• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ९०

त्यादृष्टीने 'सह्याद्रीचे वारे' मधील 'डॉ. आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा वारसा' हा यशवंतरावांचा लेख आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे देदिप्यमान दर्शन करून देणारा आहे.  बाबासाहेबांच्या भारताच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक इतिहासातील अमर कामगिरी विशद करणारा हा लेख आहे.  ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही हिंदुस्थानच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची अशी व्यक्ती होऊन गेली.  त्यांच्या मतांशी सहमत नसणार्‍या माणसांनासुद्धा त्यांच्याबद्दल आदर बाळगावा लागला.  त्यांचे सहकार्य घ्यावे लागले.  त्यांची मदत घ्यावी लागली.''  असे आंबेडकरांचे मोठेपण ते सांगतात.  या लेखात यशवंतरावांनी डॉक्टरसाहेबांचे उभे केलेले कर्तृत्व बव्हंशी सत्याला, प्रामाणिकपणाला आणि प्रांजळवृत्तीचा साक्ष ठेवणारे आहे.  

लालबहादूर शास्त्रींच्या सहवासातील अनेक आठवणी यशवंतराव सांगतात.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गोडवा, माणसांना आपलेसे करण्याची जादू, त्यांच्या स्वभावातील अकृत्रिमता, त्यांची विश्वास देण्याची आणि घेण्याची पद्धत, उमेदीने काम करण्याची हातोटी, माणसांची अचूक पारख, त्यांच्या मनाचा खंबीरपणा, एखादा मुद्दा मांडण्यासाठी सौम्य शब्दांचा वापर, कुशल संघटक, माणसाचे मन जिंकण्याची कला, त्यांच्याकडे असलेला माणुसकीचा गहिवर इत्यादी शास्त्रीजींच्या स्वभावातील विविध गुणवैशिष्ट्य यशवंतराव सांगतात.  या गुणवैशिष्ट्यांतून शास्त्रीजींचे भावचित्र त्यांनी अतिशय देखणेपणाने उभे केले आहे.  ते सार्थच आहे यशवंतरावांना.  ''त्यांचे खंबीर मन दिसते.  पोलादी वृत्ती अनुभवली.  अंतःकरणाचा पीळ पाहिला.  आता कधी सुगंधाने मन भरावे, कधी स्नेहाने ते आर्द्र व्हावे, कधी त्यांच्या सहवासाच्या आठवणींनी उमाळा यावा अशी ही शास्त्रीजींची मला होणारी आठवण आहे.  ती मी जपून ठेवतो.  अत्तराच्या कुपीसारखी.''  ही यशवंतरावांची अत्यंत अन्वर्थक व बोलकी अशी आठवण त्यांच्या चरित्राची उत्तम साक्षच होय.

यशवंतरावांनी डॉ. राधाकृष्णन यांच्यावर लिहिलेल्या छोटेखानी लेखात त्यांची सुबोध चरित्ररेखा चित्रित केली आहे.  यामध्ये डॉ. राधाकृष्णन यांची ज्ञानोपासना, भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मीमांसक, शिक्षणतज्ज्ञ, त्यांची स्थितप्रज्ञता, मुत्सद्दीपणा, ॠजू व्यक्तिमत्त्व, स्वभावातील मनमोकळेपणा, त्यांच्या वक्तृत्वाची खास शैली, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, 'सुभाषित वाणी', शब्द लावण्य, विचार गांभीर्य व अर्थघनता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कला इत्यादी खास वैशिष्ट्ये ते नमूद करतात.  ''डॉ. राधाकृष्णन् यांचे जीवन प्रशांत होते.  त्यात खळाळ नव्हता.  पण त्याला आतूनच एक ओढ होती.  त्यामुळे ते गतिमान होते.''  अशा अचूक शब्दांत त्यांची चरित्ररेखा उभी करतात.  डॉ. राधाकृष्णन्सारख्या थोर व्यक्तींच्या चरित्ररेखेमध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनातील खाचखळगे, आनंद-दुःख यांचे काही प्रसंग रेखाटले.  त्याचप्रमाणे या चरित्रनायकाच्या कार्यकर्तृत्वाचे योग्य व साधार रेखाटनही केले आहे.  डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तृत्वाचा व विचारांचा आमूलाग्र प्रभाव यशवंतरावांच्यावर पडत होता याचीही जाणीव होते.  

मराठी साहित्यक्षेत्रात मुळात चरित्रलेख प्रपंच अत्यंत मर्यादित असताना यशवंतरावांनी आपल्या लेखनशैलीच्या जोरावर अनेक चरित्ररेखा साक्षात चित्रित केल्या.  स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची चरित्ररेखा ते अशीच रेखाटतात.  ''संयम, समन्वय, सात्विकता, सौम्यता इ. त्यांच्या स्वभावाचे अविभाज्य घटक होते.  त्यांच्या उच्चशिक्षणाने यात अधिकच भर घातली.  त्यांच्यातील तपी आणि त्यागी वृत्तीने जीवनाला अधिक विकसित केले.  यातूनच त्यांनी देशसेवेची शोभा वाढवली.  ओजस्वी प्रतिभा, उदार प्रवृत्ती, नम्रता, सरळपणा, सहिष्णुता यातून त्यांच्य व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.''  अशा संक्षिप्‍त शब्दात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक वैशिष्ट्ये ते विशद करतात.  खरे तर हे चरित्रलेखांचे स्वरूपच संक्षिप्‍त असल्यामुळे त्यात विस्तृत चित्रणाला वाव कमी आहे.  असे असतानाही यशवंतरावांनी डॉ. राजेंद्रप्रसादांचे व्यक्तिमत्त्व जीवनात घडलेल्या अनेक घटना, प्रसंग व ऐतिहासिक दाखल्यांनी सतत खुलवित नेले आहे.