• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ४८

व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये

यशवंतरावांसारखे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व त्यांच्यानंतर महाराष्ट्रात दुसरे झाले नाही असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल असे नाही.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू होते आणि ते लहानपणापासूनच दिसून येत होते.  तसे पाहिले तर गवयाचे मूल सूरातच रडते या उक्तीप्रमाणे यशवंतरावांना राजकारणाचे किंवा साहित्याचे बाळकडू मिळालेले नव्हते.  त्यांची अशिक्षित आणि गरीब कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता अवघ्या त्रेचाळिसाव्या वर्षी त्यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद ही एक आश्चर्याची बाब वाटते आणि या पार्श्वभूमीवर त्यांचे व्यक्तिमत्त्व खूलून दिसते, मोठे वाटते.

यशवंतरावांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, जेव्हा त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतली.  परंतु त्याआधीही त्यांचे जे स्वभावगुण होते ते त्यांनी स्वतः जोपासले होते.  त्यात उल्लेखनीय वैशिष्ट्य किंवा गुण म्हणजे त्यांचे साहित्यप्रेम आणि त्या निमित्ताने त्यांनी केलेले वाचन.  वयाच्या मानाने त्यांचा वाचनाचा आवाका मोठा होता.  आणि त्यातून आलेली विचारांची खोलीही जास्त होती.  घरात कोणीही हे वाच, ते वाच असे सांगणारे नसतानासुद्धा त्यांनी थिल्लर पुस्तकांचा वाचनात कधीच समावेश केला नाही.  म्हणजेच ही सुद्धा त्यांची उपजत बुद्धीच होय.  माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याने वाचलेल्या ग्रंथांचा फार मोठा परिणाम होतो.  त्याने वाचलेल्या व्यक्तिरेखा, वाचलेले विचार यातील आपल्याला काय भावेल, आवडेल त्याप्रमाणे वागण्याचा माणूस प्रयत्‍न करतो.  यशवंतरावांच्या बाबतीत कदाचित तसेच झाले असेल.  वाचनामुळे लहान वयातच त्यांच्या मनाचा पाया भक्कम बनला असेल आणि त्यातून त्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व जन्माला आले असेल.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची निर्भीडपणाची चुणूक त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये शिकत असतानाच पुढे 'मी यशवंतराव चव्हाण होणार' या विधानाने दाखवली होती.  

बहुजन समाजातील गरीब शेतकरी कुटुंबातील जन्म, अत्यंत प्रयासाने हाल-अपेष्टा सोसूनही शिक्षण घेण्याची तळमळ, भोवताली चाललेल्या राष्ट्रीय व जागतिक घडामोडी जाणण्याची तीव्र जिज्ञासा इ. गोष्टींमुळेच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण घडण झाली आहे.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या इतरांबद्दलच्या जिव्हाळ्याचे मूळ हे त्यांना लहानपणी भोगाव्या लागलेल्या हाल-अपेष्टांमध्ये असावे.  जे प्रसंग आपल्यावर आले ते बिकट प्रसंग आपल्या सांनिध्यात आलेल्या इतरांवर येऊ नयेत या मनोभूमिकेतून माणूस इतरांना मदत करतो, यशवंतरावांनी हेच केले.  त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल आत्मीयतेने, जिव्हाळ्याने आठवणी सांगणारे लोक आजही भेटतात.  त्यांच्या आठवणींवर मोठमोठे ग्रंथ प्रसिद्ध होतात.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिताना या माणसांना शब्द अपुरे पडतात.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व सौजन्यशील होते.  त्यांनी शिकत असतानाच समाज जाणला, राष्ट्र जाणले आणि स्वातंत्र्याची महती ओळखली.  परकीय चाकरीचा मोह त्यांना आकर्षित करू शकला नाही.  सौजन्यशील हा त्यांचा स्थायीभाव होता.  त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रथमपासूनच अभ्यासू होते.  त्यांची वृत्ती चिंतनशील होती.  यशवंतराव तीव्र बुद्धिमत्तेचे होते.  स्वतःच्या विचारांनी चालणारे होते.  इतरांच्या दबावाखाली सहसा ते येत नसत.  त्याचवेळी इतरांचे म्हणणे झुगारून लावताना त्यांचे मन न दुखवण्याची काळजी ते घेत.  बेजबाबदारपणे ते कधीही विधाने करत नसत.

मराठी भाषेशिवाय इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू या भाषांचेही त्यांना ज्ञान होते.  अकरावीच्या निरोपसमारंभाच्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांतर्फे इंग्रजीतून केलेले भाषण हे प्रमुख पाहुण्यांच्या भाषणापेक्षाही सरस ठरले होते.  म्हणजे कुमारवयापासूनच त्यांचे वक्तृत्व चांगले होते.  तसेच सभाधीटपणाही होता.  म्हणूनच त्यांचे मित्र द. र. कोपर्डेकर त्यांच्या आठवणी सांगताना लिहितात की यशवंतराव राजकारणी झाले नसते तर साहित्यिक झाले असते.  वाचनाच्या व्यासंगामुळे मोजक्या शब्दांत परिणामकारकता कशी साधावी याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते.  यशवंतराव अनेक सभासंमेलनांना हजर राहिले.  पण प्रत्येक ठिकाणी वक्तृत्वात ते कधीही कमी पडले नाहीत.  त्यांचे कुठल्याही व्यासपीठावरचे भाषण कधीच रूक्ष व सत्वहीन झाले नाही.