यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ६

अपेक्षा-

सदर लेख संग्रहात “सामाजिक सुधारणांचा इतिहास” असे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेले २२.०६.१९७० रोजीचे रा. ना. चव्हाण यांचे एक पत्र उदधृत केले आहे. त्यात यशवंतरावांनी “सामाजिक सुधारणांचा चिकित्सक इतिहास उपलब्ध व्हावा” अशी अपेक्षा व्यक्त केली होती असा उल्लेख आहे. अद्यापि असा इतिहास उपलब्ध नाही. तो महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन पुरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्मरणार्थ भारत सरकारने पोष्टाचे तिकीट काढावे असा प्रयत्न ‘रा. ना.’ यशवंतराव चव्हाण यांच्या मदतीने करत होते. वाई ब्राह्मसमाजामार्फत पत्रव्यवहारही झाला होता. असा उल्लेख ‘रा. नां.’ च्या एका लेखात आहे. ते काम आजपर्यंत झाले नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासन व महर्षी वि. रा. शिंदे यांचेविषयी आस्था असलेल्या संस्था व व्यक्तींनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.

समारोप-

‘रा. ना.’ चे प्रबोधनपर लेख संग्रहीत करावेत ह्या ‘साहेबांनी’ व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणे मी हळूहळू का होईना ते काम स्वावलंबनाने, वैचारिक वाड्मय उपेक्षित राहत असणा-या काळात करत आहे. त्यास गती येणे आवश्यक आहे.

“यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण” या विषयावरील ‘रा. ना.’ च्या लेखसंग्रहाचे हे पुस्तक, यशवंतरावांच्या वैचारिक जडणघडणाची प्रक्रिया अधिक स्पष्ट करणारे असल्यामुळे या पुस्तकास वाचक, अभ्यासक, समाजचिंतक व राजकीय कार्यकर्ते चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास आहे.

२९ ऑक्टोबर २०१०         श्री. रमेश चव्हाण
रा. ना. चव्हाण जयंती     संपादक व प्रकाशक