यशोधन-१४

जेव्हा विकासाच्या या मोठ्या यात्रेमध्ये तुम्हां-आम्हांला आपल्या देशाला पुढे घेऊन जावयाचे आहे, तेव्हा काही कठीण शिस्तीचे प्रयोग आपल्याला या देशामध्ये स्वीकारावे लागतील. प्रगत देशांमध्ये आढळणा-या सगळ्या सुखसोयी आणि गरीबी हटविण्याची गरज या दोन्हींचे लग्न लागत नाही, हे आपण आता ओळखले पाहिजे.

ग्रामीण विरूध्द नागरीकरण हे प्रश्न एकमेकांत इतके गुंतलेले आहेत की, एकाच्या सुखाचा, दुस-याच्या दु:खाशिवाय आपणाला विचारच करता येत नाही. खेडे आणि शहर यांची सुखदु:खे ही अशी परस्परांशी भिडलेली, परस्परात मिसळलेली आहेत.

आम्हांला आकाशात भरा-या मारावयाच्या नाहीत. आम्हांला जमिनीवर चालावयाचे आहे आणि येथे टिकावयाचे आहे आणि त्याचबरोबर जमिनीवरून ‘टेक ऑफ’ –उड्डाण कसे करता येईल, इकडे आमची दृष्टी सतत राहिली पाहिजे.
 
आपल्या शेतीचा प्रश्न हा या आंधळ्याच्या गोष्टीचल्या हत्तीसारखाच फार मोठा प्रश्न आहे. कोणाला या प्रश्नाचा हा भाग दिसतो तर कोणाला तो. पूर्वी रामाला रावणाशी लढताना फक्त दहा तोंडाच्या रावणाशी लढावे लागले होते; परंतु या शेतीच्या प्रश्नाशी लढावयाचे म्हणजे शंभर तोंडे असलेल्या रावणाशी आपणाला लढावे लागणार आहे. आपल्या शेतीचे प्रश्न अनेकविध आहेत. लहान मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, दीर्घ मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, बागायतीचा प्रश्न आहे, बियाण्यांचा प्रश्न आहे. खतांचा प्रश्न आहे, तुकडेबंदीचा प्रश्न आहे, असे अनेकविध शेतीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नही नेहमी बदलत राहणार आहेत. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शेतीचा विकास अनेक शतके थांबला होता. दहा-पाच वर्षे तो थांबला असता, तर ती मोठी काळजी करण्यासारखी गोष्ट ठरली नसती; परंतु शेकडो वर्षे खितपत पडलेला असा हा प्रश्न असल्यामुळे त्यावर पुष्कळच विचार झाला पाहिजे.
 
शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये वाढविला पाहिजे. यासाठी येथे शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याचे अधिकारी होऊन जाणार असतील आणि जावयाच्या शर्यतीमध्ये त्या निमित्ताने पुढे सरकणार असतील, तर मी असे म्हणेन की, ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. येथे शिकलेला मनुष्य शेतकरीही होऊ शकला पाहिजे, तसे त्याने झाले पाहिजे.
 
तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही. तुमची शेती हा देशाचा विषय झाला आहे. आम्ही. आमची शेती पिकविली नाही तर आम्ही आमच्या घरामध्ये उपाशी राहू असे म्हणून तुम्हांला आता चालणार नाही. तुमची शेती तुमची आहे, पण तशीच ती देशाचीही आहे. तुमची शेती पिकली नाही, तर तुमचे नशीब पिकणार माही एवढाच त्याचा अर्थ नाही, तर त्याचबरोबर देशाचेही नशीब पिकणार नाही.
 
भगीरथ राजाने गंगा जमिनीवर आणली, पण त्याने गंगा आकाशातून आणली नाही. स्थापत्यशास्त्राचे चांगले ज्ञान असलेला तो शहाणा मनुष्य असला पाहिजे. तिकडे बाजूला तोंड करून जाणा-या नदीला त्याने मधला एखादा खडक फोडून गंगोत्रीपर्यंत वळवून आणले असावे, आणि मग त्याने गंगेला खाली उतरविली असावी.

डोंगरपठाराला ही सभा बसली होती. सभेला सुरूवात होताच सहकारी शेतीची तत्त्वे आणि शेतीच्या उत्पादनाची महत्त्वाची मूल्ये त्या पुढा-याने सभेतल्या लोकांपुढे सांगावयाला सुरूवात केली. सकाची वेळ होत. इतक्यात त्या कोवळ्या उन्हामध्ये त्या डोंगरपठारावरून दोन-चार ससे पळत असताना सभेतील लोकांनी पाहिले; आणि त्याबरोबर तत्त्वांचा आणि शेतीच्या उत्पदनाचा विचार सोडून देऊन ते सगळे लोक त्या सशांच्या पाठीमागे पळत सुटले. कारण त्यांनी असा विचार केला की; हे घेतलेले सहकारी तत्त्व आणि यातून वाढणारे शेतीचे उत्पादन पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी केव्हातरी पदरात पडणार आहे. आज संध्याकाळची मेजवानी ह्या सशांच्यावर होणार आहे. लहानशीच गोष्ट आहे, परंतु तीत पुष्कळसे तथ्य आहे.