या ठिकाणी पं. नेहरूंची आठवण सांगण्यासारखी आहे. प्रतापगडाच्या निदर्शनांच्या वेळची ही गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या रागाचे नि अनुरागाचे ते प्रदर्शन होते. कारण जशी उग्र, शिस्तबद्ध प्रदर्शने त्या वेळी झाली. तसा प्रतापगडच्या डोंगर-कपारींत भरलेल्या नेहरूंच्या दर्शनार्थ जमलेल्या हजारो लोकांचा प्रचंड मेळावाही त्या वेळी झाला होता. तो कार्यक्रम आटपून आम्ही परत येत होतो. निदर्शक परतत होते. कोणी सायकलवर, कोणी पायी, नेहरूंची मोटार पाहिली, की निदर्शक पुन्हा घोषणा करत. नेहरू हसतमुखाने त्यांच्याकडे पाहून हात हालवीत. असे हे वीस मैल चालू होते. न कळत पंडितजींच्या मनात महाराष्ट्राच्या जनतेसंबंधी विचार येत होते. थोडेसे विचारमग्न असताना एकदम ते मला म्हणाले,
'मी विचार करतो आहे - तुमच्या लोकांबद्दल... पंजाबी लोकही रागावतात; पण ते रागावले, तर एकदम थंडही होतात. मराठी लोकांचे तसे नाही. ते लवकर रागवत नाहीत; पण एकदा रागावले की, लवकर शांत होत नाहीत.'
मीही म्हटले, 'खरे आहे.'
लगेच मला आठवण झाली लोकमान्यांची. या महापुरुषाने असंतोषाची लाट भारतात पसरविली आणि साम्राज्याशाहीला धक्के दिले. ती महाराष्ट्रात जन्मली याचे कारण हेच असावे. अशा या इतिहासातील अनेक घटनांनी हे अनुकूल पूर्वग्रह निर्माण होतात. बाहेरच्या लोकांच्या अपेक्षा वाढतात.
सर्वत्र पूर्वग्रह अनुकूल असतात, असेही नाही. प्रतिकूलही असतात. पण मला वाटते, की महाराष्ट्राने प्रतिकूल पूर्वग्रहांचा विचार अवश्य करावा. हे काढून कसे टाकता येतील, यासाठी पद्धतशीर प्रयत्न करीत रहावे. पण त्यामुळे गोंधळून जाऊ नये. केवळ त्यांचाच विचार करून मनातल्या मनात कुढत बसू नये.
मग महाराष्ट्राने काय करावे ? संयुक्त महाराष्ट्र झाला, त्या वेळी मी म्हणालो होतो, की महाराष्ट्र-निर्मितीसाठी शिवशक्ती निर्माण झाली आहे. तर ती कायम टिकवली पाहिजे. ते आनंदसोहोळ्याचे दिवस साजरे करीत असतानाही माझ्या मनात हे विचार होते. कारण मला मनापासून वाटते की, महाराष्ट्राला राष्ट्रसेवेचे वेड होते. म्हणून तो मोठा झाला. ते वेड, ती जिद्द, तो कणखरपणा, ते शुद्ध चारित्र्य, ती विद्वत्तेपुढे नमणारी राजकीय नम्रता या देशाला हवी आहे आणि या गोष्टी महाराष्ट्राच्या परंपरेत आहेत. कसदार जमीन असणा-या शेतक-याला आपल्या शेतीचा अभिमान असतो, तसा मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे सारे गुण देशात सर्वत्र असावेत, असे मला वाटते. म्हणून महाराष्ट्राने या गुणांची जोपासना करावी - त्या गुणांना अनुकूल असे वातावरण सरकारने निर्माण करावे, असे मला वाटते. महाराष्ट्राने कोण व्हावे, असे मला कुणी विचारले, तर मी म्हणेन, भारताचा पुरोगामी व कणखर ध्येयवाद असलेला नम्र सेवक व्हावे. कारण अशा सेवकांची आज देशाला गरज आहे. आपण सध्या फार मोठ्या संक्रमणकाळातून जात आहोत.