पंजाबमध्ये सैन्याच्या हालचाली चालू होत्या. त्या वेळी लोकांनी त्यांना असंख्य प्रकारांनी मदत केली. तेथे तर प्रत्येक कुटुंबातला कोणी ना कोणी सैन्यात असतो. तेव्हा सैन्याबद्दल एक प्रकारची कौटुंबिक भावनाच तेथे आढळते. हीच भावना सैन्यविषयी सर्वत्र निर्माण झाली. सैन्य व जनता यांच्यांत उभी असलेली अलिप्ततेची भिंत कोसळली. नवे नाते जोडले गेले. 'माझे घर संकटात आहे आणि त्याचेच रक्षण सैन्य करीत आहे.' ही भावना सर्वत्र आढळली. हे दृश्य सा-या भारतात दिसले. उदात्त भावनांचा तो कल्लोळ रमणीय होता. त्या संघर्षात मिळालेल्या विजयाइतकेच झालेले हे उत्कट भावदर्शन राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. युध्यमान भारताची ती प्रतिमा खरोखरच अपूर्व होती.
आपले सैन्य या दृष्टीनेच राष्ट्रीय ऐक्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल. स्वातंत्र्य-काळातील नवी पिढीच मोठ्या प्रमाणात आता सैन्यात आहे. आपल्या सैन्याचा दृष्टिकोन निकोप आहे. त्याची देशभक्ती ज्वलंत आहे. त्याचा पराक्रम कसोटीस उतरलेला आहे. त्याचे साहस जगाने पाहिले आहे. जाती, धर्म, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन देशसेवा करणारे आपले सैन्य हे राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कारकेंद्र आहे. प्रादेशिक सेना, सैनिक विद्यालये, छात्रसेना, गृहरक्षक दले येथेही अशाच राष्ट्रीयतेचे संस्कार होत राहिले, तर येत्या दहा वर्षांत येणारी नवी पिढी जी स्वप्ने पाहील, ती फक्त भारताच्या उत्कर्षाची !
राष्ट्रीय संरक्षणाप्रमाणे राष्ट्रीय नियोजन हा राष्ट्रीय ऐक्याचा परिणामकारक बंध ठरेल. कोणत्याही प्रदेशाची आर्थिक समृद्धी भारतीय नियोजनाच्या यशावर अवलंबून आहे, याची जाणीव सर्वत्र निर्माण झाली, तर राष्ट्रीय ऐक्याची ती पोषक शक्ती ठरेल. हा अखिल भारतीय नियोजनाचा दृष्टिकोन हे आपल्या प्रचाराचे सूत्र असले पाहिजे. राष्ट्राच्या विकासाप्रमाणे त्याची शिक्षणपद्धती हेही आपल्या ऐक्यभावना निर्माण करण्याचे एक माध्यम ठरण्याची शक्यता आहे. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीतून आलेल्या वैचारिक मंथनातून आधुनिक भारताची विचारधारा निर्माण झाली. जिला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी 'वाघिणीचे दूध' म्हटले, त्याच्या पोषक द्रव्यातून नव्या जाणिवा आल्या. नव्या विश्वसंस्कृतीचे दर्शन भारताला झाले. आता भारतात अशीच शिक्षणपद्धती आली, तिने बालपणापासून भारतीय ऐक्याचे संस्कार केले, तर नवी पिढी राष्ट्रवादाचे बाळकडूच घेऊन वाढत जाईल. हिंदीचा आज जो आपण अवास्तव बाऊ करतो आहोत, तोही वाटणार नाही. थोडासा निर्धार, स्वाभिमान व काळजीपूर्वक केलेली आखणी यांच्या आधारे हिंदी या राष्ट्राची समर्थ भाषा होईल. राष्ट्रीय ऐक्याचे बोल ती बोलत राहील.
भारतीय वृत्तपत्रांचा या दृष्टीने उपयोग होण्यासारखा आहे. स्वातंत्र्य-लढ्यात वृत्तपत्रांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या या रचनात्मक कार्यात वृत्तपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. अनिष्ट प्रवृत्तींचा प्रसार त्यांना टाळता येईल. प्रेस कौन्सिलसारख्या नव्या संस्थेने हे विधायक कार्य अंगावर घेतले, तर रोज कोट्यवधी लोकांपर्यंत एकात्मतेचा हा संदेश जाऊन पोहोचेल. दुष्प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत होईल.
राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी काय करावयास हवे, यासंबंधी विचार करण्यासाठी १९६२ साली राष्ट्रीय एकात्मता परिषद भरली होती. अशी परिषद पुन्हा भरवावी, असा आमचा विचार आहे. मला वाटते, की अशा परिषदांमुळे पुन्हा एका समान व्यासपीठावर एकत्र येऊन, या देशाच्या भवितव्याची खुली चर्चा होते. सरकारला मार्गदर्शन होते. आज देशात निराशेचे वातावरण पसरले आहे. ते नाहीसे झाले पाहिजे. फुटीरपणाची, हिंसात्मक चळवळींची हवा पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याचा पायाच उखडला जाण्याची भीती आहे. अशा वेळी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्राच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात की, ज्या वेळी राजकीय प्रतिष्ठा व पक्षहित यांना बाजूला सारून काही निर्णय घेतले पाहिजेत. आज असाच एक निर्णायक क्षण आलेला आहे, असे मला वाटते.