चव्हाण जसे मागे सत्यशोधखी चळवळीपासून दूर झाले म्हणजे त्यातील त्याज्य बाबींपासून दूर झाले. पण आर. एस. एस. पासूनही पूर्ण दूर राहिले. रत्नागिरीस त्यांची व बॅ. सावरकर यांची समक्ष गाठ पडली होती. पण चव्हाण त्यांचे पुढे-मागे कधीच अनुयायी झाले नाहीत. चव्हाण मुख्यत: राजकारणी होते, त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्रात जास्ती करून राष्ट्रीय चळवळीची व त्यांनी केलेल्या काँग्रेस पक्षीय राजकारणाची माहिती जास्तीत जास्त आहे. फार काळ त्याचे पुढील अखेरपर्यंतचे चरित्र एका राजकारणी पुरूषोत्तमाप्रमाणे विशेष करून ठरते. पण त्यांची पुरोगामी सामाजिक मते व समाजकारण हा त्यांचा व्यापक राजकारणाचा पाया ठरतो. या निकोप पायामुळे त्यांचे राजकारण विशाल झाले. नव्या दिल्लीस (१) रेसकोर्स रोडवरील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत स्वयंसेवक संघाचा विषय निघालाच. कारण चर्चेला एकच विषय नियोजन नव्हता. म्हणूनही आम्ही दोघे मनमोकळे पणाने खाजगीत बोललो. माझा मुलगा चि. रमेश बरोबर होता. तो दिल्लीत नोकरीस असल्यामुळे चव्हाणांकडे अनेकवार जात असे. तो विद्यार्थी असताना पुण्याच्या एस. पी. कॉलेजच्या पटांगणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक मोठे शिबीर भरले होते. वाईच्या क्षेत्रस्थ मुलांच्या संगतीमुळे तो शिबीरास गेला होता. शिबीर मोठे झाले. या शिबीरास गोळवलकर व दत्तो वामन पोतदार आलेले होते. त्यांची खाजगी चर्चा चालू होती. ती चि. रमेशला योगायोगाने हळूच जवळून ऐकावयास मिळाली! दत्तो वामन पोतदार यांनी गोळवलकर यांना सांगितले की – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कलेक्टर व वरिष्ठ अधिकारी यांना लागणारी परीक्षा पास झाले व ते सर्वच प्रांताचे कलेक्टर असतील तर, संघाचे चोहोंकडे होऊ शकेल.’ राज्य ताब्यात ठेवण्याचा हा एक हुकमी मार्ग गोळवलकरांना दत्तो वामन यांनी सांगितला. हा ऐकलेला संवाद चि. रमेश याने यशवंतराव यांना सांगितला. चव्हाण लगेच म्हणाले की ‘हे जे तुम्ही सांगत आहात ते मी माझ्या हृद्याच्या आतील कप्प्यात ठेवीत आहे.’ यावरूनही चव्हाणांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मत कसे होते, हे दिसून आले. ही आठवण वाचकांना जास्ती कल्पना यावी म्हणून येथे सांगितली आहे. सन १९८१ मध्ये ही गाठभेट निवांत झाली. मोकळे बोलणे एकूण ४६ मिनिटे झाले.
यशवंतरावांना कोणताही जातियवाद मान्य नव्हता. स्वत: ‘मराठा’ म्हणून किंवा ‘ब्राह्मणेतर’ म्हणून त्यांनी कधीच समाजकारण केले नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर त्यांनी – संयुक्त महाराष्ट्र हा सर्व मराठी भाषिकांचा आहे असा खुलासा केला. सन १९४८ साली महात्मा गांधी वधोत्तर जाळपोळ झाली. त्यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजाला नवी घरे बांधण्यास जी कर्जे दिली होती ती माफ केली. वाईच्या प्राज्ञ पाठशालेच्या सरस्वती केवलानंद स्मारकास लाखो रूपये दिले. विश्वकोशाचे कार्य तेथेच चालू केले.
महाराष्ट्रात ब्राह्मण- अब्राह्मणवाद होता व भूमिगतपणे तो उभयपक्षी मनातून व खाजगीतून अद्याप आढळते. तसाच मराठा- मराठेतर वाददेखील असतो. या वादामुळेच मागे ब्राह्मणेतर पक्षाची शोकांतिका झाली. यशवंतरावांनी मराठेतरांना खूप वाव दिला. कै. किसन वीर हे तर त्यांचे उजवे हात होते.