तरुणपणी कराडहून कोल्हापूरला जाऊन पिटात बसून त्यांनी नाटके पाहिली. म्हणजेच ते जसे संगीतवेडे होते तसेच नाट्यवेडेही होते. म्हैसूरकर महाराज, भागवतबुवा, बाबा आळतेकर यांची संगीत भजने व औंधच्या दाजी गुरवाचा पखवाज ऐकण्यात त्यांनी अनेक रात्री घालवल्या. पुढे केंद्रात गेल्यावरही वेळात वेळ काढून अगदी ठरवून ते तिथल्या नाट्यगृहांना भेट देत असत व नाटके पाहात असत. करमणूक म्हणून नाटक पाहणे त्यांच्या स्वभावात नव्हते. तर नाटकाचे कथानक, त्याचे मूळ कशात आहे ? त्यातील कलाकारांनी घेतलेले परिश्रम या सर्व गोष्टींकडे त्यांचे लक्ष असायचे. इंग्रजी साहित्याचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांना परदेशातील नाटकांच्या मुळाशी सहजपर्यंत पोचता यायचे. तेथील संगीत, नाटक यांची आपल्या नाटकांशी, संगीताशी, कलाकारांशी तुलना करायचे. साम्य व भेद शोधायचे. यावरून प्रत्येक गुण, प्रत्येक आवड, यशवंतरावांच्यात किती मुरलेली होती हे लक्षात येते. केवळ प्रतिष्ठा म्हणून त्यांनी संगीत, नाटक, साहित्य व आवडी जोपासल्या नव्हत्या हे खरे.
यशवंतरावांचा व्यासंग चांगला होता. बोलण्यातही ते वाकबगार होते. मितभाषी होते. सर्वात कमी बोलणारे नेते होते. दुसर्या व्यक्तीविषयी फारसे बोलणार नाहीत. बोलले तरी कुचेस्टेने, निंदा किंवा मूल्यमापनात्मक बोलणार नाहीत. आक्रस्ताळेपणा त्यांच्या स्वभावात नव्हता. प्रांजळपणा, मृदू, गोड भाषा. बोलतानादेखील दुसर्यांच्या अडचणी विचारीत, त्यांच्या पाठीवर हात फिरवत, मायेने दुसर्यांच्या मनाला ऊब देत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये स्वाभिमान आणि शालीनता यांचा सुरेख संगम झालेला होता. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्रात एक नवीन आदर्श निर्माण झाला. ते एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते. त्यांच्या विचारात सामान्य माणसाबद्दल आस्था होती. त्यांच्या प्रज्ञेला करुणेचे अधिष्ठान होते. त्यामुळे प्रज्ञा, करुणा व ज्ञान यांचा सुरेख मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. तसेच बदलत्या काळाच्या प्रेरणा ते अचूकपणे ओळखत असत.
माणसांना प्रेमाने आपल्याकडे वळविण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. निष्कपट प्रेम कसं करावं याचं दर्शन ते स्वतःच्या वर्तनातून घडवीत. शब्दांच्या वारेमाप उधळपट्टीपेक्षा यशवंतरावांनी कृतीला महत्त्व दिले. शब्दांची अचूक फेक करणारे ते एक वक्ते होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वस्पर्शी होते. त्यांच्याकडे असलेल्या वक्तृत्व गुणांमुळे ते श्रोत्यांवर सहज छाप पाडत असत. त्यांच्या आवाजात फारसे माधुर्य नव्हते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारे ओज त्यात भरपूर असे. आवाजात एक विशिष्ट लय असल्याने त्यांचे भाषण कधी कंटाळवाणे होत नसे. ते मार्मिक व सूत्रबद्ध बोलत. त्यांच्या बोलण्यात जितका जिव्हाळा तितकाच प्रेमळपणा तर प्रसंगी तेवढाच खंबीरपणा होता. याचा उपयोग त्यांनी समाजप्रबोधनासाठी केला.
यशवंतराव चव्हाण हे अत्यंत हुशार, तडफदार तसेच अत्यंत धोरणी, व्यवहारकुशल होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या हातातील सत्ता संयमाने, विनम्र भावाने वापरली. त्यांच्यामुळे देशात नवा आदर्श निर्माण झाला. सामान्य माणसांच्या जीवनात त्यांना आदराचे व प्रेमाचे स्थान होते. यशवंतराव म्हणजे माणुसकीचे मूर्तिमंत रूप. माणुसकी व जिव्हाळा या पैलूंना त्यांनी अधिक स्थान दिले.
यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व मनाला मोहविणारे होते. कलावंतांच्या कलेचा ते रसिकतेने आस्वाद घेत. जीवनाच्या प्रारंभापासूनच संघर्ष करत करत ते घडत गेले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सामान्य माणसाच्या आशाआकांक्षांचे प्रतीक बनले. माणसांची पारख करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती व कोणता माणूस कोणत्या कामाला घ्यावा याची योजकताही होती. जास्तीतजास्त कार्यकर्ते त्यांनी जमवले. सवंगड्यांशिवाय राजकारण नाही. जवळ असलेल्या माणसांना त्यांनी कधीही तोडले नाही. एखाद्याशी त्यांची मैत्री झाल्यावर ती सहसा तुटत नसे. उलट स्नेह वाढत जाई. बेरजेचे राजकारण त्यांनी केले. कोणत्याही मोहापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असे त्यांनी मानले. भावनाप्रधान असूनही ते भावनेच्या आहारी गेले नाहीत. मानवतेवर आणि मानवतावादावर त्यांची श्रद्धा होती. त्यांचा वाचनाचा व्यासंग मोठा होता. संगीत, साहित्य, नाट्यकला, शिक्षण यांचे ते चाहते होते. कलात्मक सौंदर्याचे त्यांना आकर्षण होते. त्यामुळे त्यांचे मन मोहरून जात असे.
योजकता हा यशवंतरावांचा सर्वात मोठा गुण होता. या गुणामुळे अनेक माणसे जवळ आली. यामध्ये हरतर्हेची माणसे असणे स्वाभाविकच होते. आयुष्यातील कसोटीच्या वेळेला अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. अपमानित केले. पण अशा लोकांना कटुतेची वागणूक द्यायची नाही हे त्यांचे व्रत होते. ते त्यांनी अखेरपर्यंत पाळले. त्यांच्याविषयी कठोरपणे बोलणार्यांना आणि वागणार्यांनाही त्यांनी सन्मानाने वागवले. याचे एकच कारण होते ते म्हणजे बोलणार्या किंवा लिहिणार्या माणसांपेक्षा देशहित त्यांना महत्त्वाचे होते. मनाची शांतता ढळू दिली नाही. शांत व गंभीर वृत्ती ठेवून शुद्ध विचारांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. व्यक्तिगत गुणवत्तेचा दर्जा, सचोटी, प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि स्वीकारलेल्या कार्यावरील निष्ठा, विनम्रता आणि शिष्टाचार इ. गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळ्या प्रकारची झळाळी प्राप्त झाली. संघर्ष टाळून समन्वय कसा साधावा हे यशवंतरावांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.