• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (151)

या संदर्भात काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांचे स्वरूप पुन्हा एकदा तुलनात्मक दृष्ट्या समजावून घेण्याची गरज आहे, असे मला वाटते. काँग्रेस पक्षाचे स्वरूप हे राष्ट्रिय आंदोलन-काळातील चळवळीचे स्वरूप राहिलेले आहे. या राष्ट्रिय चळवळीत सर्वच समाज सामील झाला होता, हे त्याचे कारण आहे. या पक्षाचा जो कार्यक्रम आहे, संघटनेची आजची रचना व वस्तुस्थिती आहे, ती पाहिल्यावर काँग्रेस पक्षाला राष्ट्रिय पक्ष संबोधणेच सयुक्तिक ठरते. काँग्रेस पक्षाला कोणी बहुजन समाजाचा पक्ष म्हणूनही संबोधतात. 'बहुजन' हा शब्द मी 'मासेस्' या अर्थाने वापरतो. बहुजन समाज म्हणजे 'अमुक एका जातीचा समाज' असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु महाराष्ट्र या सारख्या प्रांतात बहुजन समाज या शब्दाला एक विशिष्ट, मर्यादित अर्थ प्राप्त करून दिला गेला आहे, काही विचारवंतांना या शब्दातून तसा मर्यादित अर्थ काढण्याची खोड आहे, एवढेच फार तर या संदर्भात मी म्हणू शकेन. मी स्वत: तरी 'बहुजन' शब्दाचा अर्थ 'मासेस्' असाच केला आहे आणि आजही तोच अर्थ मला अभिप्रेत आहे.

एखाद्या पक्षाला बहुजन समाजाचा पक्ष म्हणून राहावयाचे असेल, तर त्या पक्षाला राष्ट्रिय आंदोलनाचे स्वरूप द्यावे लागेल. भारतात काँग्रेस पक्षाला राष्ट्रिय आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, याचे कारण बहुसंख्य समाजाला लागू असलेले दारिद्र्याचे, सामाजिक, सांस्कृतिक उत्थापनाचे जे प्रश्न आहेत, ते आणि असे अन्य प्रश्न काँग्रेस पक्ष स्वत:चे म्हणून आजवर हाताळीत राहिला आहे. दलित समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे कार्यक्रमच या पक्षाने आजवर स्वीकारले. बहुजन समाजाचा पक्ष म्हणून राहायचे असेल, तर हेच कार्यक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांना राबवावे लागतील, हे उघड आहे.

बहुजन समाजातील दारिद्र्याचा प्रश्न पाहा. हा प्रश्न ग्रामीण भागात आहे, तसा नागरी भागातही आहे. नागरी भागात तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी स्पष्टपणे जाणवत असल्यामुळे नागरी भागातील दारिद्र्याचा प्रश्न अधिक बोचक ठरतो. ग्रामीण भाग असो वा नागरी असो, तेथील बहुजन समाजाचे आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्पृश्य-अस्पृश्य यांसारखे प्रश्न सोडवावयाचे असतील, तर ते एक राष्ट्रिय आंदोलन म्हणूनच पक्षाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आजही हा एक कार्यक्रम होऊ शकतो. समाज हा कोणत्याही जाती-जमातींचा असो, त्या ठिकाणी दारिद्र्य हे असतेच. महाराष्ट्रात तर सामाजिक दृष्ट्या स्वत:ला जे वरच्या थरांतील समजतात, त्यांच्यांतही दारिद्र्य आहे आणि इतर खालच्या समाजातही आहे. याचा अर्थ दारिद्र्याचा प्रश्न हा बहुसंख्य समाजाचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाने दारिद्र्याच्या  या प्रश्नाशी मुकाबला करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले, त्यामुळेच तो बहुजन समाजाचा पक्ष बनला आहे.

जनता पक्षाचा विचार करताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती ही, की मूलत: राजकीय शक्तीच्या हिशेबाने, हिंदी भाषिक प्रांतापुरत्या एका विभागीय पक्षासारखे त्याचे मर्यादित स्वरूप दिसते. ग्रामीण भागापर्यंत या पक्षाची मुळे खरी तर रुजलेली नाहीत. जनता पक्षाची कमजोरी ही त्यांचा हा पक्ष स्थापन होतानाच अभावात्मक कारणांनी तो बनवला गेल्यामुळे मुळातच तो कमजोर व कच्च्या आधारावर उभा आहे. काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सात्त्विक रागाची जी मनोभूमिका तयार झाली, त्याचा आधार घेऊन ज्यांचा कार्यक्रम एक नाही, अशा विविध पक्षांनी एकत्र येऊन काही प्रांतांत निवडणूक जिंकली व मग सरकार बनविले. आज केंद्रात ते सत्तेवर असले, तरी हीच खरी जनता पक्षाची कमजोरी आहे.