यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५३

चव्हाणांचे समाजकारण हे पुढारलेल्यांना उपयुक्त ठरले. सत्ता ही लोकोद्धारार्थ वापरता येते व त्यासाठी स्वातंत्र्यातील सत्ता वापरली पाहिजे. या ध्येयानेच ते खुर्चीवर सतत राहिले. सत्तेशिवाय शहाणपण नाही. चव्हाणांच्या जमेस अनेकविध कार्ये आहेत. त्या सर्वांकडे मी राजकारणच म्हणून पाहात नाही. उदा. वाईचा विश्वकोश चव्हाणांनी चालू करून दिला. त्यात दलित विचारवंत व माजी मंत्री रूपवते हे उपसंपादक होते. ‘साहित्य व संस्कृती’ हा समाजकारणाचा भाग असतो. तर्कतीर्थांची या सांस्कृतिक मंडळावर चव्हाणांनी जी निवड केली ती कालांतराने देखील योग्य ठरली व प्राज्ञ पाठशाळेला जोड मिळाली व तिचे संवर्धन झाले.

ग्रामीण नेतृत्व पुढे यावे म्हणून जिल्हा बोर्डाचे रूपांतर पंचायत राज्यात केले. ही क्रांती (सामाजिक) झाली. ग्रामीण नेतृत्व पुढे आणणे हे चव्हाणांचे सामाजिक ध्येय होते. त्यांच्या जिल्ह्याची काँग्रेस स्वातंत्र्यपूर्वकाळात वकील, इनामदार वगैरे शहरी नेतृत्वाच्या हातात होती. चव्हाणांच्या ग्रामाभिमुख बहुजनी नेतृत्वामुळे शहरी पांढरपेशे नेतृत्व झाकाळले गेले. मागे पडले. असे घडवून आणताना शहरी विरूद्ध ग्रामीण असा वाद होऊ दिला नाही.

जिल्हा लोकल बोर्डाचे महत्त्व चव्हाणांनी कृष्णाकाठात सांगितले आहे. सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळीमुळे जिल्हा लोकल बोर्डे ग्रामीण भागाच्या पुढा-यांच्या ताब्यात आली. शिक्षणप्रसार वाढू लागला. सातारा जि. लो बोर्डावर खान बहाद्दूर कूपर या शहरी नेतृत्वाचा पुष्कळ वर्षे कब्जा होता व कै. कूपर इंग्रज सरकारचे मोठे मित्र होते. प्रस्थापित व घरंदाज मराठा पुढारी वैयक्तिक हितास्तव कूपरचे दास झाले होते. यशवंतरावांनी त्यांच्याऐवजी श्री. बाबासाहेब आरवाडकर शिंदे या गांधीवादी, ग्रामीण भागातून वर आलेल्या पुढा-याला अध्यक्ष केले. १९३० सालीनंतर शिंदे-जेधे-बागल-ना पाटील वगैरेंच्यामुळे ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये गेला. पण काही राहिले होते. यांचा प्रभाव १९३७ ते १९४० पर्यंतच्या काळात थोडाफार शिल्लक होता. हे सरकारजमा असत. भूमिगत चळवळीत हे नामोहरम झाले. अंतर्गत लढा होता तो सरकारजमा नेतृत्व व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वातंत्र्यप्रिय नेतृत्व यांच्यामधील होता.

ब्राह्मणेतर ही परिभाषा मागे पडून १९३० नंतर ‘बहुजन समाज’ ही भाषा पुढे आली. पूर्वी विद्येत मागासलेले व विद्येत पुढारलेले असे दोन सांस्कृतिक वर्ग होते; वस्तुस्थिती होती.

काँग्रेसची चळवळ आणि अन्य चळवळी या ब्राह्मणांसाठी चाललेल्या चळवळी असल्याचा जावई-शोध सत्यसमाजी लावू लागले. असे एक विधान ‘इतिहासाचे एक पान-यशवंतराव’ या रामभाऊ जोशी कृत चव्हाणांच्या विस्तृत चरित्रात लेखक रामभाऊ जोशी यांनी केले आहे. (पृ. १८ पहा) या विधानाचे खंडण कृष्णाकाठात मिळते.