• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १६१

५५

भारतसेवक महाराष्ट्र

महाराष्ट्राची सेवा करण्यात मी रंगून गेलो असतानाच मला दिल्लीचे बोलावणे आले. तसा असंख्य वेळा मी दिल्लीला आलो असेन. दिल्ली काही मला अनोळखी नव्हती. पण कुठल्याही गावचा होणे ही एक वेगळीच भावना आहे. महाराष्ट्रात असताना मी त्याच्या आशा-आकांक्षाशी समरस झालो होतो. त्याच्या रागा-लोभाचा मी अनुभव घेत होतो. स्वतःच्या मनातील काही निश्चित ध्येयवादानुसार महाराष्ट्राची घडण व्हावी, या भावनेने नवे नवे बेत रचीत होतो. तसे करतानाही भारतीय जीवनाचा, भारतीय दृष्टीचा विसर पडला नव्हता. किंबहुना असा दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे थोडीशी नाराजीही निर्माण केली होती.

पण मी आता येथे आलो आहे. भारताच्या भवितव्याशी अत्यंत निगडित असलेल्या अशा प्रश्नांची उकल चालू असताना मी येथे आलो आहे. राजकारणाचे सगळे रंग दिसत आहेत. विविध वर्तुळांत वावरणारी दिल्ली ही तशी मोठी उद्‍बोधक नगरी आहे. इथल्या प्रशस्त आणि आलीशान इमारतींकडे पाहताना किंवा येथे वावरणा-या विविध भाषकांच्या हालचाली पाहतानाही अनेकदा महाराष्ट्रासंबंधीचे विचार मनात येत असतात. या विचारांची गर्दी झाली, की मी कोठेतरी ते बोलतो. तसे केले, म्हणजे मोकळे वाटते, शेवटी माणसाच्या व्यक्तिमत्त्वात त्याच्या विचारांनाही महत्त्व आहेच. महाराष्ट्राशी माझे नाते कृत्रिम नाही. म्हणून त्याच्यापुढे प्रकट चिंतन करणे मला आवडते. ही देवाण-घेवाण आहे. उपदेशाचा आव नाही. तसा त्यात खोटा विनय नाही आणि खोटी अदबही नाही.

मी आता महाराष्ट्राबाहेर हिंडतो. अन्य भाषकांत वावरतो. हिमालयात जातो. पूर्वेच्या आसामच्या टेकड्या पाहतो. सारा देश हिंडत असताना भारताच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते; पण त्याच वेळी न कळत महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार मनात येतो, भारताच्या प्रश्नांचा विचार करीत असताना महाराष्ट्राच्या प्रश्नांची पार्श्वभूमी नेहमीच डोळ्यांपुढे येते.

माझा अनुभव असा आहे, की महाराष्ट्राबद्दल बाहेरच्या लोकांत खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षा आपण पु-या करू का, असे अनेकदा मनात येते. महाराष्ट्राबद्दल या अपेक्षा का निर्माण झाल्या? याचे कारण असे, की महाराष्ट्राने या राष्ट्राच्या जीवन-संग्रामात अत्यंत हिरिरीने भाग घेतला आहे. इतिहासकालात आणि अगदी अलीकडच्या काळातही महाराष्ट्राने राष्ट्रीय जीवनातील उदात्त ध्येयवादासाठी तादात्म्याने प्रयत्‍नांची शर्थ केली. पराक्रम केला. त्याग केला. शिवाजी, टिळक, रानडे, गोखले, फुले-आंबेडकर ही त्यांची प्रतीके. मी परवा बिहारमध्ये गेलो होतो. तेव्हा अगदी घरच्या माणसांची चौकशी करावी, तशी टिळकांची आठवण लोकांनी काढली. हाच अनुभव सर्वत्र येतो. उत्कट देशभक्ती म्हणजे महाराष्ट्र, असे जणू समीकरण त्यांच्या मनांत असते. अशा विविध भावना भारतीयांच्या मनांत आपल्याविषयी आहेत.