• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ४९

राजकीय व सामाजिक व्यासपीठापेक्षा साहित्यिक व्यासपीठावर ते अधिक रंगून जात.  वेळेचे अचूक अवधान, आपले विचार अभ्यासूपणाने पण दिलखुलासपणे मांडण्याचे त्यांचे स्वतःचे असे एक सूत्र होते.  त्यामुळे त्यांची भाषणे मनाला सहजस्पर्श करीत.  ऐकणार्‍यांच्या हृदयाला भिडत.  अभिजात साहित्यिकाचं रसिक मन यशवंतरावांच्यात बालपणापासूनच होतं.  विविध ग्रंथ वाचून लहान वयातच त्यांनी जातीयवादाच्या प्रश्नाचा अभ्यास केला होता.  कारागृहात असताना त्यांनी 'कास्ट सिस्टिम ऍंड इट्स इकॉनॉमिक ऍस्पेक्टस' हा एडवर्ड ब्लँट यांचा ग्रंथ वाचून पूर्ण केला होता.  त्यांचे वाचन चौफेर होते.  पण वाचून फक्त 'पुस्तकातला किडा' न राहता त्यांनी त्या वाचनाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात केला.  समाजातील प्रश्नांची उकल करण्यासाठी केला.  माणसांची मने ओळखण्याकरिता व मने सांभाळण्यासाठीही केला.  त्यांचे स्वतःचे ग्रंथालय होते.  प्रत्येक नवीन पुस्तक ते वाचत असत.  ग्रंथालयात इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती इ. भाषेतल्या एकाहून एक ग्रंथांचा समावेश होता.  

त्यांचे ग्रंथप्रेम तर सर्वश्रुत आहेच पण त्याचबरोबर ग्रंथ लिहिणार्‍या साहित्यिकांवरही त्यांनी तेवढेच प्रेम केले.  त्यांना आदराने वागवले.  ना. धों. महानोर, डॉ. सरोजिनी बाबर, माधवी देसाई, रणजित देसाई, कवी सुधांशु, शिवाजी सावंत, सौ. शैलजा राजे, यदुनाथ थत्ते यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.  राजकारणापेक्षा थोडेसे जास्तच ते साहित्यक्षेत्रात रमत असत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  नवोदित साहित्यिकांनाही त्यांनी सतत प्रोत्साहन दिले.  त्यांना रोज येणार्‍या पत्रांमध्ये नवोदित कवी, कवयित्री व लेखक-लेखिका यांच्या पत्रांचा समोवश फार मोठ्या प्रमाणावर होता.  त्यात हिंदी साहित्यिकांचाही समावेश होता.  हे लोक नवीन कविता, नवीन लेख, नवीन प्रकाशित झालेली पुस्तके यशवंतरावांना पाठवत असत.  यशवंतरावही सवड काढून त्यांचे लेख वाचत असत आणि आवर्जून त्यांना पोच पाठवत असत.  साहित्यिक हे महाराष्ट्राचे वैभव आहेत यावर त्यांचा विश्वास होता.  खात्री होती.  कित्येक कवयित्री तर अशा होत्या की त्यांनी आपल्या ग्रामीण बोली भाषेत कविता केल्या, त्या दुसर्‍यांकडून लिहून घेतल्या व अंगठा उठवून त्यांनी यशवंतरावांना पाठविल्या.  जणू यशवंतरावांजवळ आपली मने त्यांनी मोकळी केली.  त्यांना पोच द्यायलाही यशवंतराव विसरले नाहीत.  म्हणजेच राजकारणाप्रमाणेच साहित्यक्षेत्राचेही यशवंतराव राजे होते.  प्रवाह बदलल्यामुळे त्यांना लिहायला सवड मिळाली नाही.  पण जे लिहित होते त्यांना दाद दिल्याशिवाय ते राहिले नाहीत.  आजच्या काळातील साहित्याची आणि साहित्यिकांची चाललेली फरकट, त्यांचे चाललेले अवमूल्यन पाहता यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू आणखीनच चमकू लागतो.  

यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व हे स्वयंभू होते.  स्वकष्टार्जित होते.  त्यांच्या घराण्याला कोणतीही परंपरा नव्हती.  साहित्याची परंपरा नव्हती, राजकारणाची नव्हती.  संगीताची परंपरा नव्हती.  त्या काळात त्यांचे घराणे म्हणजे बडे प्रस्थ होते असाही भाग नव्हता.  ते मोठे जमीनदार होते, वतनदार होते असेही नव्हते.  पण लहानपणापासून प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून, स्वतःच्या दारिद्य्राची तमा न बाळगता व बहुजन समाजात आपण जन्मलो याचा अभिमान बाळगत, प्राप्‍त परिस्थितीला टक्कर देत देत त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व प्रतिष्ठित बनवले असे आवर्जून म्हणावे लागेल.  घरात गायकी नसतानाही त्यांना संगीताची आवड होती.  ते त्यातले दर्दी होते.  संगीत त्यांना समजत होते.  गृहमंत्री असताना त्यांनी दिल्लीत किशोरी आमोणकरांचे गाणे रात्री एक वाजेपर्यंत ऐकले होते.  म्हणूनच यशवंतराव आणि पं. भीमसेन जोशी यांच्यात एक रसिक आणि एक कलावंत यांचे नाते निर्माण झाले होते.  गाणे गाण्यासाठी गाणार्‍याला आणि ते ऐकण्यासाठी ऐकणार्‍याला कोणत्या प्रकारची मनःस्थिती लागते, वातावरण लागते, शिस्त लागते याची यशवंतरावांना चांगली जाण होती.  नागपूरला झालेल्या सरकारी संगीत महोत्सवाच्या वेळी यशवंतरावांनी स्वतःसाठी पं. भीमसेनांचे गाणे थांबवले होते.  नंतर कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून आलेले लोक गाणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.  कोणी झोपलेले होते तर कोणी लोळत होते.  तेव्हा यशवंतरावांनी स्वतः त्या सर्व लोकांना उठवून शिस्तीत बसवले व नंतर गाणे सुरू झाले.  पं. भीमसेनांचे गाणे ऐकण्याची त्यांना किती उत्कट इच्छा होती हे यावरून कळते.