महाराष्ट्रासंबंधी लोक मला विचारतात, त्यावेळी मी त्यांना हेच सांगत आलो आहे, की महाराष्ट्र काँग्रेसची शक्ती ही तेथील असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती आहे. हे कार्यकर्ते चळवळीत वाढले आहेत. शेकडो गावांतून ते विखुरले आहेत. काँग्रेसबरोबर ते सातत्याने उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने सरकारमार्फत व पक्षातर्फे विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन नागरी व ग्रामीण जीवनात नवीन आशा व उत्साह निर्माण केला. समाजातल्या विविध वर्गाचे, जातीजमातींचे व धर्मांचे लोक त्यात आहेत. शेतकरी आहेत; कामगार आहेत, मध्यमवर्गीय आहेत. खेड्यांतील आहेत आणि शहरांतलेही आहेत. सदासर्वकाळ जागरूक न राहिल्याने कामात काही त्रुटी किंवा अपुरेपणा निर्माण झाला असेलही, परंतु या सर्वांतून निर्माण झालेली शक्ती ही महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संमीलित झाली आहे. ही शक्ती आणखी वाढवावी लागणार आहे. त्याची आज गरज आहे.
गरज अशासाठी आहे, की देशातील प्रमुख सत्तेचे, कारभाराचे तारू दिशाहीन असलेल्यांच्या हाती गेले आहे. लोकांची गाऱ्हाणी वाढत आहेत. गरीब, हरिजन, शेतकरी, कामगार, मजूर अस्वस्थ आहेत. या सर्वांना दिलासा देण्याचे आणि त्यांची गाऱ्हाणी ही आपली स्वत:ची गाऱ्हाणी समजून उभे राहण्याचे काम करावे लागणार आहे. लोकांच्या दैनंदिन गाऱ्हाण्यांनुसार कामगारांत, शेतकऱ्यांत, आदिवासी लोकांत प्रत्यक्ष जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काम करावे लागेल. त्यासाठी कामाची शिस्त सांभाळून कार्यक्रमाची मांडणी केली पाहिजे. अशिक्षितांच्या रोजगारीचा प्रश्न आहे, तसा सुशिक्षितांच्या रोजगारीचाही प्रश्न तितकाच तीव्र असल्याने त्यासाठी वेगवेगळे काम सातत्याने करावे लागेल. जसा काळ जाईल, तसे हे प्रश्न अधिक सूक्ष्म बनतील. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या वागण्यात आणि बोलण्यात टोकदारपणा आणण्याची गरज आहे. विचाराचे वेगवेगळे संस्कार माणसावर सतत होत राहतात. परंतु कार्यकर्त्याने पक्षासाठी एकदा दिलेल्या निष्ठा या विचाराधिष्ठित असतील, तर विचलित होऊ द्यावयाच्या नसतात. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे वैचारिक संघर्ष व वादळे अधूनमधून उठतात. त्यांपासून काही शिकावेही लागते. पण त्यांच्या दडपणाखाली मी स्वत: माझ्या पक्षावरील निष्ठांपासून कधी ढळलो नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे आणि अखेरपर्यंत असेन. माझी ती उमेद आजही अभंग आहे. देशातील नव्या परिस्थितीच्या संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निश्चित कार्यक्रमाचे बोट धरून ठामपणे उभे राहावे, असे मी सुस्पष्टपणे सांगतो आणि त्याच वेळी त्याची कारणमीमांसा करताना आजच्या सत्ताधाऱ्यांच्या उणिवांचा परखडपणे समाचार घेतो, तेव्हा या आक्रमकतेचा, स्वत:ला विचारवंत मानणारेही चुकीचा अर्थ लावून लोकांची मने कलुषित बनविण्याच्या प्रयत्नात असतात, याची मला जाणीव आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याखेरीज मी काय करणार? जनता पक्षासारख्या एका दिशाहीन असलेल्या पक्षाविरुद्ध जनतेला जागे करणे, या देशाचे तारू जनता पक्षाच्या हाती राहणे कसे धोक्याचे आहे, याची कारणमीमांसा मांडणे यात चूक काय? मी आक्रमक भूमिका स्वीकारतो, याचा अर्थ जनता पक्षाच्या उणिवा, स्पष्टपणे-कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलून दाखवतो. परंतु माझ्या या कृतीचा राजकीय पातळीवरून प्रतिवाद करण्याचे टाळून, ज्याच्या मनात माझ्याविषयी पूर्वग्रह आहेत, लिहिण्या-बोलण्यात विकृतता आहे, त्यांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला, तर त्यांची कीव न करावी, तर काय करावे?