• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ९१

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण, महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा असणारा सिंहाचा वाटा, त्यांचे विचार यांचा प्रभाव नंतरच्या काळात अनेकांवर पडला.  ''आपल्या देशातील सामाजिक दोषांची मार्मिक जाणीव असलेल्या भाऊरावांचे व्यक्तित्वच अत्यंत चित्रदर्शी होते.  ते प्राचीन काळातील ॠषीसारखे दिसत आणि तसेच त्यांचे जीवन साधे आणि काटकसरीचे असे.  बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम केले.  कर्मवीर पाटील यांचा लढा हा लोकशिक्षणावर अवलंबून होता.  म्हणूनच अनिष्टतेचा रोग नष्ट होण्यासाठी शिक्षण हेच औषध आहे हे जाणून त्यांनी काम चालवले,''  असे विचार त्यांच्या कार्याबद्दल यशवंतराव व्यक्त करतात.  यशवंतरावांचे बहुसंख्य चरित्रलेख हे प्रसंगानुरूप असल्याने अशा चरित्रलेखात मर्यादित चरित्र चित्रण झालेले आहे.  त्यामुळे चरित्रात्मक साहित्य लेखनाचे मानदंड येथे लावणे गैर आहे.  किंबहुना त्यांनी सलग असे चरित्रलेखन केलेले नाही.  पण हे छोटेसे जे चरित्रलेख लिहिले आहेत ते मात्र सुबोध आहेत.  लेखनशैली गुणयुक्त आहे पण एखाद्या चरित्रनायकाच्या दर्शनातून जीवनदर्शन घडविण्याचा चमत्कार चांगल्या चरित्रात घडतो आणि वाचकांच्या जाणिवेला विस्तृत परिणाम लाभते.  तसे मात्र यशवंतरावांच्या चरित्रलेखात घडते किंवा नाही हा चर्चेचा विषय ठरेल.  तरीही यशवंतरावांनी लिहिलेली ही प्रासंगिक चरित्रे वाचकाला विचार करावयास लावणारी आहेत, असे म्हणण्यापेक्षा ती वाचकाला भारावून टाकणारी आणि मंत्रमुग्ध करणारी आहेत, असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल.  आपल्या चरित्रनायकाविषयी अत्यंत उत्कटतेने लिहिणे हे यशवंतरावांचे वैशिष्ट्य जागोजागी आढळते.  

यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात अनेक राजकीय नेत्यांवर चरित्रलेख लिहिले.  त्यामध्ये 'लोकशिक्षक काकासाहेब गाडगीळ', तत्त्वचिंतक रचनाकार डॉ. धनंजचराव गाडगीळ, बाबू जगजीवनराव, क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यातील काही लक्षात राहण्याजोगे चरित्रलेख आहेत.  स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील या चरित्रनायकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम या लेखात यशवंतरावांनी केले आहे.  या चरित्रनायकांविषयीची उपलब्ध झालेली अधिक अस्सल माहिती यशवंतराव या लेखांतून देतात.  या राजकीय नेत्यांचा त्यांच्या आयुष्यात घनिष्ठ संबंध आला.  त्यातील काही त्यांचे आयुष्यभर जिवलग मित्र राहिले, तर काही जण यशवंतरावांपासून दूर गेले.  अशा व्यक्तींबाबत त्रयस्थपणे, प्रांजळपणे, अभिनिवेशविरहित चरित्रलेखन यशवंतरावांनी केलेले आहे.  त्यामुळे त्यांच्या या चरित्रलेखनात व मूल्यमापनात वा व्यक्तिविश्लेषणात अधिक स्पष्टता दिसते.  असे असले तरी या चरित्रलेखनातून चरित्रनायकाच्या कर्तृत्वक्षेत्राचे ज्ञान होत असले तरी त्यांचे विशष्ट अपेक्षित रूप हाती लागतेच असे नाही.  कारण येथे चरित्रनायकाचे व्यक्तिमत्त्व, त्याचे त्या क्षेत्रातील वेगळेपण चित्रित करणे हे क्रमप्राप्‍त असते.  स्वातंत्र्यकाळातील या चरित्रनायकांचे चरित्रे लक्षात राहण्याजोगी व स्फूर्तिदायक अशीच चित्रित केली आहेत.  यातून यशवंतरावांची स्फुट चरित्रलेखनाविषयी भूमिका स्पष्ट होत जाते.  शिवाय चरित्रलेखकाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत तसेच नवे गैरसमज निर्माण होऊ नसेत यासाठी यशवंतरावांनी या लेखात केलेले प्रयत्‍न निश्चितच खास उल्लेखनीय आहेत.  

यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या चरित्रलेखनात कल्पकता आणि सत्यदर्शन यांच्यात समतोल राखला आहे.  काकासाहेब गाडगीळ यांच्यासंदर्भात ते लिहितात, ''काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते.  उत्कृष्ट वक्तृत्व, सुबोध लोकशिक्षणात्मक लेखन, ग्रंथकर्ते, राज्यकर्ते अशा विविध स्वरूपात त्यांचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रातील जनतेपुढे आहे आणि सर्व क्षेत्रांत त्यांनी ज्या सहजतेने आणि कुशलतेने कार्य केले आहे ते पाहिले म्हणजे त्यांच्या यशस्वी जीवनाचा अर्थ समजू लागतो.''  अशा विविध पैलूंचे वर्णन ते श्रोता, कार्यकर्ता, तरुण सहकारी, मित्र या नात्याने करतात.  स्वतःच्या वाणीच्या शक्तीवर प्रचंड आत्मविश्वास असलेला त्यांच्यासारखा राजकीय पुढारी क्वचितच पाहण्यास मिळतो असाही त्यांच्या वक्तृत्वाचा ते गौरव करतात.