• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ८९

यशवंतराव चव्हाण चढत्या क्रमाने राजकीय क्षेत्रात उच्च पदावर गेले.  तसा त्यांना पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्यांचा सहवास लाभला.  त्यामुळे या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व विकसित कसे होत गेले, त्यांच्या जीवनात कोणते आंगिक गुण होते, त्यांचे जीवन कसे फुलत गेले, त्यांच्या जीवनातील चित्तवेधक संघर्ष, त्यांच्या जीवनानुभूती इ. गुणवैशिष्ट्ये त्यांना जवळून न्याहाळता आली.  त्यामुळे या व्यक्तींचे जीवन स्फूर्तिदायक व स्फूर्ती देणारे आहे.  शिवाय या दोघांचे व यशवंतरावांचे संबंध जवळचे असल्याने सूक्ष्म जीवनदर्शी तपशील उपलब्ध होतो.  या निकटच्या सहवासामुळे कल्पिताचा आधार न घेता त्यांच्या चरित्रावर वास्तवपूर्ण प्रकाश टाकला आहे.  माणसांच्या गुणांची पारख करण्याची त्यांची कला, पं. नेहरूंचा मोकळा स्वभाव, प्रश्न निकाली काढण्याचे त्यांचे कौशल्य, त्यांची पुरोगामी दृष्टी, यशवंतरावांच्या त्यांच्यासंबंधी काही आठवणी ते स्मृतिरूपाने या लेखात सांगतात, ''धाकट्या भावावर प्रेम करावे तसे त्यांनी माझ्यावर प्रेम केले.  माझ्यावर अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी विश्वास टाकला.  ते प्रेमाचे व विश्वासाचे अनंत क्षण माझ्या स्मृतिपटलावर तेजस्वी तार्‍यासारखे लखलखत आहेत.''  अशी आठवण ते सांगतात.  याशिवाय त्यांच्या संदर्भातील अनेक प्रसंगांची नोंदही ते सहज करतात.  

यशवंतराव चव्हाणांच्या चरित्रलेखांची शीर्षके नुसती वाचली तरी भक्तिभावातून निर्माण होणारा त्यांचा स्तुती विलास लक्षात येतो.  'मानवतेचे पुजारी महाकवी रविंद्रनाथ टागोर', 'प्रकाशाचा लेखक (वि.स.खांडेकर), 'नाट्याचार्य खाडिलकर, 'तत्त्वचिंतक रचनाकार' (डॉ. धनंजयराव गाडगीळ), 'डॉ. आंबेडकरांच्या विचार-परंपरेचा वारसा' (डॉ. बाबासाहेब आंबेडकर), 'पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची' (ग.दि.माडगूळकर) यांसारख्या चरित्रलेखांच्या शीर्षकावरून ते चरित्रनायकाचे स्तुतिपाठक नाहीत मात्र शिष्यभावाने किंवा भक्तिभावनेने लिहिलेले हे चरित्र लेख आहेत, हे लक्षात येते.  

महाकवी रवींद्रनाथ टागोर यांचे जीवन थोर, उदात्त आणि सर्वस्पर्शी असल्याचे सांगून त्यांची प्रखर बुद्धिमत्ता व संवेदनक्षमता या गुणांचा उल्लेखही ते करतात.  थोर कवी, थोर कादंबरीकार, थोर कलोपासक, चित्रकार असा त्यांचा गौरवपर उल्लेख ते या लेखात करतात.  तसेच या महाकवीबद्दल व काव्याबद्दल आपले मत व्यक्त करताना लिहितात, ''कुठलाही महाकवी किंवा कुठलाही कवी निव्वळ शब्दांचा जुळारी होऊन कवी होऊ शकत नाही.  नादमाधुर्य म्हणजेच काव्य असे आपणाला म्हणता येणार नाही.  आपल्या मराठी वाङ्‌मयामध्येही असा एक काळ होता की ज्यावेळी शब्दलालित्य म्हणजेच साहित्य असे समजून अशा साहित्यामागे लोक धाव घेत.  परंतु निव्वळ नादमाधुर्यातून निर्माण होणार्‍या काव्यात जनतेचे मन काबीज करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकत नाही.  त्या जुळणार्‍या सुंदर नादमधुर शब्दांच्या पाठीमागे एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारे मन आणि विचार असल्याशिवाय कवी किंवा महाकवी निर्माण होऊ शकत नाही.  आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की तिचा पहिलाच कवी एवढा मोठा महाकवी होऊन गेला की त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.''  ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी'नंतर टागोरांच्या 'गीतांजली'बद्दल त्यांची स्वतःची मते ते नोंदवतात.  ते काव्य वाचल्यानंतर प्रथम समजले नाही.  जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय हे कवी समजणार नाहीत, असे याविषयी ते सांगतात.  मानवतेचा पुजारी हा एक संदेश रवींद्रनाथांनी आपल्या साहित्यातून दिला.  एवढेच नव्हे तर उतारवयात त्यांनी कुंचला हातात घेऊन चित्रे रंगविली.  शब्दांशिवाय आणि भाषेशिवाय त्यांनी मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी चित्रांचा छंद जोपासला.  शिक्षणाशिवाय ज्यांना डोळे आहेत त्या सर्वांना मनातील भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी चित्रे रंगवली आहेत.  ''ते कसेही असो रवींद्रांच्या रूपाने एक अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत हळवे, अत्यंत थोर असे मन भारतामध्ये निर्माण झाले, पण ही आमची परंपराच आहे.  ॠषीमुनींची आणि महाकवींची.  रवींद्रांची मूर्तीच या महान परंपरेतल्या जुन्या थोर ॠषीमुनींची आपणाला आठवण करून देते.  भारताला पुराणपुरुषाची उपमा देऊन रवींद्रनाथांसारखे रत्‍न आम्हाला सापडल्याचे यशवंतराव सांगतात.  'गीतांजली या काव्याच्या यशवंतरावांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडल्याचे जाणवते.  या काव्यातील काही ओळी त्यांच्या मनावर कायमच्या ठसल्या आहेत. ''जिथे चित्त निर्भय झाले आहे आणि जिथे ज्ञान मुक्त झाले आहे अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात भारताला देवा जागृती येऊ दे.  जिथे ज्ञान मुक्त झाले असेल आणि जिथे चित्त निर्भय झाले असेल अशा प्रकारची परिस्थिती ज्याच्या साहित्यात, संस्कृतीत, विचारात आणि समाजात निर्माण झाली असेल असा नवभारत आपणाला निर्माण करावयाचा आहे ही प्रार्थना ज्या कविमनातून निर्माण झाली ते कविमन केवळ एका तत्त्वज्ञाचेच होते असे नव्हे तर एका अत्यंत थोर अशा मानवाचे ते मन होते.''  ज्ञानामुळे अज्ञानाचे भय निघून जाते.  अशा देशात अशा समाजात आणि अशा संस्कृतीत नवभारत जागा होऊ दे अशी प्रार्थना रवींद्रनाथ देवाजवळ करतात.  यातून या महाकवींचे अनेक पैलू या लेखात उजेडात येतात.