भूमिका-१ (6)

२. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संरक्षणमंत्री असताना

२९ डिसेंबर ६५ रोजी
मद्रास येथे केलेल्या भाषणाचे रूपांतर.

भारताच्या महान लढ्यातील एका ऐतिहासिक घटनेशी 'आवडी' हा शब्द निगडित आहे. समाजवादी समाजरचना या महान संकल्पनेचा पहिला उच्चार आवडी येथेच झाला. या संकल्पनेत एक नवे स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. याच आवडीने पुन्हा एकदा इतिहास घडविला आहे. स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी या इतिहासाचा अनुबंध आहे. संरक्षण खात्याच्या आवडी येथील कारखान्यातून आज पहिला रणगाडा बाहेर पडत आहे. देशाची संरक्षणक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे, ही केवळ माझ्याच दृष्टीने नव्हे, तर आपणां सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची घटना आहे.

सध्या आपल्याला अनेक अवघड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यांतील एक समस्या देशाच्या संरक्षणाशी संबंधित आहे. संरक्षणाच्या समस्येस विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे; परंतु संरक्षणाचा एकाकी विचार करता येत नाही. देशाच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात संरक्षणाचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. तसेच देशाभोवती ज्या राजकीय शक्ती वावरत आहेत आणि संपूर्ण जगामध्ये जे शक्तिसंतुलन चालू आहे, त्याचाही विचार करावा लागतो.

१९६० पासूनचा कालखंड आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत लक्षणीय कालखंड ठरलेला आहे. म्हणून या कालखंडातील संरक्षणविषयक प्रश्न जाणून घेण्यासाठी, आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाल्यापासून येथे कोणत्या राजकीय शक्ती विकसित झाल्या, यांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. कारण त्याशिवाय सध्याच्या प्रश्नांची ऐतिहासिक पार्श्वभूमी कळून येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच आपल्या नेत्यांनी देशाच्या परराष्ट्रीय धोरणासंबंधी अत्यंत महत्त्वाचा मूलभूत निर्णय घ्यावा, हे क्रमप्राप्तच होते. जागतिक शांततेच्या मूलभूत संकल्पनेवर आपले परराष्ट्रीय धोरण आधारलेले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. शेजारी देशांसह सर्व देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे, हा त्या धोरणाचाच एक भाग होता - परंतु त्या काळातही पाकिस्तानने - जो एके काळी भारताचाच भाग होता - भारतासंबंधी मित्रत्वाची भूमिका घेतली नाही. आपण १९५० मधील परिस्थितीचा विचार केला, तर आपल्याला असे आढळून येईल, की भारताचे चीन आणि रशिया या अन्य दोन शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध निश्चितच चांगले होते. हा एक त्रिकोणच होता. रशिया आणि चीन यांचे संबंध चांगले होते, चीन आणि भारत यांचे संबंध चांगले होते आणि भारत नि रशिया यांचे संबंध चांगले होते. पाकिस्तान मात्र त्यावेळी या त्रिकोणाबाहेर होता.

१९६० मध्ये ही परिस्थिती बदलली. रशिया आणि चीन यांचे संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. भारत आणि चीन यांचे संबंध 'मैत्रीचे' होते. भारत आणि रशिया यांचे संबंध केवळ चांगले राहिले, असे नव्हे, तर ते बळकटही झाले.

या काळात पाकिस्तानने अत्यंत चतुराईने राजकीय डावपेचांची आखणी करून चीन आणि रशिया यांच्याबरोबरचे संबंध सुधारायला प्रारंभ केला. येथपासून शक्तिसमतोलात बदल होऊ लागला. म्हणून आपल्याला ही समग्र परिस्थिती ध्यानात घ्यावयास हवी. शक्तिसमतोलातील बदल कशामुळे घडून आला? हा समतोल आता कसा आकार घेत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत.