीय भावना येथेच सदैव प्रज्वलित राहील.

समान संकटातून एकत्वाची जाणीव अधिक स्पष्ट होते. त्या संकटापासून संरक्षण करण्यासाठी ऐक्य कायम ठेवले पाहिजे, हे प्रचार न करता पटते. १९६२ व १९६५ साली जी परकीय आक्रमणे झाली, त्यांमुळे राष्ट्रीय संरक्षणाची ही निकड अनुभवावयास मिळाली. मला वाटते, आपल्या राष्ट्रीय ऐक्याचे फार उत्साहजनक दृश्य या काळात पाहावयास मिळाले. विशेषतः, भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी व देशात सैन्याबद्दल आढळलेले प्रेम हृदयस्पर्शी होते.