“अल्पबचत हे मानवाच्या व राष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या ज्या निरनिराळ्या योजना आहेत, त्या पु-या करण्यासाठी गुंतवणूकीची खूप गरज आहे. प्रत्येक व्यक्तिला जरी बचत करता येणे शक्य नसले तरी ज्यांना शक्य आहे, त्यांनी मात्र खुषीने करावी. बचत जर होत नसेल तर ती सक्तीने केली पाहिजे. विकासाची कामे व्हावय़ाची असतील तर, त्यांच्या मागे बचतीची शक्ती उभी केली पाहिजे.”
संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीने खूप जोर धरला होता. त्यावेळी यशवंतरावांनी, “मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे वाटतात! असे विधान करून सर्वत्र खळबळ माजवून दिली होती. पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते प्रतापगडावरील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार होते. यावेळी यशवंतराव द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. नेहरूंना प्रतापगडाच्या दिशेन जाताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाला तोंड द्यावे लागले. वातावरण खूपच तणावपूर्ण होते. रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते तर दुस-या बाजुला संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले होते. प्रतापगडावरील शिवरायांचा पुतळा अनावरण झाल्यानंतर यशवंतरावांनी ओघवत्या शैलीत भाषण करून म. ए. समिती व काँग्रेस कार्यकर्त्यांतील तणाव कमी केला. याप्रसंगी ते म्हणतात, “प्रतापगड समारंभाच्या निमित्ताने काँग्रेस विजयी झाली की, संयुक्त महाराष्ट्र समिती विजयी झाली असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु त्याबाबत मला एवढेच सांगावयाचे आहे की कोण कोठे विजयी झाले हे पाहण्याचे ठिकाण प्रतापगड नसून इतरत्र आहे. ज्या शिवछत्रपतींनी राष्ट्राला इतिहास आणि संस्कृती दिली, त्या शिवछत्रपतींच्या महान कार्याला मागे टाकून पुढे जाण्याचा अहंकार समितीने उराशी बाळगला होता; परंतु प्रतापगडावरील मंगल सोहळ्याने हेच सिद्ध झाले की, शिवछत्रपतींचे नांव अजरामर असून मोठे आहे. इतर कोणत्याही निष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठाच अधिक श्रेष्ठ आहे हेच प्रतापगडावर दिसले. प्रतापगडावरील समारंभाने महाराष्ट्राचा आत्मा राष्ट्रनिष्ठेच्या बाहेर गेला नाही, हेच दिसून आले आणि हे चित्र महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना भूषणावह आहे. प्रतापगड समारंभाच्यावेळी एक राष्ट्रनेता दुस-या एका राष्ट्रनेत्याबद्दल आदर प्रकट करण्यासाठी येत होता. अशा या मंगल समारंभाला अपशकून करण्याचा घाट समितीने आखला होता. परंतु, महाराष्ट्रातील विचारी आणि जागृत जनतेने सुजाणता दाखवून समारंभ यशस्वी करण्यास सहकार्य केले. महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी समारंभ यशस्वी करण्यास तळमळीने सहकार्य दिले याबद्दल महाराष्ट्रातील जनतेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांस मी धन्यवाद देतो. समितीनेही शिस्त आणि संयम राखण्याचे सौजन्य दाखविल्याबद्दल समितीच्या मंडळीसही मी धन्यवाद देतो!”
अलिगड विश्वविद्यालयाच्या २९ डिसेंबर १९५९ रोजी झालेल्या पदवीदान समारंभास यशवंतरावांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी शिक्षण विषयक विचार मांडताना यशवंतराव म्हणतात,
“उच्च शिक्षणाची भूक ही देशातील आजच्या लोकशाही प्रवृत्तीची भूक आहे असे मला वाटते. अशा या उच्च शिक्षणाची द्वारे जोपर्यंत योड्याशाच मर्यादित वर्गाला खुली होती, तोपर्यंत समाजाचा उच्च वर्ग हाही मर्यादित राहणार होता. समाजातला हा मूठभर वर्ग जर कांही कारणाने घसरू लागला, तर समाजालाच धोका निर्माण होणार होता. शिक्षणाने मनाची क्षितिजे वाढतात. ती वाढलेली क्षितिजे आजपर्यंत जे मागासलेले अज्ञानी होते, त्यांना दिसू लागली आणि त्या बहुसंख्य वर्गाला जर त्या क्षेत्रात प्रवेश मिळाला तर त्यांना आपल्या शक्तीची जाणीव होईल. समाजाला गरज असणा-या नेतृत्वाची निवड करण्यास अधिक संख्येने बुद्धिवान उपलब्ध होऊ लागतील. अशा रितीने एक प्रक्रिया सुरू झाली म्हणजे सामाजिक दर्जा, जात, कौटुंबिक वारसा वगैरे गोष्टी आपोआपच दुय्यम ठरू लागतील. आपल्या सामाजिक प्रकृतीच्या दृष्टीने या परिवर्तनाचा फायदाच होईल यात शंकाच नाही.”
या पदवीदान समारंभातच अलिगड विद्यापीठाने यशवंतरावांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
यशवंतराव ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त गेले, तेथे त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांचे चिंतनशील विचार ऐकण्यासाठी समाजातील सर्वच थरातील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत. असे एकही क्षेत्र उरले नाही, की ज्यावर यशवंतराव बोलले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने ‘साहेब’ म्हणून त्यांचा जो आदर केला, तो त्यांच्या महान कर्तृत्त्वामुळेच!