यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ७

प्रस्तावना

स्वर्गीय श्री. रा. ना. चव्हाण यांच्या विखुरलेल्या लेखांचं संकलन करून ग्रंथरूपात ते प्रसिद्ध करण्याचा जो फार महत्त्वाचा प्रकल्प त्यांचे पुत्र श्री. रमेश चव्हाण यांनी गेली काही वर्षे सुरू ठेवला आहे, त्यामध्ये हे एक महत्त्वाचं पुस्तक होणार आहे. याचं महत्त्व यासाठी आहे की महाराष्ट्र राज्य निर्माण करणा-या कै. यशवंतरावांच्या कामगिरीचं साक्षेपी विश्लेषण या पुस्तकामध्ये वाचकांना उपलब्ध होत आहे. यशवंतरावांचे कै. रा. ना. चव्हाण समकालीन होते व चव्हाणांचा राजकीय उदय आणि अस्त यांचे ते जवळून निरीक्षण करत होते. कै. रा. ना. चव्हाणांनी ज्या नि:पक्षपातीपणानं यशवंतरावांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं आहे, त्याला तोड नाही. श्रेष्ठींची समजूत घालून यशवंतरावांनी ‘मंगल कलश’ म्हणून महाराष्ट्र मिळवला, हे अर्धसत्य म्हणता येईल. पूर्ण सत्य हे आहे की संयुक्त महाराष्ट्रासाठी आसुसलेल्या मराठी मतदारांनी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली व संयुक्त महाराष्ट्र समितीला भरघोस मतं दिली, त्यामुळे श्रेष्ठींचे मतपरिवर्तन झाले. पण या राजकीय घडोमोडींमध्ये यशवंतरावांची भूमिका कशी घडत गेली, याचा मागोवा या पुस्तकाच्या विवेचनातून वाचकांच्या हाती पडणार आहे. सत्यशोधक चळवळीचा न पुसणारा ठसा बरोबर घेऊन पण राजकीय क्षेत्रातलं लोकमान्यांचं श्रेय मानणारे यशवंतराव होते, यात शंका नाही. म्हणूनच यशवंतरावांची वैचारिक जडणघडण स्वच्छ रीतीने मांडणारं हे पुस्तक महत्त्वाचं आहे.

यशवंतरावांचं आत्मचरित्र आहे; पण ते एक तृतीयांश आत्मचरित्र म्हणता येईल. बाकीचा दोन तृतीयांश वृत्तांत लिहिण्याचा यशवंतरावांचा संकल्प मृत्यूनं अचानक झडप घालून अशक्य केला. या अपूर्ण आत्मचरित्राचा उपयोग कै. रा. ना. चव्हाणांनी पहिल्या सुरूवातीच्या प्रकरणात भरपूर केला आहे. ते वाचलं की यशवंतरावांची भूमिक कशी निर्माण झाली हे स्पष्ट होतं.

“(कराडच्या) टिळक हायस्कूलचे यशवंतराव चव्हाण हे एक विद्यार्थी होते व त्यांच्यावर तेथील वातावरणाचा परिणाम जास्ती होणे अशक्य नव्हते व पूर्ववयातील संस्कार बलवान राहतात, यातही नवल नाही.” हे चव्हाणांच्या टिळकनिष्ठेचं निदान त्यांच्याच ‘कृष्णाकाठ’ च्या आधारानं मांडलं आहे. पण त्याबरोबरच यशवंतरावांच्या घरातच वडील बंधू गणपतराव हे कै. भाऊसाहेब कळंबे या क्रांतिकारक व सत्यशोधक चळवळीशी संबंद असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाखाली वैचारिक पिंड बनलेले होते. त्यांचीही मार्ग दाखवीत होतीच. “नाही म्हटले तरी सत्यशोधकीय व ब्राह्मणेतर चळवळीचे संस्कार मनावर नकळत होतच होते” असं चव्हाणांनीच आत्मचरित्रात नोंदवलं होतं. अशा दुहेरी वैचारिक निष्ठांचा यशवंतरावांच्या मनावर जबरदस्त परिणाम होत गेला. जवळकरांची भाषणं ऐकली आणि त्यांचं ‘देशाचे दुष्मन’ हे पुस्तकही मिळवून वाचलं होतं. कै. पंढरीनाथ पाटील यांचं फुले चरित्रही याच काळात उपलब्ध झालं होतं व यशवंतरावांनी काळजीपूर्वक वाचलं होतं. “सावध व हुशार बुद्धी वैभव त्यांना जन्मप्राप्तच होतं व वर्धमान वाचनानं ते त्यांनी वाढीस आमरण लावलं. ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात म. फुल्यांच्या संबंधानं जे यशवंतरावांनी लिहिलं आहे, त्यावरून त्यांच्या मनात टिळकांच्याविषयी जो आदर होता, तितकाच म. फुल्यांच्याविषयी होता.” काही काळ हिंदुत्वाचा विचारही यशवंतरावांना घेरून बसला होता पण लवकरच त्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आला व ते त्यातून बाहेर पडले. “ब्राह्मणेतर चळवळीची चिकित्सा महर्षी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहानुभूतीने पण कठोर न्यायबुद्धीने केलेली होती. ती चव्हाणांनी वाचली होती. विद्यार्थी दशेपासून चव्हाणांत विवेक दिसतो.” असा निष्कर्ष कै. रा. ना. चव्हाण काढतात.