• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ३९

आजच्या पिढीला या आनंदाची कल्पना सांगूनही येणार नाही. एक प्रकारच्या बेहोशीतच मी घरी पोचलो होतो. स्वातंत्र्य घोषित व्हायला आता अवघे दोन तास उरले होते. उत्कंठा, औत्सुक्य, उत्साह, समाधान, इत्यादी भावनांचे अमृतमय रसायन या दोन तासांत इतके उदंड भरले होते, की विचारू नका. थोड्याच वेळाने जुन्या सचिवालयात मी पोचलो. ओव्हल मैदानाच्या बाजूला जी चिंचोळी बाग, त्या बागेत आम्ही उभे होतो. बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे पंतप्रधान होते. जुन्या सचिवालयाच्या पोर्चवर त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला. विश्वविजयी प्यारा तिरंगा वायुलहरींवर डोलू लागला. भारत स्वतंत्र झाल्याची ती निशाणी होती. ध्वजवंदन झाल्यावर, मला वाटते, बाळासाहेब खेरांचे थोडा वेळ भाषण झाले. आज त्या भाषणातले मला काहीच आठवत नाही. झेंडावंदनाच्या वेळची धुंदी, हर्ष मात्र, आज पंचवीस वर्षे झाली, तरी डोक्यात घर करून बसला आहे. पुढे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी झेंडावंदने झाली. मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा झेंडावंदन झाले. संरक्षणमंत्री म्हणून लाल किल्ल्यावर होणा-या झेंडावंदनाच्या समारंभाचे यजमानपदही मी भूषविले. पण जुन्या सचविलयाच्या छोट्याशा हिरवळीवर झालेले स्वतंत्र भारतातील पहिले झेंडावंदन अजूनही आठवते.

आठवण झाली, की अजून मन मोहरून येते. हृदय भरून येते. देह पुलकित होतो. या झेंड्याला स्वतंत्र भारताच्या नभांगणात फडकलेला पाहावा, म्हणून जी लढाई झाली, तीमधील मी एक साधा सैनिक, हा झेंडा खांद्यावर घेऊन शाळकरी जीवनात मिरवणुका काढल्या. पोलिसांची कडी तोडून या झेंड्याचा सन्मान राखण्यासाठी मार खाल्लेला मी, मी एक शिपाई. आज कृतार्थपणे त्या झेंड्याचे वैभव पाहत होतो. भारत स्वतंत्र झाला होता. एक संकल्प सिद्ध झाला होता. स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी हे स्वातंत्र्य सार्थ करण्याचे नवे संकल्प मनात डोकावत होते.

खरे म्हणजे, हे संकल्प तसे नवे नव्हते. स्वातंत्र्याच्या चळवळीत आम्ही ओढले गेलो होतो, हे काही नुसत्या स्वातंत्र्याच्या भावनात्मक कल्पनेने नाही; आणि केवळ भौगोलिक कल्पनेनेही नाही. स्वातंत्र्याचा राजकीय, सामाजिक व आर्थिक अर्थ हा ध्येयरूपाने मनात वागविला होता. म्हणूनच झेंडावंदन संपवून घरी परतताना मी विचारमग्न झालो होतो. हे संकल्प सिद्ध होतील का? स्वातंत्र्याचा सामाजिक व आर्थिक समतेचा अर्थ प्रत्यक्षात उतरेल का? डोक्यात काहूर उठले होते.

मन असे साशंक का होते? त्यालाही काही कारणे घडली होती. दि. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला; पण तो लौकिकार्थाने. कारण सत्ता त्यापूर्वीच हाती आली होती. १९४६ च्या निवडणुकीत आमचा पक्ष विजयी झाला होता व प्रांतिक सरकारे स्थानापन्न झाली होती. गेले पंधरा महिने आम्ही सत्ता राबवतच होतो. लोकांशी आमचे संबंध येत होते. आमच्या कारभाराबद्दल बरी-वाईट मते ऐकायला मिळत होती; आणि सत्तेचा हा अनुभव काही फारसा उत्साहवर्धक नव्हता. चालला आहे, असाच कारभार जर चालू राहिला, तर स्वातंत्र्याचे जे अर्थ अभिप्रेत आहेत, ते साकार होतील का, असे वाटू लागले होते. पक्षाच्या बैठकीत झालेल्या चर्चा आठवत होत्या आणि त्या वेळच्या प्रांतिक नेतृत्त्वाने घेतलेल्या भूमिकांबद्दल नाराजी वाढू लागली होती. कार्यकर्ते उघड बोलू लागले होते.

मला एकदम महारवतन रद्द करण्यासंबंधी झालेला वादविवाद आठवला. १९४६ च्या अखेरीस महाराष्ट्रभर महारवतन रद्द करण्यासंबंधी मोठी चळवळ झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या त्या चळवळीला माझा मनातून पांठिबा होता. पक्षाच्या बैठकीत, प्रांतिकच्या नेत्यांजवळ मी चर्चा केली होती. महारवतन रद्द करा, असे मागणे घेऊन जेव्हा प्रचंड मोर्चा आला, तेव्हा आपण वतने नष्ट करण्यासाठी घोषणा करू या, असे मी सुचविले होते. पण मला मिळालेला प्रतिसाद निराशाजनक होता. (पुढे मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या काही दिवसांतच आम्ही महारवतने नष्ट केली, त्याची पार्श्वभूमी इतकी जुनी होती.)