भूमिका-१ (68)

हिंसेला हिंसेने उत्तर देण्याच्या प्रवृत्तीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण होते. असे घडल्याची जगाच्या इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत. उफाळत्या हिंसाचाराच्या झंझावातातही भारत लोकशाही वाचवायला समर्थ ठरू शकेल, असे मानणे भ्रामक ठरेल. हिंसाचाराचा केव्हाही बीमोड करता येईल आणि सरकार सध्या ज्या पद्धतीने हिंसाचाराचा बंदोबस्त करीत आहे, त्यापेक्षाही कठोर उपाय सरकारने योजावेत, असे काहीजणांचे म्हणणे आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था यांपुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. आपल्या राज्यव्यवस्थेच्या पायाशीच तो निगडित आहे. जर आपल्याला द्रुतगतीने आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशात शांतता नांदणेही तितकेच आवश्यक ठरते. म्हणून द्रुतगती व बहुविध परिवर्तनाच्या काळातील आपल्या जबाबदा-या नीटपणे पार पाडण्याची प्रशासनाला जाणीव करून देणे आणि त्यासाठी त्याला सार्वजनिक शांतता-रक्षणाची सर्व चांगली साधने उपलब्ध करून देणे हे आपले पहिले उद्दिष्ट ठरेल, यासंबंधी राष्ट्रिय सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे आपले दुसरे उद्दिष्ट असावयास हवे. या प्रक्रियेमध्ये असंख्य अडचणी येतील, याची मला जाणीव आहे. स्वतंत्र समाजामध्ये निषेधाला वा मतभेदाच्या उच्चाराला वाव असलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर भारतातील कोट्यवधी गरीब नागरिकांना येत्या काही वर्षांच्या आत आशादायक भवितव्य निर्माण करावयाचे असेल, तर शांतताही तेवढीच आवश्यक आहे.

दुसरा धोका अधिक गंभीर आणि मूलभूत आहे. जेव्हा दंगल उत्स्फूर्तपणे उद्भवते किंवा संतप्त जमावाने हाती घेतलेली नसते, तेव्हा ती अधिकच चिंताजनक बनते. सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्यासाठी, हिंसाचार हाच एकमेव मार्ग आहे, अशी श्रद्धा बाळगणा-या गटांकडून केली जाणारी हिंसा या प्रकारात येते. संसदीय लोकशाहीचे संपूर्ण उन्मूलन करण्याची भाषा बोलणारे गट, अजून लहान आणि विखुरलेले आहेत, तोवर या दुस-या धोक्याची नीट कल्पना येत नाही. म्हणूनच अनेक ठिकाणी दंगली घडवून आणणा-या अशा या गटांच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही. या बाबतीतील सर्वांत अधिक जबाबदारी, लोकशाही समाजवादावर ज्यांची निष्ठा आहे, अशा राजकीय पक्षांवर येते. अशा तऱ्हेच्या उठावांचा सरकारने आपल्या लष्करांचा वापर करून बीमोड करावा, असे जर एखादा राजकीय पक्ष मानत असेल, तर तो गंभीर चूक करीत आहे, असेच म्हटले पाहिजे. ज्याप्रमाणे लोकांच्या मनातील जातीयवादी वृत्ती आणि मूल्ये नाहीशी करण्यासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करावे लागतील, त्याचप्रमाणे हिंसाचारावर विश्वास ठेवणा-या लोकांच्या कल्पना बदलण्यासाठीही तेवढ्याच निकराचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एखाद्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी हिंसाचार आवश्यक आहे, या कल्पनेचा उद्भव प्रथम माणसाच्या मनात होतो. आणि म्हणून माणसाच्या मनातच लोकशाहीचे श्रेष्ठत्व बिंबविण्याचा प्रयत्न व्हावयास हवा.

आपल्या विचारांची आणि कृतींची दिशा कोणती असली पाहिजे, यासंबंधीचे माझे विचार मी येथे मांडले आहेत. लोकशाही समाजवाद आणि धर्मनिरपेक्षवाद या मूल्यांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस झुंज देत आहे, असे मी मानतो. सार्वजनिक धोरणासंबंधी जागरूक आणि मोकळी चर्चा होत राहणे हाच ही मूल्ये जतन करण्याचा विश्वसनीय मार्ग आहे. अशा चर्चेमुळे लोकमत घडविता येते आणि त्याचबरोबर सार्वजनिक धोरण लोकांच्या आकांक्षांशी अधिक सुसंवादीही करता येते. राजकारण आणि अर्थकारण यांचा संबंध घनिष्ठ आहे. म्हणून आपल्यापुढील गुंतागुंतीचे आणि अवघड प्रश्न सोडविण्यासाठी आपल्यापाशी परिणामकारक आर्थिक नेतृत्वही हवे. हे प्रश्न हाताळताना हेतुनिष्ठ राजकीय एकजूट आणि सामंजस्य साधता आले, तर आपले कार्य नक्कीच सुकर होईल.