ना. यशवंतराव चव्हाण यांनी पूज्य विनोबांना ५ हजार रूपये देणगी दिली. यशवंतरावांना त्यांच्या मित्राने विचारले, “विनोबांना तुम्ही पैशाच्या रूपात अल्पस्वल्प हातभार लावल हे ठीक आहे. पण त्यांनी चालविलेल्या कार्यामुळे भारताची उन्नती होईल, यावर आपला विश्वास बसतो काय?”
यावर यशवंतराव म्हणाले, “हो! बसतो की, प्रथम तुम्ही असा विचार करा की त्यांनी जे काही कार्य चालवलं आहे ते वाईट आहे का? त्यांत कुणावर जुलुम होतो कां? हिंसा कुठं केली जाते कां? अविचार घडतो कां? जर यापैकी कांहीच घडत नसेल तर ते कार्य चांगलं आहे असं लोकांनी कां मानू नये? त्यांचे कार्य दानावर आधारलेलं आहे. दान हे देणा-याच्या मर्जीवर अवलंबून असते. ज्याच्या त्याच्या इच्छेने घडणारी ही गोष्ट आहे. देशात प्रचंड गोरगरीब वर्ग आहे. दान देणा-याच्या संख्येपेक्षा दान घेणा-यांची संख्या अधिक आहे. भारत देश दीन दुबळा आहे. विनोबाजींच्या कार्याने संपूर्णपणे हा प्रश्न मिटेल असं जरी नसलं तरी पुष्कळ गरीबांना सुख मिळऊ शकेल. म्हणून मला हे कार्य आवडतं!
त्या मित्राने प्रश्न केला, “तुम्ही विनोबाजींना पैशाच्या रूपात दान केल्याचं समजलं, पण तुम्ही भूदान केलं नाही अजून? विनोबांनी म्हटलं आहे की, ‘भूदान’ हा शब्द शाळेतील लहान पोरंसुद्धा उच्चारतात. तेव्हा भूदान करण्याला अधिक महत्त्व आहे. म्हणून तुम्ही भूदान केलं तर बरं झालं असतं, असं आपलं मला वाटतं!”
यशवंतराव थोडा वेळ स्तब्ध राहिले, गालांतले गालांत हसले व मान हलवीत म्हणाले, “मला भूदान करतां आले असते, तर बरे झाले असते, तुमच्याप्रमाणे मलाहि वाटतं, पऽऽण”
“पण काय?”
“त्यांच असं आहे, ज्याचे जवळ ‘भू’ आहे त्यानांच दान करावयाचं. मी तर भूमीहीन माणूस आहे. एक आणा सुद्धा सरकारी सारा मी भरत नाही. मग मी भूदान कसं करणारं बरं?”
यशवंतरावांच्या या उत्तराने तो मित्र निरूत्तर झाला. खरोखरच यशवंतरावांनी त्यांच्या पु-या आयुष्यात एक गुंठा जमिनही स्वतःच्या नावार केली नाही. राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्त्वाचे यापेक्षा अन्य चांगले उदाहरण आखणी कोणते असावे?
यशवंतरावांची समाजवादावर खूप मोठी श्रद्धा होती. भारतासारख्या विशाल, खंडप्राय, देशाला तारणारा एकमेव मार्ग म्हणजे समाजवाद, असे यशवंतरावांचे ठाम मत होते. याबाबत आपले अभ्यासपूर्ण विचार मांडताना यशवंतराव म्हणतात,
“देशात समाजवाद आला नाही तर लोकशाही राहूच शकणार नाही. जे समाजवाद नको असे म्हणतात त्यांना स्वतःला तरी बदलावे लागेल किंवा समाज तरी बदलला पाहिजे. निरनिराळ्या राजकीय पक्षांनी ही समाजवादाची दृष्टी ठेवली नाही तर त्यांना बाजूला व्हावे लागेल.” मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना ना. यशवंताव चव्हाणांनी कोल्हापूर येथे शिवाजी उद्यमनगरांत झालेल्या एका कार्यक्रमात वरील उद्गार काढले. कोल्हापूर शहरांतील अल्प बचत पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. या निमित्त शिवाजी उद्यमनगरांतील उद्यमनगर सोसायटीच्या ऑफिससमोर भरलेल्या जाहिर सभेत त्यांनी हे भाषण केले. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणतात,