जीवनाच्या उत्तरार्धात यशवंतरावांनी आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण केले. निष्कलंक चारित्र्याचे समाजवादी नेते श्रद्धेय एस्. एम. जोशी यांचा ८०वा वाढदिवस पुण्यात साजरा केला जाणार होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची यशवंतरावांची तीव्र इच्छा होती. तशातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. दिल्लीतील रूग्णालयात यशवंतरावांना दाखल करण्यात आले. नव्यानेच पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतलेले राजीव गांधी यशवंतरावांना वरचेवर रूग्णालयात जाऊन भेटत होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत होते. या लोकनेत्याला मात्र महाराष्ट्राची ओढ लागली होती. आयुष्याच्या अखेरीस आपण आपल्या मायभूमीत असावे अशी त्यांच्या मनाची तीव्र इच्छा होती. महाराष्ट्रभूमी व आपल्या संस्कारातून वाढलेले आपले अनुयायी यांना भेटण्याचे यशवंतरावांचे स्वप्न अखेरीस अधुरेच राहिले. ग्रीक शोकांतिकेतील भव्यदिव्य नायकाप्रमाणेच यशवंतरावांच्या जीवनाची अखेर झाली.
२५ नोव्हेंबर १९८४ रोजी सायंकाळी ७.४५ वाजता नवी दिल्ली येथे यशवंतरावांनी जगाचा निरोप घेतला. भारताच्या राजकीय क्षितिजावर स्वकर्तृत्वाने चमकणारा तेजोमय सूर्य वयाच्या ७१ व्या वर्षी अनंतात विलीन झाला. देशाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र एका असामान्य नेतृत्त्वाला मुकला. साधी राहणी, वास्तवतेचे भान असणारे अभ्यासू नेतृत्व, प्रचंड लोकसंग्राहक, अभ्यासपूर्ण वक्ते, ख्यातनाम साहित्यिक, द्रष्टे विचारवंत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशा विविध उपाधींनी गैरविलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्त्वचा ठसा उमटवून निघून गेले.
यशवंतराव चव्हाणसाहेब शरीररूपाने जगातून निघून गेले पण त्यांचे विचारधन मात्र पाठीमागे ठेवून गेले. चव्हाणसाहेबांच्या संस्कारातून उद्यास आलेले अनेक नेते महाराष्ट्राला व देशाला लाभले.
महाराष्ट्राला देशाच्या राजकारणात सन्मान मिळवून देण्यात यशवंतरा चव्हाणांचे योगदान खूपच मोठे मानावे लागेल. सहकार चळवळीची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रूजवून सहकार समृद्ध करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले. देशाच्या क्षिताजावर चमकणारे व महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणणारे ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून या लोकनेत्याच्या कर्तृत्तावाचा ठसा कायमस्वरूपी जनसामान्यांच्या हृदयसिंहासनावर कोरला गेला.
यशवंतरावांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कर्मभूमीत ‘कराड’ येथे आणण्यात आले. या लोकनेत्याच्या अंत्यदर्शनासाठी कराडच्या दिशेने जनसागर लोटला होता. राजकी, उद्योगजगत, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक अशा समाजाच्या विविध क्षेत्रातील मंडळींची रांग यशवंतरावांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुढे सरकत होती. यशवंतरावांच्य अंतिम इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर कृष्णा-कोयनेच्या संगमावर ‘प्रीतिसंगम’ येथे अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्यक्ष अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती. अबालवृद्ध स्त्री-पुरुषांकडून पार्थिवावर फुले टाकली जात होती. संथगतीने अंत्ययात्रा ‘प्रीतिसंगम’ येथे आली. २७ नोव्हेंबर १९८४ रोजी दुपारी ३.४० वाजता शासकीय इतमामात यशवंतरावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे पार्थिव अनंतात विलीन झाले.