साहेब
(पार्श्वसंगीत...... निवेदन...... स्पॉटच्या केंद्रीकृत प्रकाशात सादरकर्ता)
महाबळेश्वरला,
एकाच ठिकाणी पाच नद्या उगम पावतात;
ह्या पाचही बहिणींच,
एकमेकींवर अमर्याद प्रेम!
जन्मस्थानी वेगळं अस्तित्व,
पण ते तेवढयापुरतंच......
त्यांनी फुगडीचा फेर धरलाय असं वाटावं,
तोच हातात हात घालून,
सुंदर गोफ विणून
त्या एकदिलानं गोमुखातून बाहेर पडतात.
ती शुभ्र धार कुंडात उडी घेते,
आणि पुन्हा जमिनीखालून वेगवेगळया वाटांनी
त्या निघून जातात........
शंभर मैलांच्या आत,
त्यांचा पुन्हा मिलाफ होतो.
आणि कराडपासून पुढं सगळयाजणी कृष्णामय बनूनच,
सागराच्या भेटीला निघतात!
संगमावर आनंदाचा कल्लोळ उठतो!!
(वाद्यमेळांचा कल्लोळ, जलदगती सतारीचा तुकडा ऐकू येतो)
विभिन्नतेतच एकात्मता नांदते, ती अशी.
(संपूर्ण रंगमंच उजळतो)
त्यांचं पंचामृत मोठया पात्रात साठतं,
सुगंधित आणि चविष्ट बनून
पांथस्थांची तहान भागविण्यासाठी,
सगळयांना दिलासा- ओलावा देण्यासाठी
पूर्वमुखी होऊन वाहू लागतं:
जगाची संस्कृती आज जशी पूर्वमुखी होऊन
वाहू लागली आहे- तसंच!
देवराष्ट्र हे माझं जन्मगाव....
देवपण घेऊन जन्माला आलेलं-
सागरोबाच्या चारी बाजू आनंदबनानं भरलेल्या,
धर्म, अर्थ, काम, मोक्ष-
हे चारही पुरूषार्थ इथं सार्थपणे वावरतात!
सुपीक जमिनीत बी पेरलं,
म्हणजे चांगलं फोफावतं-
तशी इथली माणसं आणि त्यांची मनं....
या मातीचा गुण आणि मोल,
मी माझ्या तोंडानं काय सांगू?