यशवंतराव ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक विचारधारा होती. असंख्य कार्यकर्त्यांची ती जीवनधारा होती. प्रीतिसंगमावरील चव्हाणसाहेबांची समाधी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्य करणा-या समाजधुरिणांच्या दृष्टीने प्रेरणास्थानच बनेल.
‘यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) पुणे’, ‘यशवंतरावर चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक’ व ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’ यासंस्थाद्ववारे यशवंतरावांच्या विचाराचा प्रसार करण्याचे काम अव्याहतपणे आज सुरू आहे. भावी पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे चिरंतन प्रेरणा देण्याचे काम या संस्था आज करीत आहेत.
१९४६ पासून १९८४ पर्यंतच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ काळात यशवंतरावांनी राजकारणात अनेक चढउतार अनुभवले. सह्याद्रीसारखे खंबीर मन व हिमालयासारखी व्यापक दृष्टी ठेवू त्यांनी येणा-या प्रत्येक आव्हानांना हसतमुखाने स्विकारले. महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मोठे योगदान दिलेल्या व भारत-चीन युद्धासारख्या प्रसंगात देशाच्या रक्षणासाठी धावून जाणा-या चव्हाणसाहेबांच्या व खळखलून हास्य, नेहमी प्रसन्न चेहरा, समस्या जाणून घेण्याची कल्पकता, विकासकामाचा ध्यास, जनसामान्यांच्या कल्याणाची आस, सतत कार्यमग्नता असे कितरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पहावयास मिळतात. अल्पशिक्षित असणा-या पण जीवनाकडे पहाण्याची व्यापक दृष्टी असलेल्या वेणूताईंनी त्यांना जीवनभर दिलेल्या साथीमुळेच यशवंतराव इतके विशाल कार्य करू शकले.
आज महाराष्ट्राच्या राजकीय, समाजिक क्षेत्रात काम करणा-या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने यशवंतरावांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी ठरत आहे. भरकट जाणारे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी यशवंतरावांची विचारधारा समजून घेऊन कार्य केल्यासच समाजाचा राजकारणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन विधायक बनेल. आजपर्यंत देशातील अनेक मान्यवरांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यशवंतरावा चव्हाणसाहेबांच्या २०१२ मध्ये होत असलेल्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरवियाची खरी आवश्यकता आहे. त्यामुळे राज्याच्या व राष्ट्राच्या विकासात बहुमोल योगदान देणा-या एका महान नेत्याचा तो उच्चीत सन्मान ठरेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांना त्यामुळे निश्चितच प्रेरणा मिळेल!