बा.भ. बोरकर, मंगेश पाडगांवकर, कवी अनिल, पु.भा. भावे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, चित्तरंजन कोल्हटकर, लक्ष्मण माने आदी असंख्य साहित्यिकांशी यशवंतरावांचा घनिष्ट संबंध होता. साहित्य क्षेत्राबरोबरच शास्त्रीय संगीताचेही ते चांगले भोक्ते होते. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, अब्दुल करीम खाँ यांच्या गायनाच्या मैफिलींना ते आर्वजून उपस्थित राहत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यशवंतरावांनी पं. भीमसेन जोशींच्या गायनाची मैफल नागपूरमध्ये आयोजित केली होती. यावेळी लोडतक्क्यावर काही आमदार, खासदार मंडळी एकमेकांशी गप्पा मारण्यात गर्क होती. मध्यंतरानंतर व्यासपीठावर जाऊन यशवंतरावांनी, ‘ज्यांना कुणाला गुजगोष्टी मारायच्या असतील, त्यांनी घरी जावे.’ असा दम मारला. एकंदरीत यशवंतरावांचे संगीतप्रेम हे विलक्षण होते. वेणूताईंच्या निधनानंतर त्यांच्या पुण्यतिथीला कराडमध्ये यशवंतरावांनी पं. भीमसेन जोशींच्या शास्त्रीय संगित गायनाचा कार्यक्रम ठेवला होता.
राज्याचा कृषी औद्योगिक विकास व्हावा यासाठी यशवंतराव व केंद्रीयमंत्री अण्णासाहेब शिंदेंनी मोठे योगदान दिले. शेती व उद्योग यांची सांगड घालण्याचे काम त्यांनी चांगल्याप्रकारे केले. यशवंतरावांच्या कारकीर्दीतच त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची मुळे ग्रामीण भागात रूजली गेली. कोयना व उजनी जलविद्युत प्रकल्प उभारले गेले. राज्यात कृषी विद्यापीठे स्थापण्यास प्रारंभ झाला. त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात सुमारे अठरा सहकारी साखर कारखाने सुरू झाले. सहकार क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्राच्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. किर्लोस्कर उद्योग समूहाचे प्रमुख शंतनुराव किर्लोस्करांशी त्यांचा ‘छोडो भारत’ आंदोलनापासून चांगला स्नेह होता. भूमिगत असताना यशवंतराव अनेकदा किर्लोस्करवाडीला येऊन राहत असत. पुण्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शेती व प्रवास यासाठी उपयुक्त ठरणारी लहान विमाने बनविण्याच्या शंतनुराव किर्लोस्करांच्या योजनेला यशवंतरावांनी पाठिंबा दिला. पण नागरी हवाई वाहतूक व विमान निर्मिती क्षेत्रात खाजगी उद्योगाला परवानगी नसल्याने ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकली नाही.
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदीरी वाढवण्यास वसंतदादा पाटील यांना यशवंतरावांनी मोठे पाठबळ दिले. राज्यात खरेदी-विक्री संघ, दूध संघ, प्रक्रिया संघ, ग्राहक संघ, सेवा सोसायटी, सहकारी बँका अशा माध्यमातून सहकाराचे जाळे विणण्यात यशवंतरावांची कल्पकता व परिश्रम प्रामुख्याने कारणीभूत आहेत. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणारे विठ्ठलराव विखे-पाटील, अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांच्याशी यशवंतरावांची सहकाराच्या वृद्धीसाठी सतत चर्चा होत असे. त्यांच्या कार्याचा आवाका इतका प्रचंड होता की, ते कधी कार्यशून्य अवस्थेत बसले आहेत, असे सापडणे केवळ अशक्य असे.
खेळाडू, कलावंत, गायक, अभिनेते, सिनेमा दिग्दर्शक, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक अशा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी असणारे ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपले.
मुंबईत हॉटेल कामगारांना संघटित करण्याचे काम जॉर्ज फर्नांडीस यांनी केले. त्यावेळी ‘हॉटेल कामगारांवर अन्याय करू नका.’ असा गर्भीत इशारा यशवंतरावांनी हॉटेल मालकांना दिला.
एकदा शिरूरला (घोडनदी) यशवंतरावांची सभा झाली. सभेत भाषण करताना यशवंतरावांनी १९४२ च्या लढ्यात आपल्याला घरात आश्रय देणा-या शिंप्याची आठवण सांगितली. त्यावेळी सभेत उपस्थित असणारा शिंपी ओरडून म्हणाला, ‘मी जीवंत हाये.’ यशवंतरावांनी त्या दृष्टी कमी झालेल्या शिंप्यास स्टेजवर बोलावून घेऊन त्याची विचारपूस केली. त्याच्या मुलास जिल्हा परिषदेत नोकरी लावून त्याच्या कुटुंबास आर्थिक मदतही केली. यशवंतरावांच्या जीवनातील असे कितीतरी अनुभव त्यांच्यातील गरिबांबद्दलची कणव व दिलदारपणाची साक्ष देतात.