• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ३८

या आठवणींची उजळणी चालू असतानाची एक गोष्ट मला चांगलीच स्मरते. म. गांधींच्याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेने आमची मने अगदी ओतप्रोत भरून आली होती. आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करीत होतो, पण आमचा स्वातंत्र्याचा सेनानी मात्र दूर नोआखलीमध्ये दंगलीत बरबाद झालेल्यांचे अश्रू पुसत होता. त्यांची आठवण झाली आणि माझे मन गंभीर झाले. मी गांधीवादी केव्हाच नव्हतो, पण गांधीजींबद्दल एक अपरंपार श्रध्दा मनात वागवत होतो. इतरांप्रमाणेच मीही त्यांना केवळ लांबूनच पाहिलेले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढली होती. बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी जनतेने निर्भय होऊन झुंज दिली होती, ती म. गांधींच्याच प्रेरणेने ! भारत स्वतंत्र होत असताना त्यांचे स्मरण पदोपदी येत होते. माझे लक्ष सहज माझ्या घरातील भिंतीवर गेले आणि मनातल्या मनात मला शरमल्यासारखे झाले. माझ्या मुंबईच्या घरी म. गांधींचा फोटोसुद्धा नव्हता ! मन बेचैन झाले. चाललेल्या गप्पांतून लक्ष उडाले आणि सारखे वाटू लागले, हे काही खरे नाही. आज स्वातंत्र्यदिन आहे. आज आपल्या घरी म. गांधींची तसबीर आपण लावू या.

मनात आले आणि मी हळूच घरातून बाहेर पडलो. कोणाशीही न बोलता, कोणालाही न सांगता, मरीन लाइन्स स्टेशनजवळचा रेल्वेचा ओव्हरब्रिज ओलांडला आणि चालत- चालतच ठाकुरद्वार नाक्यावर पोचलो. रस्ता गर्दीने दुथडी भरून वाहत होता, पण माझे गर्दीकडे लक्षच नव्हते. मी फ्रेममेकरचे दुकान शोधत होतो. एक दुकान सापडले; तिथे मिळाला, तो म. गांधींचा एक फोटो मी घेतला आणि घराकडे निघालो. हातात म. गांधींची ती तसबीर होती, आणि मनात त्यांच्याबद्दलची अपरंपार कृतज्ञता होती. त्यांचाच विचार करीत मी चाललो होतो. घरी आलो आणि माझ्या अभ्यासिकेत तो फोटो मी लावला, तेव्हा माझे मन थोडे शांत झाले.

आज पंचवीस वर्षे झाली, मरीन लाइन्समधून आम्ही मलबार हिलवर गेलो, आणि गेली दहा वर्षे आमचे बिर्‍हाड दिल्लीला आहे. घराच्या जागा बदलल्या. कालमानानुसार घरातले फर्निचर बदलले. अनेक कलावस्तूंचीही भर पडली. पण बदलली नाही, अशी एकच वस्तू म्हणजे म. गांधींचा तो फोटो.

त्या फोटोचा विषयच निघाला, म्हणून सांगायला हरकत नाही. सौ. वेणुताईंची त्या फोटावर अपरंपार श्रद्धा जडलेली आहे, का, कोणास ठाऊक, त्या फोटोला ती काधीही नजरेआड होऊ देत नाही, फुटू नये, म्हणून तिने त्याची काच काढून ठेवली आहे. प्रवासाला निघाली, तर म. गांधींची ती तसबीर तिच्या सामानात हलक्या हाताने, कपड्यांच्या घडीत जपून ठेवलेली असते.

म. गांधींची तसबीर लावली आणि थोड्याच वेळात एका सभेसाठी मी भायखळ्याला गेलो. जागा आता नक्की आठवत नाही; पण बहुधा डिलाईल रोडवरील चाळ असावी. सातारा जिल्ह्यातील कामगारांनी स्वातंत्र्य-दिनाची सभा ठेवली होती. एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या त्या सभेत भाग घेताना मला अतिशय आनंद झाला होता. माझे भाषण लोकांना कसे वाटले, कोणास ठाऊक; पण मला ते अजून आठवते आहे. एका भारावलेल्या मनःस्थितीत मी भाषण संपवून बसलो होतो. म. गांधींच्या तसबिरीचा विषय ताजा होता. म.गांधीच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या नोआखलीच्या यात्रेबद्दल त्या सभेत मी बरेच काही सांगितले. त्या दिवशी मी अगदी गांधीमय होऊन गेलो होतो.

सभा संपवून मी घरी निघालो. रात्रीच्या मुख्य समारंभाला हजर राहण्याची घाई होती. सभेला मी आलो, तेव्हा ध्यानात न आलेली एक गोष्ट आता दिसत होती. लोकांचे जथेच्या जथे आनंदोत्सवात भाग घेण्यासाठी निघाले होते. रोशनाई झाली होती. स्वातंत्र्याचे वारे संचारले होते. एक गुलाम देश स्वतंत्र झाला होता.